Monday 21 August 2023

DIO BULDANA NEWS 21.08.2023

 शनिवारी जिल्हास्तरीय युवा उत्सव

बुलडाणा, दि. 21 : नेहरु युवा केंद्रातर्फे जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन शनिवार, दि. 26 ऑगस्ट 2023 रोजी येथील सहकार विद्या मंदिरातील सहकार ऑडीटोरिअम येथे करण्यात आले आहे.

स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना व मुल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृद्धींगत करणे आणि तरुण युवा कलावंतांना व्यासपिठ निर्माण करुन देण्यासाठी युवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात चित्रकला स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, भाषण स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवात स्पर्धेचा विषय हा अमृत काल के पंच-प्रण, विकसित भारत का निर्माण, गुलामी की हर सोच से मुक्ति, विरासत पर गर्व, एकता-एकजुटता, नागरिक कर्तव्य आहेत. यासाठी स्पर्धक हा बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असावा. त्याचे वय दि. 1 एप्रिल 2023 रोजी 15 ते 19 दरम्यान असावे. विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

चित्रकला, कविता लेखन आणि छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम एक हजार रूपये, द्वितीय 750 रूपये, तृतीय 500 रूपये असे बक्षीस आहे. जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम समूहाकरिता प्रथम 5 हजार रूपये, द्वितीय दोन हजार पाचशे रूपये, तृतीय एक हजार 250 रूपये, तर भाषण स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम 5 हजार रूपये, द्वितीय 2 हजार रूपये, तृतीय 1 हजार रूपये बक्षीस देण्यात येणार आहेत.

युवा उत्सवाचे उद्घाटन खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. आमदार संजय गायकवाड उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील युवकांनी घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी नेहरु युवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी, यांनी केले आहे.

00000





जिल्हा स्त्री रुग्णालयात तंबाखू नियंत्रण पथकाची कारवाई

बुलडाणा, दि. 21 : जिल्हा तंबाखू नियंत्रण पथक जिल्हा स्त्री रुग्णालयात 11 जणांवर कारवाई करून 1 हजार 100 रूपयांचा दंड वसुल केला.

शुक्रवार, दि. 18 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन वासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने कोटपा 2003 सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने जाहिरात प्रतिबंध व व्यापार वाणिज्य उत्पादन पुरवठा वितरण यांचे विनिमय कायदा कलम 4 नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी अंतर्गत कार्यवाही केली. जिल्हा स्त्री रुग्णालयात 11 नागरिकांवर कारवाई करून 1 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला.

ही कार्यवाही जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाचे लक्ष्मण सरकटे, अर्चना आराख, अनंत तुपकर, सुरेश बेंडवाल, कबीर शेख, स्वप्नील शेळके, गजानन भोरकडे, शैलेश राजपूत, मनोहर सोनी, राजेंद्र गवाटे, गणेश जायभाये, ओम पोलखरे, अविनाश आव्हाड, प्रतिभा खंडागळे यांनी केली.

00000




बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अतिवृष्टीग्रस्तांना मदत

बुलडाणा, दि. 21 : संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना बँक अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून कदत देण्यात आली.

नुकसान झालेल्या संग्रामपूर तालुक्यातील शिवाजीनगर येथे अग्रणी बॅंक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील बँक अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातर्फे ३५ कुटुंबांना जीवनावश्यक भांडी, तसेच किराणा साहित्याची मदत करण्यात आली. सदर मदत गावात जाऊन वाटप करण्यात आली.

यावेळी जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक नरेश हेडाऊ, स्टेट बँक ऑफ इंडियाचे रमेश करमकर, श्री. राजपूत, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे अविनाश महाले, श्री. पवार, श्री. मेंडके, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अमोल बाचे, बँक ऑफ इंडियाचे सिद्धेश्वर पवार, बँक ऑफ महाराष्ट्रचे चेतन वानखेडे, इंडियन ओवरसिज बँकेचे आशिष कोठारी, राजू पोपळघट, प्रभू अवचार, मंगेश पाटील उपस्थित होते.

00000



जिल्ह्याच्या वार्षिक पत आराखड्याचे अनावरण

बुलडाणा, दि. 21 : जिल्ह्याच्या वार्षिक पत आराखड्याचे अनावरण करण्यात आले. जिल्ह्यासाठी यावर्षी 7 हजार 95 कोटी रूपयांचा पतआराखड्याचे अनावरण करण्यात आले.

जिल्हास्तरीय बँकर्स समितीची सभा शुक्रवार, दि. 18 ऑगस्ट रोजी पार पडली. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते अध्यक्षस्थानी होत्या. खासदार प्रतापराव जाधव प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी जिल्ह्याच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. पिक कर्ज 73 टक्के आणि वार्षिक पत आराखड्याचे 51 टक्के उद्दिष्ट साध्य झाल्याचे त्यांनी सांगितले. खासदार श्री. जाधव यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, यूको बँक, आयडीबीआय बँक शेतकऱ्यांनी एकरकमी परतावा केल्यानंतर पुन्हा कर्ज मंजूर करीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे भविष्यात कोणताही शेतकरी एकरकमी परतावा करणार नसल्याचे सांगितले. तसेच प्रधानमंत्री विमा योजनेत जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

00000

नॅनो युरिया, नॅनो डीएपी एक वरदान

बुलडाणा, दि. 21 : जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू असून यात कापूस, सोयाबीन, तूर या पिकाची लागवड झाली आहे, पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी मुख्यत्वे नत्र, स्फुरद व पालाश, तसेच इतर मूलद्रव्यांची आवश्यकता असते. त्यामुळे नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी शेत पिकांसाठी एक वरदान ठरत आहे.

शेतकरी दाणेदार युरिया आणि डीएपी या रासायनिक खतांचा भरपूर वापर व मागणी पिकाची नत्र व स्फुरद या अन्नघटकांची पूर्तता करण्यासाठी करत असता. दाणेदार युरिया व डीएपी वापरामुळे पिकांना फक्त 30 ते 40 टक्के नत्र व 15 ते 20 टक्के स्फूरद उपलब्ध होतो. बाकीचा हवेच्या व पाण्याच्या माध्यमातून वाहून जातो, काही अंश जमिनीत स्थिर होतो. 1 बॅगच्या 45 किलोग्राम यूरियामध्ये 20.70 किलो नत्र असते, जमिनीत युरिया दिल्यानंतर झाडाला 7.24 किलो, नत्र 35 टक्के प्राप्त होऊन 13.46 किलो नत्र म्हणजेच 65 टक्के अमोनिया गॅस व नायट्रेट पाण्याच्या माध्यमातून लिचिंग द्वारे वाहून जातो. दाणेदार युरिया व डीएपीचा वापर करून आपण लागवड खर्चात वाढ करून पिकांची पोषक अन्नद्रव्याची पूर्तता करू शकत नाही. दाणेदार युरिया आणि डीएपीचा वापर केल्याने जमीन, पाणी, हवा प्रदूषित होऊन जमिनीची उत्पादकता कमी होते. तसेच जमिनीतील लाभदायी जीवजंतू यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. सदर खतांचा कच्चामाल देशात उपलब्ध नसल्याने भारत सरकारला देखील अनुदानावर मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च करावे लागते, पर्यायाने देशाच्या आर्थिक स्थितीवर याचा परिणाम होतो.

याकरिता भारत सरकारने नॅनो खते हे द्रवरूप नॅनो युरिया व द्रवरूप नॅनो डीएपी नवीन संशोधनाद्वारे उपलब्ध झाली आहे. नॅनो युरिया व नॅनो डीएपी द्रवरूप हे 500 मिली पॅकिंगमध्ये असून नॅनो युरिया मध्ये 4 टक्के नत्राचे प्रमाण, तसेच नॅनो डीएपी मध्ये 8 टक्के नत्र व 16 टक्के स्फूरद एकूण वजनाच्या प्रमाणात असते. नॅनो युरिया व डीएपी द्वारे पिकांना नत्र आणि स्फुरद फवारणीच्या माध्यमातून उपलब्ध होते. नॅनो खतांची फवारणी केल्यानंतर नत्र आणि स्फुरद झाडाच्या पानावरील, बिया व मुळाच्या पृष्ठभागावर असणाऱ्या छिद्रांच्या माध्यमातून आतमध्ये प्रवेश करते व पानांच्या पेशी मधील पोकळीमध्ये साठवले जाऊन पिकांच्या आवश्यकतेनुसार झाडाला उपलब्ध होते. त्यामुळे नत्र व स्फुरद ही अन्नद्रव्ये विहित वेळेत योग्य त्या प्रमाणात पिकांना 86 टक्के उपलब्ध होतात. नॅनो पद्धतीमुळे खतांचा संतुलित वापर होऊन जमीन हवा व पाणी या मूलभूत घटकांना प्रदूषण मुक्त ठेवता येते. लागवडीच्या खर्चात बचत होते. पिकांच्या भरघोस उत्पन्नाची हमी प्राप्त होते.

नॅनो खते नॅनो युरिया, नॅनो डीएपीचा वापर पिकांच्या विविध अवस्थेत दोन वेळा फवारणी करून नत्र व स्फुरद या अन्न घटकांची पिकांना पूर्तता करून देणे शक्य आहे. दोन ते पाच मिली लिटर नॅनो खते प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकाच्या प्रमुख वाढीच्या अवस्थेनुसार फवारणी करावी. नॅनो खतांच्या उत्तम परिणामासाठी पहिली फवारणी पिकाच्या फुटवे /फांद्या फुटण्याच्या अवस्थेमध्ये व दुसरी फवारणी पिकाच्या फुलोरा/ शेंगा लागणे 7-10 दिवस अगोदर करावी. फवारणी सकाळच्या वेळेत कमी उन्हामध्ये आणि हवेच्या कमी वेगामध्ये करावी. पाणी पूर्ण ओली होण्यासाठी आणि नॅनो खते समप्रमाणात सर्वत्र मिसळण्यासाठी पंपाला फ्लॅट फॅन किंवा कट नोझल लावून फवारणी करावी. नॅनो युरीया/ डिएपी फवारणी व्दारे देण्यात यावे, ठिबक व वाहत्या पाण्यातुन देण्यात येवू नये.

कापूस पिकासाठी खत मात्रा 120:60:60-30 टक्के नत्रपेरणीच्या वेळेस दाणेदार युरिया खताद्वारे देण्यात यावे. उर्वरित मात्रा नॅनो खताच्या माध्यमातून देण्यात यावी. प्रथम फवारणी पात्या लागण्याची अवस्थेत 45-50 दिवस उगवणीनंतर एकरी नॅनो युरिया 500 मिली अधिक नॅनो डीएपी 500 मिली मिसळून फवारावे. दुसरी फवारणी फुलोरा अवस्थेत 60-65 दिवस उगवणीनंतर एकरी नॅनो युरिया 500 मिली फवारावे. तिसरी फवारणी बोंड तयार करण्याच्या अवस्थेत 90-95 दिवस उगवणीनंतर एकरी नॅनो डीएपी 500 मिली फवारावे.

सोयाबीन पिकासाठी खत मात्रा 30:60:30 – 50 टक्के नत्र, पेरणीच्या वेळेस दाणेदार युरिया खताद्वारे देण्यात यावे. उर्वरित मात्रा नॅनो खताच्या माध्यमातून देण्यात यावी. प्रथम फवारणी फुले सुरुवात होण्याची अवस्थेत 30-35 दिवस उगवणीनंतर एकरी 500 मिली नॅनो डीएपी फवारणी करावी. दुसरी फवारणी शेंगा लागण्याची अवस्थेत 45-55 दिवस उगवणीनंतर एकरी 500 मिली नॅनो डीएपी फवारावी.

रासायनिक खताचा संतुलित वापर करून नॅनो खताचा वापर वाढवावा

रासायनिक खतांचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या जमिनीचे माती परीक्षण करावे. शास्त्रीय दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या मुल घटकांच्या पूर्तीसाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर करून नॅनो खतांचा वापर वाढवा. पिकांची उत्पादकता वाढण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत व जैविक खतांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे, बुलढाणा यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment