Tuesday 22 August 2023

DIO BULDANA NEWS 22.08.2023

 



शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वी करावा

-जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते

बुलडाणा, दि. 22 : शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन बुलडाणा येथे मंगळवार, दि. 29 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. यात शासकीय योजनांच्या लाभासह रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज शासन आपल्या दारी उपक्रमाच्या आयोजनाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी दिनेश गिते, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विशेष कार्य अधिकारी राहुल देशपांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी बी. एम. मोहन आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती विसुपते म्हणाल्या, शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विविध विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी ती चोखपणे सांभाळावी. उपक्रमामध्ये लाभार्थ्यांना कार्यक्रमासाठी आणणे हा महत्वाचा भाग आहे. त्याअनुषंगाने वाहतूक आराखडा तयार करावा. लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या दिवशी आणताना त्यांची काळजी घेण्यात यावी. बसमध्ये प्राथमिक उपचारासोबतच आरोग्य सेवक, एक कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

मोठ्या प्रमाणावर नागरिक येणार असल्याने कार्यक्रमस्थळी आरोग्य सुविधा उभारण्यात यावी. तसेच फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात यावी. तसेच परिसरात स्वच्छता ठेवण्यात यावी. शौचालयाअभावी प्रामुख्याने महिलांची गैरसोय होऊ नये. कार्यक्रमाला येणाऱ्या लाभार्थ्यांना रोपे आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बॅरेकेटींग आणि आगीच्या स्थितीबाबत योग्य ती काळजी घेण्यात यावी. शहरात मेडीकल असोसिएशन चांगले कार्य आहे. त्यांनाही यात सामावून घ्यावे, तसेच कार्यक्रमाच्या दिवशी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागाने आपले नियोजन करावे, असे आवाहन श्रीमती विसपुते यांनी केले.

00000

मोताळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दोन नवीन अभ्यासक्रम

बुलडाणा, दि. 22 : मोताळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नवीन अभ्यासक्रमाच्या दोन तुकड्या सुरू होणार आहे. इच्छुकांनी यासाठी प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बेसिक कॉस्मेटोलॉजी एक तुकडी आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रणाली देखभाल या व्यवसायाच्या दोन नवीन तुकड्यांना संलग्नता प्राप्त झाली आहे. त्यानुसार प्रवेश सत्र 2023-24 करिता कॉस्मेटॉलॉजी 24 जागा आणि आयसीटीएसएम 24 जागांकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी आजच प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. डी. गंगावणे यांनी केले आहे.

0000000



मोताळा आयटीआयमध्ये स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन

बुलडाणा, दि. 22 : मोताळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आजादी का अमृत महोत्सव आणि मेरी माटी मेरा देश यानिमित्ताने दि. 15 ऑगस्ट रोजी स्मार्ट क्लासरुमचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. मोताळा येथील कार्यक्रमाला प्राचार्य एस. डी. गंगावणे, आयएमसी अध्यक्ष पी. एन. जाधव उपस्थित होते. डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत राज्यातील 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्मार्ट क्लासरूम उपक्रम राबविण्यात येत आहे. यात पहिल्या टप्प्यात 75 व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटन करण्यात आले. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आयुक्त एन. रामास्वामी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी उपस्थित होते.

000000



जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कायदेविषयक जनजागृती शिबीर

बुलडाणा, दि. 22 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ आणि जिजामाता महाविद्यालयातर्फे जिजामाता महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबीर गुरूवार, दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात आले.

जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे अध्यक्षस्थानी होते. शिबीरासाठी प्रमुख वक्ते विधी सेवा बचाव पक्षाचे वकील सहायक सारीका भोलाने यांनी वाहतुकीचे नियम तर व्ही. पी. मारोडकर यांनी रॅगिग विरोधी कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर हेमंत भुरे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जनजागृती शिबीराचे आयोजन नियमित करण्यात येते. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

सहाय्यक सारीका भोलाने यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. भरत जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी अधीक्षक एस. एस. अवचार, प्रविण खर्चे, वैभव मिलके यांनी पुढाकार घेतला.

