Monday 7 August 2023

DIO BULDANA NEWS 07.08.2023


राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांकडून आढावा

*आयोग समस्या जाणून शिफारशी करणार

बुलडाणा, दि. 7 : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी कार्य करणार आहे. प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, पदभरती, बदली आदींचा आढावा हा आयोग घेण्णार आहे. क्षेत्रिय स्तरावर कार्य करताना येणाऱ्या अडचणी हा आयोग शासनाकडे मांडणार असल्याची माहिती आयोगाचे सदस्य ॲड. चंद्रलाल मेश्राम, प्रा. डॉ. निलिमा सरप-लखाडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळू खरात आदी उपस्थित होते.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा आढावा घेताना सदस्यांनी अडचणीचा आढावा घेतला. समितीकडे स्थलांतरीत करणाऱ्या नागरिकांकडून येत असलेल्या दाव्याबाबत माहिती घेतली. जातीचे प्रमाणपत्र हे तहसिलदार छाननी करून देतात. मात्र ज्यावेळी सादर केलेले शंकास्पद असल्यास ते मूळ प्रतीत मागविण्यात यावेत. यात कोणतीही हयगय करू नये. जातीचे प्रमाणपत्र वितरीत करताना जातीचा अनुक्रमांक अचूक नोंदविण्यात यावा. यामुळे जात पडताळणी समितीकडे येणाऱ्या प्रस्तावावर योग्य कार्यवाही करता येणे शक्य होईल. याबाबत कोणताही प्रश्न उद्भवणार नाही. जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया ही सेतू केंद्रातून होते. याठिकाणी प्रशिक्षित मनुष्यबळ नेमण्यात यावे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेले प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात यावे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील पदभरती संदर्भात माहिती घेण्यात आली. संस्थास्तरावर बिंदू नामावली नियमित तपासण्यात यावी. जिल्ह्यातील 156 संस्थांनी बिंदूनामावली अद्ययावत केली आहे. बिंदू नामावली अद्ययावत केल्याशिवाय पवित्र पोर्टलद्वारे भरती करता येत नाही. त्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी. कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता पडताळणी करण्यात यावी. प्रलंबित असलेली पडताळणी पूर्ण करण्यात यावी. आंतरजिल्हा बदली बाबत प्राधान्यक्रमानुसार बदली करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

जातीचे प्रमाणपत्र देताना ते एकाच नमुन्यात देण्यात यावेत. वेगवेगळ्या नमुन्यात प्रमाणपत्र मागणाऱ्या संस्थांशी बाबत संपर्क साधून माहिती देण्यात यावी, जात प्रमाणपत्राची मुदत नॉनक्रिमीलेअर सोबत असल्यामुळे एक वर्षे आहे. ही मुदत वाढविण्यात यावी, एका कुटुंबाला एकच जातीचे प्रमाणपत्र द्यावे, अशा सूचनाही यावेळी मांडण्यात आल्या.

राज्य मागासवर्ग आयोग हा सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणी शासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहे. शासकीय यंत्रणांनी बिंदूनामावली तपासून घ्यावी. तसेच इतर कामकाजात अडचणी येत असल्यास आयोगाकडे मांडण्यात याव्यात. यातील योग्य मागण्या शासनाकडे पाठविण्यात येतील. असे सदस्यांनी यावेळी सांगितले. आयोगाच्या सदस्यांनी खामगाव येथे लखेरा, लखेरिया तर शेगाव येथे हडगर समाजाच्या प्रतिनिधींसमेत चर्चा केली.

00000

मेहकर आयटीआयमध्ये पदभरती

बुलडाणा, दि. 7 : मेहका येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आस्थापनेवर घड्याळी तासिकाप्रमाणे रिक्त पदे भरण्यात येणार आहे. पात्र इच्छुकांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

संस्थेत जोडारी व्यवसायासाठी 1 पद भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्रता ही आयटीआय आणि सीटीआय जोडारी व्यवसाय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर मेकॅनिकल इंजिनिअरींग आणि 2 वर्षे अनुभव, तसेच संपुर्ण संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. संधाता व्यवसायासाठी 2 पद भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्रता ही आयटीआय आणि सीटीआय संधाता व्यवसाय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर मेकॅनिकल इंजिनिअरींग आणि 2 वर्षे अनुभव, तसेच संपुर्ण संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. विजतंत्री व्यवसायासाठी 2 पद भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्रता ही आयटीआय आणि सीटीआय विजतंत्री व्यवसाय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग आणि 2 वर्षे अनुभव, तसेच संपुर्ण संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. सुतारकाम व्यवसायासाठी 1 पद भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्रता ही आयटीआय आणि सीटीआय सुतारकाम व्यवसाय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर मेकॅनिकल इंजिनिअरींग आणि 2 वर्षे अनुभव, तसेच संपुर्ण संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. इम्पलाबिलीटी स्कील व्यवसायासाठी 1 पद भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्रता ही एमबीए, बीबीए, कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि 2 वर्षे अनुभव, तसेच संपुर्ण संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.

यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन प्राचार्य व्ही. बी. शिरसाट यांनी केले आहे.

00000

शेळीपालन, कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन

बुलडाणा, दि. 7 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योग, व्यवसाय सुरु करू इच्छिणारा सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींसाठी बुलडाणा येथे शेळीपालन, कुक्कटपालन, गाय, म्हैसपालन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. दि. २१ ते २५ ऑगस्ट २०२३ दरम्यान पाच दिवस कालावधीचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

पाच दिवसीय प्रशिक्षणातून सुशिक्षित बेरोजगारांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करावा यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात शेळीपालन, कुकुट आणि गाय, म्हैस पालनाचे तंत्र आणि जाती, लसीकरण, संशोधन रोग आणि लक्षणे, खाद्य निर्मिती, चाऱ्याचे प्रकार, उद्योग सुरु करण्यासाठी सहकार्यासोबत उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन, सहकार्य आणि उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन, शासकीय योजनाची माहिती आदीबाबत तज्ज्ञ प्रशिक्षणात मार्गदर्शन करणार आहेत.

प्रशिक्षण घेऊ इच्छिणारा उमेदवार हा किमान पाचवी पास, वय १८ ते ५० वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी नोंदणी दि. २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत गणेश गुप्ता, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र, दूरदर्शन केंद्रासमोर, मलकापूर रोड, बुलडाणा, संपर्क क्रमांक ८२७५०९३२०१, ९०११५७८८५४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले आहे.

00000

लेख

‘मेरी माटी, मेरा देश’

होणार सन्मान शूरवीरांचा…

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करण्यासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ ही मोहिम देशभर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची ही संक्षिप्त माहिती...

 

भारतीय स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मेरी माटी, मेरा देश ही मोहीम संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. ग्रामस्तरापासून राष्ट्रीयस्तरापर्यंत देशव्यापी लोकसहभागातून विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ग्रामपंचायतींमध्ये शहिदांचे नाव असणारे शिलाफलक बसवण्यात येणार आहेत. दिल्ली येथे निर्मित होणाऱ्या अमृत वाटिकेसाठी अमृत कलश यात्रेत देशाच्या कानाकोपऱ्यातून माती आणली जाणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात 'मेरी माटी, मेरा देश' मोहिमेची घोषणा केली. देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांना नमन करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी ही मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेत शूरवीरांच्या स्मरणार्थ देशभरात विविध कार्यक्रम आयोजिले आहे. शूरविरांच्या स्मृतिप्रित्यर्थ जिल्ह्यातील 87 अमृत सरोवराजवळ शिलाफलक उभारले जातील. तसेच अमृत सरोवराच्या परिसरात प्रत्येकी 75 याप्रमाणे 6 हजार 525 भारतीय प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे.

'मेरी माटी, मेरा देश ' हा भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वर्षे साजरी करणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम राहणार आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय, शहिद झालेल्या जवानांचे कुटुंबिय आणि माजी सैनिकांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहे. गेल्या वर्षी ‘हर घर तिरंगा’ या देशव्यापी अभियानाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समरोपाला ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिम राबविण्यात येणार आहे.

शूरवीरांना आदरांजली म्हणून शिलाफलक बसवणे, मिट्टी का नमन आणि वीरों का वंदन हे ‘मेरी माटी, मेरा देश’ या मोहिमेचे प्रमुख घटक राहणार आहे. ‘मेरी माटी, मेरा देश’ या मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून यावर्षीही ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जाणार आहे. या मोहिमेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे.

