Wednesday 23 August 2023

DIO BULDANA NEWS 23.08.2023

 नवभारत साक्षरता कार्यक्रमात निरक्षराचे सर्वेक्षण

*जिल्ह्यातील निरक्षरांचा नव्याने शोध

बुलडाणा, दि. 23 : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमात दि. ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण १२ लाख ४० हजार निरक्षर नागरिकांना शोधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण शिक्षण विभाग करणार आहे.

शिक्षण विभागातर्फे शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, गटशिक्षणाधिकारी यांना सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्वेक्षणासाठी आवश्यक प्रपत्रेही पुरविण्यात आली आहेत. दरम्यान निरक्षरांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षण विभागाकडे आहे. शिक्षकांना प्रत्यक्ष वस्ती, वाडी, गाव, खेडी, तांडे, शेतमळा, वार्ड अशा ठिकाणी सर्वेक्षण करावयाचे आहे.

निरक्षरांच्या सर्वेक्षणामध्ये निरक्षराचे नावे, लिंग, जात प्रवर्गनिहाय अद्यावत माहिती संकलित करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील निरक्षरांची संख्या निश्चित होणार आहे. या निरक्षरांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने शिक्षण उपलब्ध करुन देणे हा सर्वेक्षणाचा उद्देश आहे. सदर सर्वेक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील निरक्षरांची संख्या कळणार आहे.

सर्वेक्षण हे शाळा भरण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर केले जाणार आहे. १५ वर्षे व त्यापुढील सर्व निरक्षरांचा यात समावेश केला जाणार आहे. या कालावधीत शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही सर्वेक्षण एकत्रित होणार आहेत. त्यासाठी शाळा हे युनिट म्हणून काम करणार आहे. निरक्षरांच्या सर्वेक्षणात शिक्षक घरोघरी जाऊन ही माहिती गोळा करणार आहेत, यामध्ये निरक्षर संख्या, लिंग, प्रवर्ग, दिव्यांग, शिकण्याचे माध्यम अशा विविध बाबीनुसार स्वतंत्रपणे विश्लेषण कले जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांची सर्वेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

जनगणना २०११ मधील माहितीनुसार गावनिहाय निरक्षरांची आकडेवारी प्राप्त आहे. परंतु गावनिहाय निरक्षरांची नावे अप्राप्त आहेत. त्यामुळे १५ वर्षे वयापुढील निरक्षरांची वास्तविक आकडेवारी कळावी, यासाठी जिल्हाभरात ५ हजार ४५१ सर्वेक्षकांच्या मदतीने सदर सर्वेक्षण दि. ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

00000



आंतरराष्ट्रीय युवादिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

बुलडाणा, दि. 23 : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय बुलडाणा व बुलडाणा जिल्हा एथेलेटिक असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने एचआयव्ही एड्स जनजागृती करिता बुधवार, दि. २३ ऑगस्ट रोजी वतीने मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या सुरवातीला एचआयव्ही, एड्सबाबत आणि तंबाखू नियंत्रणाची शपथ घेण्यात आली. युवक आणि एचआयव्ही, एड्सबाबत माहिती, तसेच टोल फ्री क्रमांक १०९७ बाबत माहिती देण्यात आली. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवली. स्पर्धेत १०६ मुलामुलींनी सहभाग घेतला. स्पर्धेत मुलांमधून प्रथम सुजित जाधव, द्वितीय महेश ढोले, तृतीय साहिलसिंग राजपूत, तसेच मुलींमध्ये प्रथम प्रणाली शेगोकार, द्वितीय आकांक्षा निंबाळकर, तृतीय ज्योती आराख यांनी मिळवला. त्यांना पारितोषिके, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भागवत भुसारी, डॉ. घोंगटे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले, एआरटी सेंटर वैद्यकीय अधिकारी डॉ. लता भोसले, जिल्हा ॲथलेटिक असोशिएशनचे गोपालसिंग राजपूत, विजय वानखडे, महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य नंदूराम गायकवाड, प्रा. अविनाश गेडाम उपस्थित होते.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागातील जिल्हा पर्यवेक्षक गजानन देशमुख, भागवत कव्हळे, अश्विनी वैष्णव, संदिप राऊत आयसीटीसी विभागातील नरेंद्र सनांसे, पियूष मालगे, इंदू मोरे, भावना कॅम्बेल, एसटीडी समुपदेशक भारत कोळे, एआरटी विभागातील डाटा मॅनेजर लक्ष्मीकांत गोंदकर, समुपदेशक प्रदीप बंबटकार, मिलींद इंगोले, दिपक गवई यांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले.

00000

शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्रावर तासिका तत्वावर पदभरती

बुलडाणा, दि. 23 : बुलडाणा येथील शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र, पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम नववी आणि दहावीकरिता तासिका तत्वावर शिक्षकांची संस्‍था स्तरावर ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे शिकविण्यासाठी पदे सन 2023-24 करीता भरण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजीसाठी 1 पद असून शैक्षणिक अर्हता डिप्लोमा, बीई इलेक्ट्रीकल आणि एक वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. पूर्व व्यासायिक अभ्यासक्रम मेकॅनिकल टेक्नॉलॉजीसाठी 1 पद असून डिप्लोमा, बीई मेकॅनिकल आणि एक वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

अभ्यासक्रम शिकविण्याकरिता अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात घड्याळी तासिका तत्वावर शिकविण्याचे काम देण्यात येणार आहे. वरील पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी सर्व मुळ प्रमाणपत्रासह आणि छायांकित प्रतीसह दि. 31 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता मुख्याध्यापकांच्या दालनात स्व:खर्चाने प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहावे. सदर पदांवरील उमेदवारास शासकीय नियमानुसार मानधन देय राहणार आहे, असे शासकीय तंत्र माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापकांनी कळविले आहे. 

00000


No comments:

Post a Comment