000000

वजन काट्यांच्या अनधिकृत विक्रीवर आळा

बुलडाणा, दि. 22 : वजन काट्यांच्या अनधिकृत विक्री आणि दुरुस्तीस आळा घालण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

वजन, माप आणि काटे हे वैध मापन शास्त्र कार्यालयाकडून प्राधिकृत केलेल्या दुकानातूनच घेण्यात यावे. वजनाचे साहित्य घेताना शासन शुल्क भरण्यात आल्याची पावती व पडताळणी व मुद्रांकन केलेला शिक्का तपासूनच घ्यावे. तसेच चीनमधून आयात अप्रमाणित वजन काटे व्यवसायासाठी वापरणे हा वैध मापन शास्त्र कायदा 2009 अन्वये गुन्हा आहे. त्यामुळे अशा वजन काट्याचा वापर करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

बाल पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 22 : लहान मुलांना असामान्य शौर्यासाठी आणि शैक्षणिक, क्रीडा, कला व संस्कृती तसेच समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल भारत सरकारकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारासाठी awards.gov.in आणि wcd.nic.in या पोर्टलवर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुकांनी दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत नामांकने सादर करावीत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डीघुळे यांनी केले आहे.

000000

बाल संरक्षणासाठी कार्यरत संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 22 : बालकांच्या संरक्षणासाठी जिल्ह्यातील कार्यरत संस्थांकडून स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीची सदस्य म्हणून नामनिर्देशन करण्यात येणार आहे. यासाठी दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 कलम 44 व 45 तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम 2018 मधील तरतुदीनुसार प्रतिपालकत्व व 26 नुसार प्रायोजकत्व योजनेबाबत तरतूद करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता जिल्हास्तरावर प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व मान्यता समिती गठन करण्यात येणार आहे. समितीवर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यात बाल संरक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाकडून एका स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीचे सदस्य म्हणून नामनिर्देशन मागविण्यात येत आहे. प्रतिपालकत्व आणि प्रायोजकत्व मान्यता समितीमध्ये सदस्य म्हणून निवडण्याकरीता प्रस्तावासहित अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सुवर्णनगर, बसस्थानक मागे, मुठ्ठे ले आऊट, डॉ. जोशी हॉस्पिटल जवळ, बुलडाणा या पत्यावर दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावेत, तसेच अर्जाची प्रत dwcd_bul@yahoo.com या मेलवर पाठविण्यात यावी, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे.

0000000






जिल्हास्तरीय शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

बुलडाणा, दि. 22 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हास्तरीय शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज दि. 22 ऑगस्ट रोजी पार पडले.

जिल्हास्तरीय शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धेचे 14, 17, 19 वर्षाआतील मुले, मुलींच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 22 ते 23 ऑगस्ट 2023 रोजी बुलडाणा तालुका क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आले.  स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार, दि. 22 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा आर्चरी संघटनेचे सचिव प्रा. डॉ. मनोज व्यवहारे, ॲड. उदय कारंजकर, दिगंबर पाटील, मनिषा वारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रा. डॉ. व्यवहारे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. या स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. स्पर्धेकरीता मुख्य पंच म्हणून प्रणीत देशमुख, तर नागेश निंबाळकर, विनया नारनवरे, अभिषेक पिसाळ, अजित श्रीराम यांनी पंच म्हणून काम पाहिले. उद्घाटन कार्यक्रमाला डॉ. प्रवीण नरवाडे, नितीन अघाव, अंकुश बोराडे, संतोष शिंदे, प्रदीप शिंगणे, भरत ओळेकर, सागर उबाळे, श्री. पवार उपस्थित होते. तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर सूत्रसंचालन करून आभार मानले.

00000

No comments:

Post a Comment