या मोहिमेमध्ये आपल्या शूरवीरांच्या बलिदानाला अभिवादन म्हणून स्वातंत्र्यसैनिक आणि सुरक्षा दलांना समर्पित शिलाफलकांची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच पंच प्राण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहे. वीरहृदयांची गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाच्या भावनेला वंदन  करणारे शिलाफलक, स्मारक फलक हे शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत. त्यामध्ये त्या-त्या भागातील शूरवीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली त्यांच्या नावाबरोबर पंतप्रधानांचा संदेश असेल. ही मोहीम १२ मार्च २०२१ रोजी सुरू झालेल्या 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'चा समारोप राहणार आहे. या कार्यक्रमांतर्गत भारतभरात दोन लाखाहून अधिक कार्यक्रम घेण्यात आले आहे. देशभरातील जनतेने यात व्यापक लोकसहभाग नोंदवला. दि. ९ ते ३० ऑगस्ट २०२३ दरम्यान 'मेरी माटी, मेरा देश' मोहिमेत गाव आणि गटस्तरावर, तसेच स्थानिक स्वराज संस्था तसेच राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर कार्यक्रमांचे आयोजन असणार आहे.

दिल्ली येथे 'अमृत वाटिका' तयार करण्यात येणार आहे. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ७ हजार ५०० कलशांमध्ये माती घेऊन 'अमृत कलश यात्रा' काढण्यात येणार आहे. जिल्ह्यात ग्रामस्तरावरून पंचायत स्तवरावर माती गोळा करण्यात येणार आहे. त्यानंतर तीन जिल्हास्तरावर एकत्रित केल्या जाईल. त्यानंतर शहिदांच्या कुटुंबियांच्या हस्ते दिल्ली येथील मुख्य कार्यक्रमासाठी अमृत कलश रवाना करण्यात येणार आहे. ही 'अमृत वाटिका' 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या वचनबद्धतेचे प्रतीक असेल.

या मोहिमेत लोकसहभागाला विशेष महत्व देण्यात आले आहे. लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या कृतीतून लोक भारताला विकसित देश बनवणे, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणे, एकता आणि बंधुता टिकवून ठेवणे, नागरिकांची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांप्रति आदर व्यक्त करणे, यावर लक्ष केंद्रित करून पंच प्राणांची प्रतिकात्मक प्रतिज्ञा घेतात. अशा प्रकारे राष्ट्र प्रतिज्ञा घेतल्यानंतर सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र वेबसाइटवरून डाउनलोड करता येणार आहे. गेल्या वर्षीच्या सहभागामुळे हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी झाला. या वर्षी देखील दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२३ दरम्यान 'हर घर तिरंगा' उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी सर्वत्र राष्ट्रध्वज फडकवावेत आणि तिरंग्यासोबत सेल्फी काढून harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या देशव्यापी मोहिमेचा तपशील yuva.gov.in/meri_maati_mera_desh या पोर्टलवर उपलब्ध राहणार आहे. पोर्टलवर 'मेरी माटी, मेरा देश' मोहिमेतील विविध उपक्रमांची संबंधित माहिती देण्यात आली आहे. तरूणांनी या वेबसाइटवर सेल्फी आणि रोपे लावण्यासारखे उपक्रम अपलोड करून या पोर्टलद्वारे मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. युवक-युवतींनी या मोहिमेत उत्साहाने सहभागी व्हावे, तसेच आपल्या शूरवीरांना आणि आपल्या मातृभूमीला आदरांजली वाहण्यासाठी देशव्यापी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

'मेरी माटी, मेरा देश' मोहीम दि. 9 ऑगस्ट रोजी सुरू होईल. दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनापर्यंत नियोजित कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर दि. १६ ऑगस्ट २०२३ पासून गट, नगरपालिका, नगरपरिषद आणि राज्यस्तरावर होणार आहेत. दि. ३० ऑगस्ट २०२३ रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे समारोप होणार आहे.

 

 

गजानन कोटुरवार,

जिल्हा माहिती अधिकारी,

बुलडाणा.

9881102080

00000

No comments:

Post a Comment