Friday 25 August 2023

DIO BULDANA NEWS 25.08.2023




 बुलडाणा येथे मंगळवारी शासन आपल्या दारी कार्यक्रम

*पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांची माहिती

बुलडाणा, दि. 25 : शासन आपल्या दारी उपक्रमात जिल्हास्तरीय कार्यक्रम बुलडाणा येथे मंगळवार, दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आला आहे. परिवहन महामंडळाच्या मागील कऱ्हाडे ले आऊट येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला 25 हजार लाभार्थी उपस्थित राहण्याच्या दृष्टीकोनातून नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी दिनेश गिते, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाले, शासनाच्या विविध विभागांसोबत महिला आर्थिक विकास महामंडळ, बचतगटांचा यात सहभाग असणार आहे. आतापर्यंत पाच लाख 75 हजार लाभार्थ्यांना या अभियानात लाभ देण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या दिवशी आणखी दिड लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. या अभियानात आणखी लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी विविध विभागांकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

कार्यक्रमाच्या नियोजनाची तयारी पूर्ण झाली आहे. परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेमागील जागेत मंडप उभारण्यात येणार आहे. याठिकाणी रोजगार मेळावा, आरोग्य शिबीरासह विविध विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना आणण्यासाठी 350 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना डीबीटी, धनादेश, साहित्य वाटप आदी लाभाचे प्रत्यक्ष वाटप करण्यात येणार आहे. त्यासोबत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले 70 हजार शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू आहेत.

            शासन आपल्या दारी अभियानातून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती विसपुते यांनी केले.

000000

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

*अर्ज दाखल करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 25 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून ओबीसी विद्यार्थ्याकरिता देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लाख, तर परदेशातील शिक्षणासाठी 20 लाख रुपये मर्यादेत कर्ज सुविधा राष्ट्रीयकृत बँकामार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेमध्ये उमेदवाराला बँकेमध्ये भरलेल्या व्याजाच्या 12 टक्के पर्यंत व्याज परतावा मिळणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेसाठी उमेदवाराचे वय हे 17 ते 30 वर्षे असावे, महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याचा पुरावा, ओबीसी असल्याचा जातीचा दाखला, तहसिलदार यांचे 8 लाख रुपयापर्यतचा कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दाखला किंवा नॉन क्रीमेलेअरच्या मर्यादेत, बारावीमध्ये 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. उमेदवार व पालक यांचे आधार कार्ड, फोटो, आधारकार्ड बचत खाते पासबुकला लिंक असावे. वयाचा पुरावा, शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत आवश्यक कागदपत्रे तसेच शैक्षणिक खर्चाचा तपशिलासह महामंडळाच्या msobcfdc.org या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

राज्य-देशांतर्गत तसेच परदेशी अभ्यासक्रमामध्ये येणाऱ्या अभ्यासक्रमात आरोग्य विज्ञानमध्ये सर्व पदवी व पदव्युतर अभ्यासक्रम. अभियांत्रिकीमध्ये सर्व पदवी व पदव्युतर अभ्यासक्रम. व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रमात कृषि, अन्न प्रक्रिया व पशू विज्ञान, दुग्ध विज्ञानमधील सर्व संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश राहणार आहे.

व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी हा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत बँकेने वितरित केलेल्या कर्ज रक्कमेवरील व्याजाची नियमित परतफेड केलेल्या उमेदवाराला केवळ व्याजाचा परतावा उमेदवाराच्या आधार लिंक बँक खात्यात महामंडळ वर्ग करेल. कर्जाचा कालावधी जास्तीत जास्त 5 वर्षे राहणार आहे.

पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळ मजला, त्रिशरण चौक, चिखली रोड, बुलढाणा, दूरध्वनी क्र. 07262-248285. यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या

 कर्ज प्रकरणात एकरकमी परतावा योजना लागू

बुलडाणा, दि. 25 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत लाभार्थींनी घेतलेल्या कर्ज प्रकरणांत संपूर्ण थकीत कर्ज रकमेच्या एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी सुधारीत एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे.

ओबीसी महामंडळाने विविध कर्ज योजनेंतर्गत जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थींना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याज दराने कर्ज वितरीत केले आहे. कर्ज वितरीत झालेल्या लाभार्थींनी या योजनेनुसार संपूर्ण थकीत कर्ज रकमेच्या एकरकमी भरणा केल्यास व्याज रकमेच्या 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तरी महामंडळाच्या थकीत कर्जदारांनी दि. 31 मार्च 2024 पर्यंत थकीत कर्ज भरून या योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, तसेच थकीत मुद्दल व व्याज रकमेचा भरणा करण्यासाठी महामंडळाच्या कार्यालयाला भेट द्यावी किंवा 07262-248285 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा कार्यालय, सामाजिक न्याय भवन, बुलडाणा यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment