Tuesday 8 August 2023

DIO BULDANA NEWS 08.08.2023




 बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात टास्क फोर्सची निर्मिती

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 8 : जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण कमी असले तरी समोर आलेल्या प्रकरणांमध्ये अत्यंत लहान वयात मुलींचे विवाह लावण्यात येत असल्याची बाब दिसून आली आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामस्तरापासून ही समिती कार्य करणार असून बालविवाहाचे प्रकरण आढळून आल्यास गुन्हे नोंदविण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दिले.

बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाची अंमलबजावणी संदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, जिल्ह्यात गेल्या सात महिन्यात 31 बालविवाह रोखण्यात आले आहे. यात बुलडाणा, मोताळा आणि चिखली तालुक्यात अधिक प्रमाण आहे. बालविवाह बाबत गुन्हे नोंदविण्याची तरतूद अधिनियमात आहेत. मात्र गावपातळीवर होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. नुकताच एका प्रकरणी दि. 4 ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हे नोंदविण्यासोबतच बालविवाहाबाबत समाजात जाणीव करून देणे महत्वाचे आहे. बालविवाह रोखण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. गावपातळीवर ग्रामसेवक हे कार्यरत असल्यामुळे त्यांच्याकडून याबाबत माहिती घेण्यात यावी.

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांची टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. त्यासोबतच यात दोन अशासकीय सदस्य निवडण्यात येणार आहे. ही समिती विवाहासाठी आवश्यक असणारे घटक आणि सेवा देणाऱ्याशी संपर्कात राहणार आहे. बालविवाहाबाबत त्यांना माहिती देण्यात येणार आहे. बालविवाह होत असल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाल्यास त्वरीत कार्यवाही करण्यात येणार आहे. 18 वर्षाखालील मुलीचा विवाह होत असल्याचे निदर्शानास आल्यास गुन्हे नोंदविण्यात येणार आहे.

विवाहासाठी सेवा देणारे मंदिर, सभागृह, छपाई, मंडप व्यावसायिक, विधी करणारे भटजी, मौलवी, भंते आदींची बैठक घेऊन त्यांना बालविवाहाबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच समाजात बालविवाह होत असल्यास त्याची माहिती प्रशासनास देण्यात यावी, असे आवाहन करण्यात येणार आहे. बालविवाह समोर येण्यासाठी ग्रामसेवक आणि ग्रामस्तरीय समितीची भूमिका महत्वाची आहे. तसेच सर्व विभागांनी बालविवाह रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

00000




सखी वन स्टॉप सेंटरचे उत्कृष्ट व्यवस्थापन करावे

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 8 : जिल्ह्यात संकटग्रस्त महिला आणि बालकांच्या निवाऱ्यासाठी सखी वन स्टॉप सेंटर उभारण्यात आले आहे. सध्या स्वयंसेवी संस्थेतर्फे सेंटर चालविण्यात येत आहे. शासनाच्या निर्णयानुसार आता व्यवस्थापन समिती सेंटरची देखरेख करणार आहे. या समितीने सेंटरचे उत्कृष्‍ट व्यवस्थापन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दिले.

सखी वन स्टॉप सेंटर कार्यान्वित करण्यासंदर्भात शासनाने नवे निर्देश दिले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे, कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाउंडेशनचे महेंद्र सौभागे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, सखी वन स्टॉप सेंटर ही संकटग्रस्त महिला आणि 12 वर्षाखालील मुलांना आश्रय देण्यात येतो. कौटुंबिक हिंसाचार पिडीत, लैंगिक शोषणाच्या पिडीत, मानवी वाहतुकीस बळी पडलेल्या महिलांना वैद्यकीय सुविधा, पोलिस मदत आणि समुपदेशन व कायदेशिर मदत उपलब्ध करून देण्यात येते. आतापर्यंत 204 महिलांना या ठिकाणी मदत करण्यात आली आहे. सेंटर सुरळीत चालण्यासाठी आतापर्यंत कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यात आली. मात्र नव्या निर्देशानुसार आता शासनाला या सेंटरचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना कोणताही मोबदला देण्यात येणार नाही.

सेंटरमध्ये आश्रय देण्यात येणाऱ्या महिलांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी. महिलांना चांगला आहार मिळावा, यासाठी पुरवठादाराची नियुक्ती करण्यात यावी. या महिलांना सेवा-सुविधा दिल्यानंतर या महिलांचा काही काळ मागोवा घेण्यात यावा. तसेच सेंटरच्या बांधकामासाठी जागा उपलब्ध करून घ्यावी. इमारतीचे बांधकाम झाल्यास याठिकाणी योग्य सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. या ठिकाणी बालगुन्हेगार आणि मनोरूग्ण ठेवता येत नाही. बालगुन्हेगांराना याठिकाणी ठेवायचे असल्यास त्याचे पत्र देण्यात यावे. तसेच या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांचे नियमित मानधन देण्यात यावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

000000

महाडीबीटी हेल्पडेस्क दूरध्वनी क्रमांकात बदल

       बुलडाणा, दि. 8 : महाडीबीटी संदर्भात येणाऱ्या विविध अडचणींचे निराकरण करण्यासाठी कृषि आयुक्तालय स्तरावर 020-26111126 हा शेतकरी हेल्पडेस्क दूरध्वनी क्रमांक कार्यरत आहे. सदर क्रमांक बंद करण्यात आला आहे. दि. 1 ऑगस्ट 2023 पासून शेतकरी हेल्पडेस्क सेवा महाआयटी स्तरावरून सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी नवीन क्रमांक 022-61316429 कार्यरत करण्यात आला आहे.

महाडीबीटी संदर्भातील सर्व अडचणींच्या निराकरणासाठी क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी, कार्यालये, समूह सेवा केंद्र आणि शेतकरी यांनी यापुढे 022-61316429 या शेतकरी हेल्पडेस्क क्रमांकाचा उपयोग करावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

00000

बांधकाम कामगारांनी अमिषाला बळी पडू नये

*कामगार मंडळाचे आवाहन

बुलडाणा, दि. 8 : बांधकाम कामगारांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता नोंदणी व नुतनीकरण करुन घ्यावे, फसवणूक झाल्यास कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. तसेच अतिरिक्त रक्कम मागणी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध नजिकच्या पोलिस ठाण्यात परस्पर तक्रार नोंदवावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आ. शि. राठोड यांनी केले आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या असंघटित कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व विविध योजनांच्या लाभ वाटपाचे काम सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातर्फे ऑनलाईन पद्धतीने केले जाते. या कामकाजासाठी कोणत्याही खासगी प्रतिनिधी अथवा एजंट, दलाल यांची नेमणूक करण्यात आली नाही. संबंधित कामगारांना अर्ज नोंदणीसाठी वार्षिक एक रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. त्याची रीतसर पावती देण्यात येते. या व्यतिरिक्त या कार्यालयाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने कळविले आहे.

00000

पौष्टिक तृणधान्य जनजागृतीसाठी विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम

बुलडाणा, दि. 8 : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या आहारात पौष्टिक तृणधान्य पदार्थांचा वापर वाढविण्यासाठी विद्यार्थी पोषण जागरूकता अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि. 1 ते 14 ऑगस्ट 2023 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याचे महत्व पटवून देण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

सन 2023-24 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यात येत आहे. सध्याच्या जीवनशैलीत सर्व वयोगटातील लोकांच्या विशेषतः विद्यार्थ्यांच्या आहारातील पौष्टिक तृणधान्याच्या पदार्थांचा वापर कमी होत आहे. जिल्ह्यात पौष्टिक तृणधान्याच्या उत्पादनात वाढ करणे आणि नागरिकांमध्ये पौष्टिक तृणधान्यामधील गुणधर्म याविषयी जागरूकता निर्माण करून दैनंदिन आहारात त्यांचा समावेश करण्यासाठी कृषी आणि सलग्न विभागांच्या सहकार्याने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

ऑगस्ट महिन्यात मिलेट ऑफ द मंथ संकल्पनेनुसार राजगिरा या पिकाकरीता समर्पित आहे. राजगिरा शरीरासाठी अत्यंत गुणकारी असल्याने सूपर फुड म्हणून प्रचलित आहे, ग्लुटेन फ्री, फायबरनी  युक्त आहे. त्यामुळे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. यामध्ये विटामिन सी भरपूर मात्रेत असल्याने त्वचा, केस आणि हिरड्यांच्या विकारांवर उपयुक्त आहे. स्तनदा मातांसाठी दुग्धवाढीकरिता राजगिरा उपयुक्त आहे. राजगिऱ्यामधील रक्तस्थंभक गुणधर्म हा रक्तस्त्राव थांबविण्यास मदत करतो. 

राजगिरापासून राजगिरा पराठा तयार करण्यात येतात. यासाठी गव्हाचे पीठ 50 ग्रॅम, राजगिऱ्याची ताजी पाने 10 ग्रॅम, ओवा            1 ग्रॅम, लसन अद्रक पेस्ट  अर्धा चमचा, तिखट अर्धा चमचा, हळद, जिरेपूड,  कोथींबीर 2 ग्रॅम, चवीनुसार मीठ साहित्य लागते. राजगिऱ्याची पाने व कोथींबीर धुवून चिरून घेणे. पिठामध्ये सर्व साहित्य मिसळून तिंबून घेणे. समान आकाराचे गोळे करून पराठा लाटून घ्यावे. तव्यावर तेल टाकून लाटलेला पराठा दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यावा. तयार झालेला पराठा दही, चटणी लोणची यासोबत खाता येतो.

राजगिरा दाल फ्राय तयार करण्यासाठी तुरीचे किंवा मुगाचे वरण 1 वाटी, लसून 2 पाकळ्या, बारीक कापलेली राजगिऱ्यांची पाने पाव वाटी, टोमॅटो 10 ग्रॅम, हिरवी मिरची 2 ग्रॅम, जिरे आणि मोहरी 1 ग्रॅम, चवीनुसार मीठ साहित्य लागते. तेल गरम करून जिरे, मोहरी, हिरवी, मिरची, ठेचलेला लसूण आणि टाकून फोडणी तयार करणे. हळद, टोमॅटो, राजगिऱ्याची पाने आणि मीठ टाकून शिजवणे. नंतर शिजलेली डाळ टाकणे आणि टाकून उकणे. कोथिबीर टाकून वरण खाण्यास देता येते. राजगिऱ्याचे मुटके तयार करण्यासाठी गव्हाचे पीठ 50 ग्रॅम, ज्वारी पीठ 25 ग्रॅम, हरभरा डाळीचे पीठ 25 ग्रॅम, राजगिराच्या पाने 10 ग्रॅम, तिखट अर्धा चमचा, हळद पाव चमचा, ओवा आणि जिरेपुड अर्धा चमचा,  चवीनुसार मीठ, कोथिंबीर 2 ग्रॅम साहित्य लागते. राजगिऱ्याची पाने व कोथिंबीर धुवून चिरून घ्यावी. सर्व  पीठे आणि उर्वरित साहित्य, तसेच राजगिरा पाने, कोथिंबीर, तेलाचे मोहन आणि पाणी टाकून घट्ट मऊसर पीठ मळून घ्यावे. भिजलेल्या पिठाचे मुटके बनवून घ्यावे. पातेल्यात पाणी घेऊन भिजवलेल्या पिठाचे मुटके बनवून घेणे. पातेल्यात पाणी घेऊन उकळणे. पातेल्यावर स्टीलच्या चाळणीला तेल लावून तयार केलेले मुटके वाफावण्यास ठेवणे. मुटके शिजल्यावर त्यावर आवडत असेल तर मोहरी, जिरे आणि कडीपत्याची फोडणी टाकून दह्याच्या चटणीसोबत गरम खाण्यास देता येते. 

00000

जागतिक आदिवासी अस्मिता दिवसाचे आयोजन

बुलडाणा, दि. 8 : अकोला येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे बुधवार, दि. 9 ऑगस्ट 2023 रोजी जागतिक आदिवासी अस्मिता दिवस व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अकोला येथे करण्यात येणार आहे.

अकोला येथील रौनक मंगल कार्यालय, गुडधी रोड, मोठी उमरी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

00000



अविनाश निवलकर अधीक्षक पदी रुजू

बुलडाणा, दि. 8 : माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकपदी अविनाश निवलकर रूजू झाले आहेत.

श्री. निवलकर यापूर्वी जिल्हा परिषद शालेय पोषण आहार विभागात 12 वर्षे कार्यरत होते. अधीक्षकपदी रूजू झाल्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, सहायक लेखाधिकारी जी. एस. बोरले, नितीन बारी, दिलीप टेकाळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

00000

क्रीडांगण विकास अनुदान योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करावेत

*क्रीडा विभागाचे आवाहन

          बुलडाणा, दि. 8 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे अनुसूचित जाती उपयोजना क्रीडांगण विकास अनुदान योजनेंतर्गत विविध अनुदानित शाळा, क्रीडा संस्था यांना विविध पायाभूत सुविधांसाठी अनुदान देण्यात येते. यासाठी दि. 22 ऑगस्ट पूर्वी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेतून क्रीडांगण समपातळीत करणे, क्रीडांगणावर 200 मीटर, 400 मीटर धावनमार्ग तयार करणे, क्रीडांगणाभोवती भिंती, तारेचे कंपाऊंड बांधणे, क्रीडांगणावर विविध खेळांची प्रमाणित आकारांची मैदान तयार करणे, क्रीडांगणावर प्रसाधनगृह बांधणे, क्रीडांगणावर पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडांगणावर भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर फ्लड लाईटची सुविधा तयार करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर माती, सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे, मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे, मैदानावर रोलींग करण्यासाठी मिनी रोलर खरेदी करणे यासाठी सात लाख रुपयांपर्यंत अंदाजपत्रक आणि दरपत्रकाच्या अनुषंगाने मंजूर करण्यात येते.

अनुदान घेऊ इच्छिणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजित केलेली जागा शासनाने घोषित केलेल्या दलित वस्तीत असणे आवश्यक आहे, तसे प्रस्तावासोबत गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरी, शिक्यानिशी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच संस्थेच्या नावे सातबारा असणे आवश्यक आहे. अनुदानाकरिता पात्र संस्थांचा प्राथम्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतिगृह तसेच क्रीडा विभागाची संकुले, पोलीस विभागांतर्गत कल्याण निधी समिती, शासकीय स्पोर्ट क्लब, शासकीय महाविद्यालये, शिक्षण विभागाच्या अनुदानित प्राथमिक, माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालये राहणार आहे.

अनुसूचित जाती उपयोजनेच्या अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या संस्थांनी दि. 18 ऑगस्ट 2023पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून विहित नमुना प्राप्त करुन, आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दि. 22 ऑगस्ट 2023पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

‘मेरी माटी, मेरा देश’ मोहिमेत आज पंचप्रण शपथ

*नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 8 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोप निमित्त मेरी माटी मेरा देश मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेस बुधवार, दि. 9 ऑगस्ट पासून सुरवात होणार आहे. मोहीमेत पहिल्या दिवशी सकाळी 10 वाजता पंचप्राण शपथ घेण्यात येणार आहे. यात नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवहन करण्यात आले आहे.

मेरी माटी, मेरा देश मोहीमेतून आपल्या मातीविषयी प्रेम निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शालेय प्रांगणात शिलाफलकाची उभारणी, पंचप्रण शपथ व सेल्फी, वसुधा वंदन, वीरांना वंदन, ध्वजारोहण व राष्ट्रगाण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानात ग्रामपंचायत स्तरापासून ते महानगरापर्यंत सर्व स्थानिक स्वराज संस्थांनी तसेच राज्य शासनाचे विभाग विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, तसेच नागरिकांनी सकाळी 10 वाजता पंचप्रण शपथ घ्यावी. शपथ घेतल्याचे छायाचित्र yuva.gov.in/meri_maati_mera_desh या संकेतस्थळावर सेल्फी अपलोड करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी केले आहे.

00000


No comments:

Post a Comment