Tuesday 1 August 2023

DIO BULDANA NEWS 01.08.2023

 


लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

बुलडाणा, दि. 1 : साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिलदार संजीवनी मोपळे, प्रमोद करे, नाझर गजानन मोतेकर, अव्वल कारकून शिला पाल. वर्षा मुळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनीही अभिवादन केले.

00000

औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन योजना

बुलडाणा, दि. 1 : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय वनस्पती मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत औषधी वनस्पतीच्या संवर्धनासाठी दर्जेदार लागवड साहित्य, माहिती, शिक्षण व संप्रेषण उपक्रम, काढणी पश्चात व्यवस्थापन आणि विपणनासाठी पायाभूत सुविधा, गुणवत्ता चाचणी आणि प्रमाणन या घटकांसाठी शेतकरी, तसेच लागवडधारकांना अनुदान दिले जाते.

            योजनेंतर्गत मार्गदर्शक सुचनांमध्ये औषधी वनस्पतींच्या पुरवठा साखळीत फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज एकात्मिक घटक हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. ही योजना दि. 31 मार्च 2026 पर्यंत राबविण्यात येणार आहे.

दर्जेदार लागवड साहित्यासाठी पायाभूत सुविधा अंतर्गत (लागवड साहित्याचे उत्पादन) सार्वजनिक क्षेत्राकरीता चार हेक्टर क्षेत्रावर बियाणे, जनुक केंद्राची स्थापना यासाठी 25 लाख रुपये, चार हेक्टर क्षेत्रावर आदर्श रोपवाटिका निर्मितीसाठी 25 लाख रुपये, एक हेक्टर क्षेत्रावर लहान रोपवाटिका निर्मितीसाठी 6 लाख 25 हजार रुपये अनुदान दिले जाते. तसेच खासगी क्षेत्राकरीता प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के कमाल मर्यादेत अनुक्रमे साडेबारा लाख, साडेबारा लाख आणि 3 लाख 12 हजार 500 रुपये अनुदान दिले जाते.

माहिती, शिक्षण आणि संप्रेषणांतर्गत शेतकऱ्यांना किमान दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. राज्यातील प्रशिक्षणार्थ्यांना दोन हजार रुपये प्रती प्रशिक्षणार्थी, तर राज्याबाहेरील प्रशिक्षणार्थ्यांना पाच हजार रुपये प्रती प्रशिक्षणार्थी आणि वाहनखर्चासाठी अनुदान दिले जाते.

खरेदीदार-विक्रेता भेटींतर्गत जिल्हास्तरीय भेटीसाठी एक लाख रुपये, तर राज्यस्तरीय भेटीसाठी दोन लाख रुपये संबंधितांना दिले जाते. काढणीपश्चात व्यवस्थापन आणि विपणनासाठी पायाभूत सुविधातून वाळवणी गृहाकरीता सार्वजनिक क्षेत्रातील अर्जदारास शंभर टक्के म्हणजे दहा लाख रुपये सहाय्यता अनुदान म्हणून दिले जाते, तर खाजगी क्षेत्रातील अर्जदारास 50 टक्के अनुदानास दिले जाईल.

मूल्यवर्धन पायाभूत सुविधेंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील अर्जदार हे 100 टक्के म्हणजे 15 लाख रुपये अनुदान सहाय्यासाठी पात्र राहील. खाजगी क्षेत्रातील अर्जदार हा 50 टक्के अनुदान सहाय्यासाठी पात्र राहील. ग्रामीण संकलन केंद्रासाठी सार्वजनिक क्षेत्रातील अर्जदारास 100 टक्के 20 लाख रूपये अनुदान सहाय्यासाठी पात्र असतील. खासगी क्षेत्रातील अर्जदार 50 टक्के अनुदान सहाय्यासाठी पात्र असतील. गुणवत्ता चाचणी अंतर्गत आयुष, एनएबीएल या संस्थांमध्ये औषधी वनस्पतींची चाचणी करुन घेतल्यास उत्पादकांना चाचणी शुल्काच्या 50 टक्के जास्तीत जास्त पाच हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाईल.  गट किंवा क्लस्टरमध्ये 50 हेक्टर लागवडीसाठी प्रमाणन शुल्कापोटी पाच लाख रुपयांच्या मर्यादेत अनुदान देय राहील.

