Tuesday 29 August 2023

DIO BULDANA NEWS 29.08.2023

 खरीप हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट

शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 29 : जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा, यासाठी पिक स्पर्धा खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त कृषी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या 11 पिकांसाठी पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पीकस्पर्धेसाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम 300 रुपये व आदिवासी गटासाठी रक्कम 150 रुपये आहे. स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी शेतकऱ्याकडे स्‍वतःच्‍या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्‍यक आहे.

स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेसाठी सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची  भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर (1 एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतक-यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्जासोबत विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन,  7/12, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक, पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत ही कागदपत्रे जोडावी लागणार आहे.

पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरूप हे सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम ही तालुका पातळीवर पहिले बक्षीस 5 हजार रूपये, दुसरे बक्षीस तीन हजार रूपये, तिसरे बक्षीस 2 हजार रूपये, जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस 10 हजार रूपये, दुसरे बक्षिस 7 हजार रूपये, तिसरे बक्षीस 5 हजार रूपये, तसेच राज्यपातळीवर पहिले बक्षीस 50 हजार रूपये, दुसरे बक्षिस 40 हजार रूपये व तिसरे  बक्षीस 30 हजार रूपये याप्रमाणे आहे.

खरीप हंगाम सन 2023 पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभागाचे संकेतस्थळ krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment