अॅग्रिस्टॅक योजना; तात्काळ फार्मर आयडी तयार करा, अन्यथा शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही!

 

अॅग्रिस्टॅक योजना; तात्काळ फार्मर आयडी तयार करा, अन्यथा शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही!

 

बुलढाणा,दि.22 (जिमाका) :   केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवून घेतले नाही त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर नोंदणी करुन शेतकरी ओळख क्रमांक बनवून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. तसेच लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणिकरणाची आवश्यकता (e-KYC) राहणार नाही. अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत आपला सातबारा आधारला लिंक करायचा आहे. जेणेकरून तुम्हाला एक फार्मर आयडी मिळेल. फार्मर आयडी बनवला नाही, तर पिक विमा, पीक कर्ज. पीएम किसान व विविध पिक अनुदान यांचा लाभ मिळणार नाही.

 

ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी प्रकल्पाची अमंलबजावणी जिल्ह्यात दि. 12 डिसेंबर 2024 पासुन नागरी सुविधा केंद्र आणि शिबीरांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मोहिम अंतर्गत जिल्ह्यात आजअखेर 3 लक्ष 58 हजार 674 शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) तयार करण्यात आले आहे.

 

जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान योनजेचे एकुण 4 लक्ष 34 हजार 468 लाभार्थी आहेत. त्यापैकी आजअखेर 2 लक्ष 78 हजार 402 लाभार्थ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) तयार करण्यात आले आहे. अद्यापपावेतो 1 लक्ष 56 हजार 66 शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक तयार झालेले नाही. उर्वरित शेतकऱ्यांनी तात्काळ शेतकरी ओळख क्रमांक तयार करुन घ्यावे, अन्यथा आपल्याला पी. एम. किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या