ही योजना प्रकल्पाधारित असून योजनेसंबंधी मार्गदर्शक सूचना राष्ट्रीय वनस्पती मंडळ, नवी दिल्लीच्या nmpb.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. संशोधन केंद्र, विद्यापीठे, एनजीओ आदींनी औषधी वनस्पतींच्या विविध घटकांचे प्रकल्प प्रस्ताव मार्गदर्शक सूचनेतील प्रपत्रानुसार राष्ट्रीय वनस्पती मंडळ एनएमपीबी, नवी दिल्ली यांना सादर करण्यासाठी त्यांचे प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्यामार्फत पडताळणी करुन शिफारसपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव राज्य औषधी वनस्पती मंडळ एसएमपीबी, पुणे यांच्याकडे सादर करावेत. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य फलोत्पादन व औषधी मंडळाने केले आहे.

000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

बुलडाणा, दि. 1 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून दि.  15 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.

महिला व बाल विकास विभागातर्फे दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. यात महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला आणि संस्थांना गौरविण्यात येते. सन 2020-21, 2021-22, 2022-23 आणि 2023-24 या वर्षाकरिता पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती, संस्थांकडून दि. 31 जुलै 2023 पर्यंत अर्ज, प्रस्ताव मागविण्यात आले होते.

या पुरस्काराचे स्वरुप राज्यस्तरीय पुरस्कार 1 लाख 1 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. यासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्षांचा  सामजिक  कार्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई पुरस्कार प्राप्त  झाला आहे, त्या महिला पुरस्कार मिळाल्यापासून 5 वर्षांपर्यत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

विभागीय पुरस्कार हा 25 हजार 1 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असा आहे. महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 7 वर्षे कार्य असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत संस्थेस दलितमित्र पुरस्कार प्राप्त नसावा, तसेच संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. तसेच तिचे कार्य व सेवाही पक्षातीत व राजकारणापासून अलिप्त असावी लागणार आहे.

जिल्हास्तरीय पुरस्कार हा 10 रुपये 1 रूपये रोख स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ आहे. तसेच पुरस्कारासाठी संस्थेचे महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 10 वर्षांचे सामजिक कार्य असणे आवश्यक आहे. ज्या महिलांना दलितमित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई पुरस्कार मिळाला आहे, त्या महिलांना हा जिल्हास्त्तरीय पुरस्कार अनुज्ञेय नाही. अर्हता असणाऱ्या इच्छुक व्यक्ती, संस्थानी अर्हतेशी  संबंधित आवश्यक कागदपत्रे, तसेच प्रमाणपत्र, कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

राज्य आणि जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी चारित्र्य चांगले असल्याबाबत, तसेच त्यांच्याविरुद्ध कोणताही फौजदारी आणि त्यांनी सार्वजनिक संपत्तीचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा दाखल नसल्याचे विभागीय  पोलीस अधिक्षक यांचे प्रमाणपत्र, प्रस्तावधारकांची माहिती, केलेल्या कार्याचा तपशील, वृत्तपत्र फोटोग्राफ, सध्या कोणत्या पदावर  कार्यरत आहे, यापूर्वी पुरस्कार मिळाला आहे काय? असल्यास तपशिल सादर करावा लागणार आहे. सदर प्रस्ताव 3 प्रतीत सादर करावा लागणार आहे.

विभागीय स्तर पुरस्कारासाठी संस्थेची माहिती व कार्याचा अहवाल, वृत्तपत्र फोटोग्राफ, सध्या कोणत्या पदावर  कार्यरत आहे, यापूर्वी संस्थेस पुरस्कार  मिळाला आहे काय? असल्यास त्याचा तपशिल, संस्था नोंदणी प्रमाणपत्र व घटनेची प्रत, संस्थेचे पदाधिकारी यांचे चारित्र्य चांगले आहे, त्यांच्याविरुद्ध कोणताही फौजदारी, तसेच त्यांनी सार्वजनिक संपत्तीचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा दाखल नसल्याचे व संस्थेचे कार्य व संस्था राजकारणापासून अलिप्त असल्याचे विभागीय पोलिस अधिक्षकांचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे आणि प्रस्ताव 3 प्रतीत सादर करावा लागणार आहे.

इच्छुक व्यक्ती, संस्थाना विहित नमुन्यातील अर्ज, तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, फोन नं. 9689554822, 9665273169, 9763791588 येथे संपर्क साधावा. तसेच आवश्यक त्या सर्व  कागदपत्रांसह आपला प्रस्ताव 3 प्रतीत दि. 31 जुलै 2023 पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment