Monday 14 August 2023

DIO BULDANA NEWS 14.08.2023

 जिल्हाधिकारी कार्यालयात आज ध्वजवंदन

बुलडाणा, दि. 14 : स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन आणि संचलन होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.

00000

स्वातंत्र्यदिनी तंबाखू मुक्तीची शपथ

बुलडाणा, दि. 14 : तंबाखू सेवनाच्या दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्यासाठी मंगळवार, दि. 15 ऑगस्ट रोजी ध्वजवंदनानंतर तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात येणार आहे.

सन 2019 च्या जागतिक युवा तंबाखूच्या अहवालानुसार राज्यात 5.1 टक्के विद्यार्थी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करतात. त्यापैकी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्याचे प्रमाण मुलांमध्ये 5.8 टक्के मुले, तर मुलींमध्ये 4.4 टक्के आहे. हे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृती हे प्रभावी ठरणार आहे. त्यानुसार दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक ठिकाणी ध्वजारोहणानंतर तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात येणार आहे.

धुम्रपान करणारे व धुम्रपान न करणारे यांच्याकरीता तंबाखू मुक्तीविषयी जनजागृती होणे आणि आपला परिसर आणि शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृती करण्यासाठी तंबाखू मुक्तीची शपथ हे प्रभावी माध्यम आहे. दि. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त सार्वजनिक ध्वजारोहणानंतर तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल 18 ऑगस्टपर्यंत जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागणार आहे.

सन 2019-17 पासून संपूर्ण राज्य तंबाखू मुक्त करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात 34 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.

तंबाखू तथा तंबाखू जन्य पदार्थांच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, मुख कर्करोग यासारखे अनेक दुर्धर आजार होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2004 च्या अहवालानुसार भारतात प्रतिवर्षी 8 ते 9 लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारामुळे होतो.

सन 2016-17 च्या ग्लोबल अडल्ड टोबॅको सर्व्हेच्या अहवालानुसार राज्यात 6 टक्के पुरुष आणि 1.4 महिला असे 3.8 टक्के प्रौढ व्यक्ती धुरसहित तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. 31.7 टक्के पुरुष आणि 16.6 टक्के महिला, असे एकूण 24.4 टक्के प्रौढ व्यक्ती धूरविरहित तंबाखूचे सेवन करतात. हे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत राज्यामध्ये कमी असले तरी धुरविरहीत तंबाखू सेवनाचे प्रमाण जास्त आहे.

000000

चिखली, मोताळा आयटीआयमधील

स्मार्ट क्लास रूमचे आज उद्घाटन

बुलडाणा, दि. 14 : चिखली आणि मोताळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. १५ ऑगस्ट रोजी स्मार्ट क्लास रूमचे उद्घाटन होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित राहतील. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिखली येथील कार्यक्रमाला आमदार श्वेता महाले उपस्थित राहणार आहेत. सि्कल इंडिया आणि डिजीटल इंडिया या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांपैकी पहिल्या टप्यात राज्यातील ७५ संस्थांमध्ये उपक्रम राबविण्यात येणार आहे. यानिमित्ताने ७५ व्हर्च्यूअल क्लास रूमचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात दुरदृश्य प्रणालद्वारे होईल. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आयुक्त एन. रामास्वामी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक, डिगांबर दळवी उपस्थित राहतील.

00000

बुधवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

बुलडाणा, दि. 14 : जिल्हा रूग्णालयात नियमितपणे दिव्यांग तपासणी शिबी घेण्यात येते. मात्र बुधवार, दि. 16 ऑगस्ट 2023 रोजी तपासणीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे शिबीर रद्द करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात नियमित बुधवारी मतिमंद, मनोरूग्ण, कान, नाक, घसा व नेत्र संबंधित दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र बुधवार, दि. 16 ऑगस्ट 2023 रोजी पारशी नववर्ष दिनानिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे या दिवसाचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.  

00000

भारतीय डाक विभागाची राष्ट्रीय पातळीवरील पत्रलेखन मोहीम

बुलडाणा, दि. 14 : डाक विभागातर्फे तरुण पिढीला जोडण्यासाठी आणि मुलांमध्ये पत्र लेखनाचा छंद जोपासण्यासाठी ‘ढाई आखर’ उपक्रम राबविला जातो. या उपक्रमात राष्ट्राशी संबंधित महत्वाच्या मुद्यांवर तरुण पिढीचे विचार मांडण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी राष्ट्रीय पातळीवरील पत्रलेखन मोहीम दि. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत आयोजित केली आहे.

यावर्षी डिजीटल इंडिया फॉर न्यू इंडिया याविषयावर विद्यार्थ्यांच्या कल्पना मांडण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. ढाई आखर पत्रलेखन मोहिम 2023-24 मध्ये दोन श्रेणी आहे. पत्र हे आंतरदेशीय पत्रावर जास्तीत जास्त 500 शब्द अथवा ए4 आकाराच्या कागदावर जास्तीत जास्त 1000 शब्दांमध्ये हाताने लिहून लिफाफा किंवा आंतरदेशीय पत्र हे मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, महाराष्ट्र 400 001 यांच्या नावे पाठवावे. तसेच त्यावर ‘मी प्रमाणित करतो की मी दि. 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्षापेक्षा कमी/वरील आहे.’ असे नमूद करावे. महाराष्ट्र सर्कल पातळीवर पहिले पारितोषिक 25 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 10 हजार रूपये, तृतीय पारितोषिक 5 हजार रूपये आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, तसेच तरुण पिढीने यात सहभागी होऊन राष्ट्राशी संबंधित मुद्यावर विचार मांडावे, असे आवाहन डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.

0000000

भारतीय डाक विभागाची दिनदयाल फिलाटेली शिष्यवृत्ती योजना

* 31 ऑगस्ट 20223 पर्यंत अर्ज सादर करावे

          बुलडाणा, दि. 14 : भारतीय डाक विभागातर्फे दरवर्षी शालेय विद्यार्थ्यामध्ये फिलाटेली मार्फत फिलॅटेलीक स्टॅम्पची माहिती तसेच स्टॅम्प संग्रहाबद्दल आवड निर्माण व्हावी, यासाठी दिनदयाल शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. यावर्षीच्या दिनदयाल शिष्यवृत्ती योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी  31 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

या योजनेचा मूळ हेतू हा विद्यार्थ्यांमध्ये डाक विभागाप्रती आवड निर्माण व्हावी हा आहे. या योजनेतून फिलॅटेली छंद म्हणून जोपासणाऱ्या भारतातील 920 विद्यार्थ्यांना सहा हजार रूपये प्रती वर्षप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन डाक अधीक्षक गणेश अंभोरे यांनी केले आहे.

00000

 

विशेष लेख 

स्वातंत्र्य संग्रमातील स्मृती…:  

अठराशे सत्तावनचा उठाव…

भारतीयांनी 1857 मध्ये इंग्रजी सत्तेविरुद्ध केलेला उठाव. काही इतिहासकार या उठावास बंड म्हणतात, तर काही त्यास स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवितात. 1857 च्या उठावामागे राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक व लष्करी अशी अनेकविध कारणे होती. अशा या ऐतिहासिक उठावाचा घेतलेला आढावा…

डलहौसी या गव्हर्नर जनरलने 1857 पूर्वी आसाम, कूर्ग, सिंध, पंजाब व ब्रह्मदेशातील पेगू हे प्रांत हस्तगत केले होते. गादीचे दत्तक वारस नामंजूर करून सातारा, झाशी, नागपूर, ओर्च्छा, जैतपूर, संबळपूर अशी संस्थाने खालसा केली. त्याच मुद्द्यावर दुसऱ्या बाजीरावाचा दत्तक मुलगा नानासाहेब याचा तनखा बंद केला. अव्यवस्थित कारभाराच्या निमित्ताने डलहौसीने अयोध्येचे राज्य व निजामाचा वऱ्हाड प्रदेश ताब्यात घेतला. त्यामुळे लहानमोठ्या सर्व संस्थानांत असंतोष निर्माण झाला होता.

संस्थाने खालसा झाल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले लोक व सैनिक बेकार झाले. 1833 पासून 1857 पर्यंत इंग्रजांनी साम्राज्य-विस्तारासाठी अनेक युद्धे केली. या युद्धांचा खर्च हिंदी जनतेवर डोईजड कर बसवून वसूल केला होता. पाश्चात्त्य वस्तूंवरील आयात कर माफ केल्यामुळे इंग्रजी मालाला उठाव मिळाला व देशी उद्योगधंदे बंद पडले. हिंदुस्थानचे दारिद्र्य वाढले. इंग्रजी अंमलात जमीनदार, वतनदार, शेतकरी यांचे हाल झाले. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्‍यांनी दुष्काळ, अवर्षण यांचा विचार न करता जमिनीची पहाणी करून जमीनमहसुलाचे कमाल आकार ठरवून दिले. जमिनीच्या मालकाकडे सरकारी देणे राहिल्यास कंपनीचे अधिकारी जमिनी जप्त करीत किंवा विकून टाकीत. यामुळे शेतकरी व जमीनदार यांचे हाल झाले. जमिनीच्या साऱ्‍यासंबंधीच्या नवीन नियमांनुसार सरकार व शेतकरी यांच्यामधील मध्यस्थ काढून टाकल्यामुळे तालुकदारांना काम उरले नाही. 1852 मध्ये डलहौसीने सरदार, इनामदार यांचे हक्क तपासण्यासाठी नेमलेल्या इनाम आयोगाने 32 हजार इनामांची चौकशी केली. मालकीचा पुरावा नसलेल्या 21 हजार वतनदारांची वतने जप्त केली. वारस नाही म्हणून आंग्रे यांचे संस्थान खालसा केले.

कंपनी सरकार व हिंदी सैनिक यांत बरेच दिवस तेढ निर्माण झाली होती. या उठावापूर्वी हिंदी सैनिकांनी 1806 पासून 1850 पर्यंत वेलोर, बरेली, बराकपूर, जबलपूर, फिरोझपूर इ. ठिकाणी बंडे केली होती. हिंदी सैन्याच्या बळावर इंग्रजांनी आपली सत्ता बळकट करून साम्राज्यविस्तार केला होता. परंतु पदव्या व बक्षिसे मात्र इंग्रज अधिकाऱ्‍यांनाच दिली जात. हिंदी सैनिकांना दूरवरच्या आघाड्यांवर जाण्यासाठी दिलेला जादा भत्ता बंद केला होता. 1857 च्या सुमारास ब्रिटिशांचे हात यूरोप, चीन आणि इराण येथील युद्धांत गुंतले असल्यामुळे कलकत्ता ते अलाहाबाद या प्रदेशात फक्त एकच यूरोपीय पलटण होती. मुख्य लष्करी ठाणी हिंदी सैन्याच्या हातात होती. कंपनी सरकारचे राज्य हिंदी सैन्यावर अवलंबून आहे, अशी समजूत लष्करात पसरली. यातच 1856 मध्ये कॅनिंगने सैन्यातील शिपायांनी हिंदुस्थानच्या बाहेर गेले पाहिजे, असा हुकूम काढला. या असंतोषात काडतूस-प्रकरणाने प्रक्षोभ निर्माण केला. हिंदूंना पवित्र असलेल्या गायीची किंवा मुसलमानांना निषिद्ध असलेल्या डुकराची चरबी काडतुसांना लावलेली असल्यामुळे हिंदू व मुसलमान यांच्या भावना दुखावल्या गेल्या.

1857 च्या जानेवारी—फेब्रुवारी महिन्यांत डमडम व बराकपूर येथे काडतूस-प्रकरणावरून गडबड झाली. मीरत येथील शिपायांनी नवी काडतुसे वापरण्याचे नाकारल्यामुळे त्यांना कैद केले गेले. शिपायांनी सरकारी इमारती जाळण्यास सुरुवात केली. 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे व इंग्रज अधिकारी यांच्यात चकमक झाली. मंगल पांडे यास पकडून 8 एप्रिल 1857 रोजी फाशी देण्यात आले. येथूनच उठावास सुरुवात झाली. हा उठाव सप्टेंबर 1858 पर्यंत चालू राहिला. या काळात बराकपूर, लखनौ, मीरत, दिल्ली, लाहोर, फिरोझपूर, अलीगढ, पेशावर, मथुरा, झांसी, आग्रा, बरेली, कानपूर, अलाहाबाद इ. ठिकाणी लहान मोठ्या प्रमाणात गडबडी झाल्या. या उठावाचे महाराष्ट्रात पडसाद उठले. इंग्रजी सत्ता खिळखिळी करण्यासाठी व सातारच्या गादीचे पुनरुत्थान करण्यासाठी सातारकरांचा वकील रंगो बापूजी याने सातारा, पुणे, कोल्हापूर येथे गुप्त कारस्थाने सुरू केली. नानासाहेब पेशव्याचे दूत ग्वाल्हेरचे ज्योतिराव घाटगे व निंबाळकर यांनी कोल्हापूरात उठाव केला. इंग्रजांनी हा उठाव मोडून काढला. उत्तरेत उठावातील लोकांनी प्रथम 11 मे 1857 रोजी दिल्ली ताब्यात घेतली. बहादुरशाहाला हिंदुस्थानचा बादशहा म्हणून जाहीर केले. परंतु थोड्याच दिवसांत लॉरेन्सने दिल्ली पुन्हा सोडवून घेतली. ऊट्रम व हॅवलॉक यांनी लखनौ येथील उठाव मोडले. ड्यूरंडने माळव्यातील उठावाचा बंदोबस्त केला. मार्च 1858 मध्ये इंग्रजांनी झाशीला वेढा दिला. ह्यू रोझ व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यात लढाई होऊन इंग्रजांनी झाशीचा कब्जा घेतला. पुढे राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे दोघे ग्वाल्हेर येथे इंग्रजांविरुद्ध लढले.

लढाईत लक्ष्मीबाईंना वीरगती मिळाली. 21 जानेवारी 1859 रोजी राजपुतान्यात सीकार येथे तात्या टोपे व इंग्रज यांच्यात झालेल्या लढाईत तात्या टोपेंचा पराभव झाला, ते पकडला गेले. 18 एप्रिल 1859 ला त्यांना इंग्रजांनी फाशी दिली. नानासाहेब व इंग्रज यांच्यात कानपूर येथे लढाई झाली. नानासाहेब रोहिलखंडाच्या बाजूस गेले असता इंग्रजांनी त्याचा पाठलाग केला. कँबेल याने रोहिलखंडातील उठाव मोडला. नानासाहेबास पकडण्यासाठी इंग्रजांनी 50 हजारांचे बक्षीस जाहीर केले. नानासाहेब व हजरत बेगम हे नेपाळात निघून गेले असावेत. बहादुरशाहास इंग्रजांनी कैद करून रंगूनला पाठवले. या उठावात शिंदे, निजाम, भोपाळच्या बेगमा, नेपाळचा राणा जंग बहादूर यांनी इंग्रजांना मदत केली. पंजाबमधील शीख, काश्मीरचा राजा व कित्येक जमीनदार इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले.

इंग्रजाच्या ताब्यात आलेल्या वऱ्हाड प्रांतात या बंडाच्या काळात पूर्ण शांतता होती. 1857 उठावाचा वीर सेनानी तात्या टोपे हे 1858 मध्ये मध्यभारतातून मेळघाट विभागात आले व त्यांनी तेथील भिल्ल, कोरकु, गोंड या लोकांना इंग्रजाविरुद्ध चिथावले. कॅप्टन मेडोज टेलर हा त्यावेळी या विभागाचा डेप्युटी कमिशनर होता. त्याने मेळघाटच्या राजाच्या इंग्रज भक्तीबद्दल प्रशंसा केली आहे. पुढे अमरावतीला एकत्र झालेली इंग्रजांची फौज घेऊन ब्रिगेडीयर हील हा गाविलगडला गेला आणि कॅप्टन स्कॉटला त्याने वरुडच्या दिशेने पाठवले. बंडवाल्यापासून अमरावतीचे संरक्षण करावे म्हणून इंग्रजांनी अमरावतीचे सभोवार प्रचंड फौज आणि तोफा उभ्या केल्या होत्या. 1857 च्या बंडानंतर सर्वत्र धरपकड सुरु झाली. बंडवाल्या लोकांबरोबर साधु, वैरागी, संन्याशी अशाही लोकांना संशयित म्हणून कंपनी सरकारने पकडल्याचा सपाटा सुरु केला. त्याला कारणही तसेच होते. बंडात भाग घेणारे कित्येकजन आपण पकडले जाऊ नये म्हणून वेश बदलून साधु-सन्यासी बनले होते. 1857 चा उठाव फसल्यानंतर वेश पालटून अनेक संबंधित व्यक्ती देशभराच्या कानाकोपऱ्यात निघून गेल्या होत्या.

हा उठाव यशस्वी होऊ शकला नाही, कारण उठावातील लोकांच्या पुढे निश्चित ध्येय नव्हते. त्यांच्यात एकजूट नव्हती. बरेचसे भारतीय इंग्रजांना फितूर झाले होते. सर्व संस्थानिक उठावात सामील झाले नव्हते.

या उठावाने भारतीय इतिहासाला कलाटणी मिळाली. हिंदुस्थानचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून इंग्लंडच्या संसदेकडे सोपविण्यात आला. इंग्लंडचा राजा हिंदुस्थानचा बादशहा झाला. कंपनीचे ‘बोर्ड ऑफ कंट्रोलʼ रद्द करून ‘इंडिया कौन्सिलʼ नेमण्यात आले. सैन्याची पुनर्रचना करण्यात आली. संस्थानिक व सरकार यांच्यातील संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले. उठाव शमल्यानंतर कॅनिंगने शांतता प्रस्थापित केली. गव्हर्नर जनरल कॅनिंग हा पहिला व्हाइसरॉय झाला.

पुढील काळातील भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात या उठावाची पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणून स्मृती जागी ठेवण्यात आली. 1957 मध्ये भारतभर 1857 च्या उठावाचा शतसांवत्सरिक उत्सव साजरा करण्यात आला.

 

विभागीय माहिती कार्यालय,

अमरावती                                                              

000000

विशेष लेख                                                                     

स्वातंत्र्य संग्रमातील स्मृती…:

 

अमरावती कारागृहात स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी

भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सर्व स्तरातील शुरवीर देशभक्तांनी आपला सहभाग नोंदविला होता. या लढ्यात आपले सर्वस्व झोकून देणाऱ्या स्वातंत्र्यसेनानींना अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात कारावास भोगावा लागला. त्या स्मृती स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज आपण प्रकाशमान करीत आहोत.

मंगळवारी 15 ऑगस्ट 2023 रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा 76 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. संपूर्ण भारत देशवासी हा स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप म्हणून साजरा करीत आहेत. "मेरी माटी मेरा देश" या अभियानांतर्गत देशभर स्वातंत्र्य लढ्यातील शुरवीरांना नमन करण्याबरोबरच विविध देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

भारताच्या स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन समारंभ सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र, हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांना आपल्या जीवाचे बलिदान द्यावे लागले. स्वातंत्र्य संग्राम लढ्यातून हे स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले आहे. स्वातंत्र्यलढ्यात ज्या स्वातंत्र्यसंग्राम सेनानींनी कारावास भोगला, त्यांच्या आठवणी, स्मृती आणि त्यांच्याप्रती आदराची भावना आजही भारतीयांच्या मनात खोलवर कोरल्या गेलेली आहे. अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात स्वातंत्र्य संग्रामाच्या इ.स. 1930 ते 1944 या काळात 51 स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी कारावास भोगला. यात माजी राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी, नीलम संजीव रेड्डी, डॉ. शिवाजीराव पटवर्धन या मान्यवरांचाही समावेश होता. ब्रिटिशांच्या जोखडातून देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सर्वधर्मीयांनी लढा दिला. 9 ऑगस्ट 1942 च्या ‘चलो जाव’चा नारा देण्यात आला. त्यानंतर स्वातंत्र्यलढ्याचे स्फुल्लिंग पेटले. देशवासी रस्त्यावर उतरले. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींना ब्रिटिश शासनकर्त्यांनी तुरुंगात डांबले. ज्या तुरुंगात त्यांना कारावास भोगावा लागला, तेथील दोन बराकी आजही भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या स्मृतींना उजाळा देतात. अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात एक-दोन नव्हे, तर तब्बल 51 जणांना कारावास झाला होता. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींचे जतन, संरक्षण कारागृह प्रशासन आजही करते आहे. स्वातंत्र्य दिन, शहीद दिन आणि प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून या स्मृती स्थळाचे पूजन केले जाते व थोर स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केले जाते. यावर्षीच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपाच्या अनुषंगाने स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजीच्या पूजन साठी व स्मृतिस्तंभास आदरांजली वाहण्यासाठी कारागृह प्रशासनाने तयारी केली आहे.

अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात 1930 ते 1944 या कालावधीत 51 स्वातंत्र्यसंग्राम सेनानींना कारावास झाला होता. त्यावेळी येथील दोन बराकीत स्वातंत्र्यसेनानींना ठेवण्यात आले होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आजतागायत या दोन्ही बराकी स्वातंत्र्यसंग्राम लढ्याच्या स्मृती म्हणून सुव्यवस्थित ठेवल्या जातात. या कारागृहात 51 स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी कारावास भोगला, त्यांची नावे स्मृति स्तंभावर नोंदवून ठेवण्यात आली आहेत. ती नावे पुढीलप्रमाणे आहेत. एम. पल्लम राजू, के.आर. कारंथ, के.पी. अग्नेश्वरिया, के. सुब्बाराव, सी.एन.एम. मुदलियार, आर. नायडू, एम. अप्पलस्वामी, पी. गणपथीराव, के. कलेस्वामी राव, आर.सी. भारती, सी. चट्टेयार, के.के. रेड्डी, एम.बी. नायडू, एम. अनंतशय्यानम अय्यंगार, के. कलप्पा, के.ए. दामोदर मेनन, ए. कुप्परस्वामी मुदलियार, ए. पिल्लाई, एस.एस. कुलकर्णी, व्ही.व्ही.गिरी, नीलम संजीव रेड्डी, एस. सत्यमूर्ती, के. कामराज, टी. प्रकाशम, एम.भक्तवत्सलम्, आर. राघवमेनन, व्ही. राघवैया, टी. विश्वनाथन, कला व्यंकटराव, पी. सीवरनानन, लक्ष्मीनारायण मालाणी, सीताराम जाजू, पार्वतीबाई पटवर्धन, रघुनाथमल कोचर, अब्दुल हसन शेख गुलाम वीर वामनराव जोशी, पी.बी. सदातपुरे, कांताबेन रतनलाल, रामदयाल गुप्ता, रतनलाल बापूजी जैन, पंडित द्वारकाप्रसाद मिश्र, एम.व्ही. अभ्यंकर, शिवाजी पटवर्धन, संभाजी गोखले, पु.का. देशमुख, दिनकर कानडेशास्त्री, डी.बी. सोमण, जी.जी. भोजराज, जी.बी. खेडकर, निळकंठ मुरारी घटवाई.

स्वातंत्र्यसंग्राम लढ्याच्या स्मृतिस्थळाचे गतवर्षी नूतनीकरण करण्यात आले आहे. दरवर्षी राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून येथे पूजन करून स्वातंत्र्यसेनानींच्या स्मृती जागविल्या जातात. या बराकी स्वातंत्र्य लढ्यानिमित्त आजही "जैसे थे" जोपासल्या गेल्या आहेत. स्वातंत्र्यसंग्राम काळातील स्वातंत्र्यसेनानींच्या स्मृती जागविणाऱ्या अशा घटना घडामोडी आजच्या पिढीला नेहमी आपल्या देशप्रेमाची भावना जागृत ठेवण्यास किंबहुना ती अधिक घट्ट करण्यास सतत प्रेरणा देत राहतात. स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी शूरवीरांना त्रिवार वंदन!

 

 

विभगीय माहिती कार्यालय,

अमरावती

00000

No comments:

Post a Comment