Wednesday 2 August 2023

DIO BULDANA NEWS 02.08.2023




 ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून लाभ देण्यात यावा

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

*जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन

*मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभाचे वाटप

बुलडाणादि. : राज्य शासनाने नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवित आहे. आतापर्यंत तालुकास्तरीय कार्यक्रमातून एक लाखावर नागरिकांना लाभ देण्यात आला आहे. येत्या आठवड्यात जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभाचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात शासन आपल्या दारी उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, मेहकरचे उपविभागीय अधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.

राज्यातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम पुढील आठवड्यात शेगाव किंवा मेहकर येथे आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. कार्यक्रमाचे आयोजन आणि लाभार्थ्यांना कार्यक्रमाला आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात येणार आहे. यामुळे शासन नागरिकांप्रती जागरूक असून प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यास मदत होणार आहे.

जिल्हास्तरीय कार्यक्रमात विविध विभागांचे स्टॉल लावण्यात येणार आहे. यातून योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. तसेच प्रातिनिधीक स्वरूपात निवडक लाभार्थ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लाभाचे वितरण करण्यात येणार आहे. युवकांना रोजगार मिळावा, यासाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय कार्यक्रमाला लाभार्थी मोठ्या प्रमाणावर येणार आहे. त्यांच्यासाठी येण्या जाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमस्थळी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून वैद्यकीय सुविधा, निवेदन कक्ष, हिरकणी कक्ष, कार्यक्रमानंतर कचरा व्यवस्थापन आदी व्यवस्था चोखपणे ठेवण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दिली. कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी राहूल देशपांडे आणि दादाराव थेटे यांनी मार्गदर्शन केले.

00000







महसूल कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

*महसूल दिनी उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

बुलडाणादि. : सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाकडून अपेक्षा आहेत. संकटाच्या वेळी हा विभाग उत्तम समन्वयाची भूमिका बजावत असतो. नागरिकांची अडचण झाल्याशिवाय यंत्रणांकडे येत नाहीत. त्यामुळे आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांना सौजन्यपूर्वक वागणूक द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले.

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, प्रशासनात महसूल विभागाची ख्याती सांगितली जाते. हा विभाग नागरिकांच्या जीवनाशी निगडीत आहे. अनंत अडचणीचा सामना करीत महसूल विभाग नागरिकांना मदत करीत असतो. नागरिकांशी संवाद अधिक वृद्धींगत व्हावा यासाठी नागरिक आणि सैनिकांशी संवाद साधण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचा पाल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी हे एक व्यासपीठ आहे. याठिकाणी त्यांनी समस्या मांडाव्यात. या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी हा महत्वाचा विषय आहे. सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी होण्यासाठी लवकरच आरोग्य शिबीर घेऊन आरोग्याची काळजी घेण्यात येईल.

गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील पाच तालुक्यात पूराची स्थिती निर्माण झाली होती. यामुळे समस्या निर्माण झालेले नागरिक मदतीसाठी येत आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काम करावेच लागणार आहे. त्यामुळे एक आव्हान म्हणून कर्मचाऱ्यांनी या नागरिकांना मदत करावी. यातून एक चांगला परिपाठ आपल्याला मिळेल, असेही जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी सांगितले.

यावेळी जिल्हास्तरावर निवड झालेल्या उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मलकापूर उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख, खामगाव तहसिलदार अतुल पाटोळे, नायब सिंदखेड राजा तहसीलदार ए. जी. मुजावर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार प्रमोद करे, खामगाव येथील अव्वल कारकुन व्ही. आर. निसंगमलकापूर येथील महसूल सहायक जी. यू. खुळे, खामगाव येथील मंडळ अधिकारी के. एन. वरगट, तलाठी उषा संतोष देशमुख, वाहन चालक अनिल शेषराव उबरहांडे, शिपाई रामेश्वर कचरु शिंदे, कोतवाल राहुल तुकाराम मोरे, पोलीस पाटील मिलिंद मधुकर इंगळे यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

00000

मनोधैर्य योजनेतून 22 पिडीतांना 64 लाखांचे अर्थसहाय्य

बुलडाणा, दि. 2 : अत्याचार झालेल्या महिलांना मनोधैर्य योजनेतून आर्थिक सहाय्य केले जाते. गेल्या 15 दिवसात मनोधैर्य योजनेतून 22 पिडीत महिलांना 64 लाख 50 हजार रूपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

लैंगिक अत्याचारातील महिला आणि मुले, तसेच ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पिडीतांसाठी आर्थिक सहाय्य आणि उद्भवलेल्या प्रसंगातून पिडीतांना सावरण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणातर्फे मनोधैर्य योजनेद्वारे भक्कम पाठिंबा दिला आहे. महिला, मुले यांच्यावरील लैंगिक अत्याचार, तसेच ॲसिड हल्यात जखमी झालेल्या पिडीतांवर ओढवलेल्या प्रसंगामुळे त्या खचून जाऊ नये, यासाठी विधी सेवा प्राधिकरणातर्फे अशा पिडीतांना आर्थिक मदत मनोधैर्य योजने द्वारे देण्यात येते. महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असल्यामुळे पीडितांचे पुनर्वसन करिता शासनातर्फे मनोधैर्य योजनेची अमंलबजावणी करण्यात येते. गेल्या 15 दिवसांमध्ये एकूण 22 पिडीतांना 64 लाख 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

गुन्हा, घटना आणि पारिणामाचे स्वरुप पाहून 2 ते 10 लाख रुपयांपर्यंत या योजनेद्वारे अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते. अज्ञान बालक, बालिका, लैंगिक शोषित पिडीत यांच्या मानसिकतेवर प्रभाव पडतो, तसेच समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. यामुळेच अशा व्यक्तीचे पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने आर्थिक सहाय्य करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्याकरिता  मनोधैर्य योजना मदतीची ठरते आहे.

00000000

फळे, भाजीपाला शीतचेंबर सुविधेसाठी अनुदान

बुलडाणादि. राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळामार्फत एकात्मिक फलोत्पादन अभियान योजना राबविण्यात येते. या योजनेमध्ये पणन सुविधेंतर्गत फळे आणि भाजीपाला विक्री करता शीतचेंबरच्या सुविधेसह फिरते विक्री केंद्रासाठी प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.

ग्राहकांच्या सुविधेसह लोकवस्तीमध्ये किंवा लोकवस्तीजवळ कमी खर्चाचे  फिरते फळे आणि भाजीपाला विक्री हातगाडी‍ किंवा केंद्र स्थापन करुन आवश्यक त्या वेळेस ग्राहकांना फळे व भाजीपाला पुरविणे हा या घटकाचा मुख्य उद्देश आहे. या घटकामध्ये कुल चेंबरच्या सुविधेसह हातगाडी, विक्री कट्टा, वजनकाटे आदी भांडवली खर्च अनुदानासाठी ग्राह्य धरला जातो. प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 15 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते.

या घटकाकरीता सुयोग्य असे रेखांकन, आराखडा आणि अंदाजपत्रक निश्चित करावयाचे आहे. याकरीता इच्छुक उत्पादक आणि पुरवठादार कंपन्यांकडून फळे आणि भाजीपाला फिरते विक्री केंद्र शीतचेंबरच्या  सुविधोसह याकरीता रेखांकन आराखडा व अंदाजपत्रकाचे प्रस्ताव ऑनलाईन मागविण्यात आला आहेत. प्रस्ताव सादर करण्याकरीता अटी, शर्ती व इतर तपशील कृषि विभागाच्या krishi.maharsashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. फळे व भाजीपाला फिरते विक्री केंद्र शीतचेंबरच्या सुविधेसह या घटकाकरिता उत्पादक व पुरवठादारांनी info@mahanhm.in या ईमेल आयडीवर प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

0000000







शेतकऱ्यांना द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञान

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषि विकास योजना

बुलडाणादि. द्राक्ष हे शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारे महत्वाचे फळपिक आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींपासून द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्लास्टिक कव्हर घटकाचा शासकीय योजनेंतर्गत समावेश करण्याबाबत शेतकरी आणि लोकप्रतिनिधींद्वारे मागणी होती. त्याअनुसरुन राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर हा 100 हेक्टर क्षेत्राचा प्रकल्प प्रमुख द्राक्ष उत्पादक जिल्ह्यांमध्ये राबविण्याकरिता शासनाने प्रायोगिक तत्वावर राबविण्याकरिता मान्यता दिली आहे. सदर योजनेची महाडिबीटी प्रणालीवर अंमलबजावणी करण्यात येत आहे.

गारपीट आणि अवकाळी पाऊस यापासून द्राक्ष बांगाचे संरक्षण करणे, शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतिच्या निर्यातक्षम द्राक्ष पिकांच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणे, फळबागांकरीता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकरीता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागातील युवकांना कृषि क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

द्राक्ष उत्पादक नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर व सातारा या 8 जिल्ह्यांमध्ये योजनेची व्याप्ती आहे. राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत सहा कोटी चौदा लाख रूपयांचा मंजूर कार्यक्रम असून या रक्कमेच्या कार्यक्रमास मंजूरी देण्यात आली आहे. 20 गुंठे ते 1 एकर दरम्यान क्षेत्र मर्यादा प्रति लाभार्थी लाभ देय राहणार आहे. 4 लाख 81 हजार 344 प्रती एकर खर्चाचा मापदंड असून अनुदान मर्यादा 2 लाख 40 हजार 672 प्रती एकर खर्चाच्या 50 टक्के आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. द्राक्ष पिकाच्या नोंदीसह सातबारा उतारा, आठ अ, आधारकार्डची छायांकीत प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र, विहीत नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र, चतु:सीमा नकाशा ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहे.

00000








जिल्ह्यातील निर्यातवाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार

-सहायक संचालक स्नेहल ढोके

बुलडाणा, दि. 2 : जिल्ह्यात निर्यात करणारे उद्योजक आहेत. तसेच येत्या काळात निर्यातीसाठी पुढे येणाऱ्या उद्योजकांना सहकार्य करून जिल्ह्यात निर्यात पोषक वातावरण तयार करण्यात येणार आहे. प्रामुख्याने कृषि क्षेत्राशी निगडीत उत्पादने निर्यातवाढीसाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती विदेश व्यापार महासंचालनालयाच्या सहायक संचालक स्नेहल ढोके यांनी दिली.

            जिल्हाधिकारी कार्यालयात निर्यातबंधू योजनेंतर्गत निर्यात वृद्धीसाठी एकदिवसीय कार्यशाळ पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील आदी उपस्थित होते.

            श्रीमती ढोके म्हणाल्या, प्रत्येक जिल्ह्यातून निर्यातवाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या निर्यात करीत असलेल्या उद्योजकांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येत आहे. तसेच निर्यात करू इच्छिणाऱ्या उद्योगांसाठी विदेश व्यापार महासंचालनालयाकडून सहकार्य करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने निर्यातीसाठी लागणारे सर्व सहकार्य करण्यात येणार आहे. निर्यातीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, बँक गॅरंटी तसेच खरेदीदार आणि विक्रेता यांची भेट घालून देण्याचे कार्य विविध संस्था करीत आहेत.

            जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी निर्यातवाढीसाठी नव्याने सुरवात करता येईल, असे अनेक उद्योग आहेत. सध्या निर्यात करणाऱ्या उद्योजकांनी इतरांना प्रेरणा द्यावी. यातून निर्यात वाढीसाठी मदत होईल. याठिकाणी निर्यात करणाऱ्या उद्योजकांनी निर्यातीबाबत अनुभव सांगावेत. तसेच नवीन संधीबाबत मार्गदर्शन करण्याच्या सुचना केल्या.

            नागपूर येथील विदेश व्यापार महासंचालनालयाकडून विदर्भाच्या 11 जिल्ह्यातील निर्यात वाढीसाठी सहकार्य केले जाते. निर्यात होणाऱ्या घटकांचा शोध घेऊन त्यांना निर्यातीसंबंधी सर्व सहकार्य केले जाते. तसेच निर्यातीमधून जे अनुदान किंवा सूट दिली जाते, त्यासंबंधी माहिती आणि मार्गदर्शन केले जाते. जिल्ह्यातून गेल्या आर्थिक वर्षात 768 कोटींची निर्यात झाली आहे. येत्या काळात विविध उत्पादनांना निर्यातक्षम करून निर्यातीच्या संधी वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

000000

अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त

लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण

बुलडाणा, दि. 2 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पंण करण्यात आले. तसेच जयंतीनिमित्त थेट कर्ज योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

 समाजकल्याण, सहाय्यक आयुक्त अनिता राठोड, जात पडताळणी समितीचे मनोज मेरत यांच्या हस्ते थेट कर्ज योजनेंतर्गत तीन लाभार्थींना प्रत्येकी 85 हजार रूपयांचा धनादेश वितरीत करण्यात आलातसेच अनुदान योजनेंतर्गत तीन लाभार्थीना प्रत्येकी 10 हजार रूपयांच्या अनुदानाचे धनादेश वितरीत करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे दोन धनादेश वितरीत करण्यात आले.

यावेळी समाज कल्याण वरिष्ठ निरीक्षक श्री. धर्माधिकारी, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. व्ही कापरे, महादेव विद्यागर, विजय जाधव, उत्तमराव बाजड, वामन लोखंडे, अश्विनी हिवाळे, उमेश पांडे, संदिप कपले, गणेश कपले, हरिदास रावळकर, सागर रावळकर, सचिन सोनोने, महेंद्र वाघ, सतिश बाहेकर, विजय शिंदे, स्वप्नील क्षिरसागर, मयूर जाधव उपस्थित होते.

जिल्हा व्यवस्थापक एम. एस. धांडे यांनी सूत्रसंचालन केले. एस. बी. गौड  यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी रेखा मोरे यांनी पुढाकार घेतला.

 

000000

No comments:

Post a Comment