Monday 28 August 2023

DIO BULDANA NEWS 28.08.202



 नेहरू युवा केंद्राचा जिल्हास्तरीय युवा उत्सवाची सांगता

बुलडाणा, दि. 28 : नेहरु युवा केंद्र आणि सहकार विद्या मंदिर यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय युवा उत्सव शनिवार, 26 ऑगस्ट रोजी सहकार ऑडीटोरीयम येथे थाटात पार पडला. उत्सवाचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते झाले.

अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुकेश झंवर, मृत्यूंजय गायकवाड, ओमसिंग राजपूत, गजेंद्र दांडगे, प्रा. हरीश साखरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्ञानोबा कांदे, प्रा. सागर गवई, प्रा. डॉ. नंदकिशोर बोकाडे, प्रा. निता बोचे उपस्थित होते.

आमदार श्री. गायकवाड म्हणाले, शहर सुंदर, स्वच्छ निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. झोपडपट्टीतील सामान्यवर्गातील 300 मुलांसाठी यावर्षीपासून सीबीएससी शिक्षण सुरु केले आहे. युवकांनी जात-पात-धर्म यापलिकडे जाऊन मानवता धर्म जोपासावा, असे आवाहन करून युवकांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी नेहरू युवा केंद्राने घेतलेल्या युवा उत्सवाचे कौतुक केले. अप्पर जिल्हाधिकारी श्री. गीते यांनी राष्ट्रीय विकासाच्या कार्यात तरुणांनी पुढाकार घ्यावा. तसेच 18 वर्षावरील तरुणांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे. तसेच युवकांनी व्यसनाधिनतेपासून दूर रहावे, जीवनात यशस्वीतेसाठी ध्येय निश्चित करावे, असे आवाहन केले.

जिल्हास्तरीय युवा उत्सवात चित्रकला, कविता लेखन, छायाचित्र, भाषण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचे बक्षीस वितरण नायब तहसिलदार श्री. पवार, जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी केले. भाषण स्पर्धेत प्रथम सायर शेख, द्वितीय ओमप्रकाश गवई, तृतीय धनश्री टेकाळे यांनी पटकविला. मोबाईल छायाचित्र स्पर्धेमध्ये प्रथम मयूर सोनुने, द्वितीय हर्षल तायडे, तृतीय ऋतूराज बोकाडे, प्रोत्साहनपर प्रगती झनके यांनी पटकविला. कविता लेखन स्पर्धेमध्ये प्रथम नेहा धंदर, द्वितीय वेदांत बोबडे, तृतीय क्रमांक देवानंद रावणचवरे यांनी पटकविला. चित्रकला, पोस्टर स्पर्धेत प्रथम शाम रत्नपारखी, द्वितीय समर्थ जोशी, तृतीय उर्वी कथने, प्रोत्साहनपर गौरी उमाळे यांनी पटकावला. सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम फोक आर्टीस्ट बुलडाणा, द्वितीय स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय साखरखेर्डा, तृतीय एएसपीएम महाविद्यालय, बुलडाणा यांनी पटकावला.

रणजितसिंग राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत यांनी आभार केले. कार्यक्रमासाठी धनंजय चाफेकर, महेंद्र सौभागे, विलास सोनोने, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक सुमित वाकोडे, सुरज बोरसे, उमेश बावस्कर, राहूल पवनकार, विनायक खरात, शिवाजी हावरे, देवानंद नागरे, वैभव नालट, शितल मुंढे, संतोष गवळी यांनी पुढाकार घेतला.

00000

माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना प्रोत्साहनात्मक अनुदान वितरीत

बुलडाणा, दि. 28 : भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे पुरस्कृत राज्य शासनाकडून आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेतील जिल्हास्तरावर 14, 17, 19 वर्षे वयोगटाखालील क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळा, वरिष्ठ महाविद्यालय, संलग्न कनिष्‍ठ महाविद्यालयांना प्रोत्साहनात्मक अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

गुणांकनाकरीता सर्व खेळांच्या सांघिक जिल्हास्तरीय विजयी संघाला 10 गुण, उपविजयी संघास 7 गुण आणि तृतिय क्रमांकाच्या संघाला 5 गुण तर वैयक्तिक क्रीडा स्पर्धांतील जिल्हास्तरीय स्पर्धेची सर्वसाधारण विजेतेपद निश्चित करुन प्रथम क्रमांकास 10 गुण, द्वितीय क्रमांकास 7 गुण, तृतीय क्रमांकास 5 गुण देण्यात येतात. जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान 14, 17, 19 वर्षाखालील प्रथम क्रमांकरीता 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाकरीता 75 हजार रुपये, तृतिय क्रमांकाकरीता 50 हजार रुपये वितरित करण्यात येते.

सन 2022-23 या वर्षात बुलडाणा जिल्ह्यातील शासनमान्य शाळा, विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित जिल्हास्तर शालेय विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उच्चतम गुण प्राप्त केले आहेत. 14 वर्षे मुले व मुली या वयोगटातून प्रथम सहकार विद्या मंदिर, सीबीएसई, बुलडाणा, द्वितीय यशोधाम पब्लिक स्कूल, मलकापूर, तृतिय आदर्श विद्यालय, चिखली. 17 वर्षे मुले व मुली या वयोगटातून सेठ काशीराम कळस्कर विद्यालय, निमगाव, ता. नांदुरा, द्वितीय सहकार विद्या मंदिर, सीबीएसई बुलडाणा, तृतिय स्कूल ऑफ स्कॉलर्स, मलकापूर. 19 वर्षे मुले आणि मुली या वयोगटातून प्रथम राजमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा, चांधई ता. चिखली, द्वितीय नुतन इंग्लिश स्कूल, मलकापूर, तृतिय जी. एस. सायन्स आणि आर्ट कॉलेज, खामगाव यांची निवड गुणांकनाद्वारे करण्यात आली आहे.

या शाळा, महाविद्यालयांना राष्ट्रीय क्रीडा दिनी दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता सहकार विद्या मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रोत्साहनात्मक अनुदानाचे वितरण करुन गौरविण्यात येणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.

00000

बुधवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

बुलडाणा, दि. 28 : जिल्हा रूग्णालयात नियमितपणे दिव्यांग तपासणी शिबी घेण्यात येते. मात्र बुधवार, दि. 30 ऑगस्ट 2023 रोजी तपासणीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे शिबीर रद्द करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात नियमितपणे प्रत्येक बुधवारी अस्थीव्यंग संबंधित दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र बुधवार, दि. 30 ऑगस्ट 2023 रोजी नारळी पौर्णिमेनिमित्त स्थानिक सुट्टी असल्यामुळे या दिवसाचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.  

00000

उद्योजकता विकास केंद्रातर्फे शेळी, कुक्कुट, पशूपालन प्रशिक्षण

बुलडाणा, दि. 28 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योग व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवतींसाठी बुलडाणा येथे शेळीपालन, कुक्कुट आणि गाय, म्हैस पालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण दि. 4 ते 8 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.

सदर प्रशिक्षण सुशिक्षित बेरोजगार युवकांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरु करावा, यासाठी देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात शेळी, कुक्कुट आणि गाय, म्हैस पालनाचे तंत्र आणि प्रकार, त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग आणि लक्षणे, निर्मिती व चाऱ्याचे प्रकार आणि उद्योग सुरु करण्यासाठी संपुर्ण सहकार्य करण्यात येणार आहे. त्यासोबतच उद्योजकता विकास, उद्योग संधी, मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती प्रशिक्षणात तज्‍ज्ञ व्यक्ती करणार आहेत. प्रशिक्षणात प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार हा किमान पाचवी पास, वय 18 ते 50 वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. प्रशिक्षण नोंदणीसाठी दि. 4 सप्टेंबर 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, दूरदर्शन केंद्रासमोर, मलकापूर रोड, बुलडाणा, मोबाईल नंबर 8275093201 / 9011578854 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकारी प्रदिप इंगळे यांनी केले आहे.

00000

दिव्यांग व्यक्तींनी वैश्विक ओळखपत्रासाठी कार्यवाही करावी

*समाज कल्याण विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 28 : दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरणासाठी वैश्विक ओळखपत्र प्रणाली विकसित केली आहे. केंद्र शासनाच्या प्रणालीद्वारे दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींनी वैश्विक ओळखपत्र मिळण्यासाठी कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने केले आहे.

दिव्यांग लाभार्थ्यांनी केंद्र शासनाच्या swawlambancard.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली वैयक्तिक पूर्ण माहिती, तसेच दिव्यांगत्वाची माहिती भरुन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज भरल्यानंतर दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या अर्जाची नोंदणी पावती प्राप्त होते. सदर पावतीवर जिल्ह्यातील रुग्णालयाची यादी दिसेल, अर्जदारांनी दिव्यांगत्व प्रकारानुसार नजिकच्या रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी.

ऑनलाईन अर्ज संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा शल्यचिकीत्सक, शासकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध होईल. संबंधित कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी ऑनलाईन केलेल्या अर्जाची पडताळणी करतील. पडताळणी केलेल्या ऑनलाईन अर्जासंबंधित दिव्यांगत्वाचे मुल्यांकन करणाऱ्या तज्‍ज्ञांकडे पाठविल्या जाईल. संबंधित तज्‍ज्ञ दिव्यांग लाभार्थ्यांचे मुल्यांकन करुन संकेतस्थळावर ऑनलाईन मुल्यांकन अद्ययावत करतील.

ऑनलाईन अर्ज संबंधित रुग्णालयाच्या दिव्यांग वैद्यकीय मंडळाकडे वर्ग करतील. दिव्यांग वैद्यकीय मंडळाने दिलेले निर्देश संकेतस्थळावर ऑनलाईन अद्यावत केल्यानंतर संबंधित दिव्यांग लाभार्थ्याला वैश्विक ओळखपत्र आणि दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध होईल. जिल्हा शल्यचिकीत्सक, अधिष्ठाता यांच्या कार्यालयाकडून ऑनलाईन जनरेट केलेल्या वैश्विक ओळखपत्र राज्यासाठी नेमलेल्या प्रिंटींग एजन्सीकडे ऑनलाईन हस्तांतरीत केले जाईल. प्रिंटींग एजन्सीद्वारे वै‍‍‍श्विक ओळखपत्रे संबंधित लाभार्थ्यांना स्पीड पोस्टद्वारे घरपोच पाठवले जाते.

दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राकरीता अर्ज दाखल केला नसल्यास swawlambancard.gov.in या संकेतस्थळावर पूर्ण वैयक्तिक माहिती, तसेच दिव्यांगत्वाची माहिती भरुन ऑनलाईन अर्ज करुन वैश्विक ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment