Thursday 10 August 2023

DIO BULDANA NEWS 10.08.2023





 आदिवासी मुलांच्या वसतिगृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

*जागतिक आदिवासी दिवस साजरा

बुलडाणा, दि. 10 : आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना आदिवासींचा इतिहास आणि स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

श्री. सोनोने अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नंदिनी टारफे, प्रा. अविनाश गेडाम, प्रा. साखरे,  श्री. राजेश टारफे, गोपाल घेवंदे, गणेश लठाड, वसतिगृहाचे गृहपाल एस. एस. चौरपगार उपस्थित होते.

यावेळी प्रा. अविनाश गेडाम यांनी जीवनातील संघर्षातून घडणे आणि आयुष्यात अभ्यास केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. तसेच स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन केले. गोपाल घेवंदे यांनी जागतिक आदिवासी दिवसाचा इतिहास आणि मुळ अर्थ तसेच भारतीय राज्यघटनेतील अनुसूचित जमाती बाबत तरतुदी सांगितल्या. नंदिनी टारफे यांनी महामानवाचे विचार आत्मसात करण्याच्या सूचना करून सध्याच्या परिस्थितीबाबत मार्गदर्शन केले, श्री. सोनोने यांनी आदिवासी समाजाच्या प्राचीन इतिहासाची ओळख करुन दिली. राजेश टारफे यांनी वसतिगृहातील संघर्ष, अनुभव आणि नोकरी मिळविण्यासाठी केलेली मेहनतीबाबत सांगितले.

आनंद चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी वसतिगृहाचे डी. एन. मोरे, पी. आर. जाधव, आर. बी. इंगळे, हमीद शेख यांनी पुढाकार घेतला.

000000

नवोदयच्या निवड चाचणी परीक्षा

आवेदन पत्र भरण्यास मुदतवाढ

बुलडाणा, दि. 10 : शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीकरीता निवड चाचणी परीक्षेचे आवेदन पत्र ऑनलाईन पद्धतीने भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता गुरूवार, दि. 17 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

विद्यार्थ्यांना पूर्वी दि. 10 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. नवोदय विद्यालय समितीचे उपायुक्त यांच्या निर्देशानुसार अर्ज करण्याची मुदत दि. 17 ऑगस्ट 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2023-24मध्ये पाचव्या वर्गात शिकत असलेले जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन फॉर्म navodaya.gov.in संकेतस्थळावर भरावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. आर. कसर यांनी केले आहे.

00000

मेहकर आयटीआयमध्ये पदभरतीसाठी 17 ऑगस्टपर्यंत मुदत

बुलडाणा, दि. 10 : मेहकर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आस्थापनेवर घड्याळी तासिकाप्रमाणे रिक्त पदे भरण्यात येणार आहे. पात्र इच्छुकांनी दि. 17 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

संस्थेत जोडारी व्यवसायासाठी 1 पद भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्रता ही आयटीआय आणि सीटीआय जोडारी व्यवसाय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर मेकॅनिकल इंजिनिअरींग आणि 2 वर्षे अनुभव, तसेच संपुर्ण संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. संधाता व्यवसायासाठी 2 पद भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्रता ही आयटीआय आणि सीटीआय संधाता व्यवसाय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर मेकॅनिकल इंजिनिअरींग आणि 2 वर्षे अनुभव, तसेच संपुर्ण संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. विजतंत्री व्यवसायासाठी 2 पद भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्रता ही आयटीआय आणि सीटीआय विजतंत्री व्यवसाय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग आणि 2 वर्षे अनुभव, तसेच संपुर्ण संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. सुतारकाम व्यवसायासाठी 1 पद भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्रता ही आयटीआय आणि सीटीआय सुतारकाम व्यवसाय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर मेकॅनिकल इंजिनिअरींग आणि 2 वर्षे अनुभव, तसेच संपुर्ण संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. इम्पलाबिलीटी स्कील व्यवसायासाठी 1 पद भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्रता ही एमबीए, बीबीए, कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि 2 वर्षे अनुभव, तसेच संपुर्ण संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन प्राचार्य व्ही. बी. शिरसाट यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment