Monday 21 August 2023

DIO BULDANA NEWS 18.08.2023

 शेतकऱ्यांनी पायाभूत सुविधांचा उपयोग उन्नतीसाठी करावा

-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

बुलडाणा, दि. 18 : विदर्भातील जिल्ह्यात उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. त्यासोबतच शेततळे, नाला खोलीकरणातून शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता करून देण्यात येत आहे. शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सुविधांचा उपयोग करून शेतकऱ्यांनी स्वतःची उन्नती करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

श्री. गडकरी यांच्या हस्ते आज मलकापूर येथे नांदुरा ते चिखली या 800 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या 45 किलोमीटर रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार वसंत खंडेलवाल, राजेश एकडे, संजय कुटे, श्वेता महाले, आकाश फुंडकर यांच्यासह चैनसुख संचेती, उमा तायडे, विजयराज शिंदे आदी उपस्थित होते

श्री. गडकरी म्हणाले, गेल्या दहा वर्षात जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 81 किलोमीटर वरून 353 किलोमीटरवर गेला आहे. ही कामे करताना नदी, नाले, शेततळे खोदून करण्यात येत आहे. जागतिक दर्जाचे रस्ते तयार होत असतानाच यातून शेतकऱ्यांसाठी शाश्वत सिंचनाची सोय निर्माण झाली. यात उपलब्ध पाणी शेतीसाठी देण्यात येत आहे. जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढावे, यासाठी जिगाव प्रकल्पाला सहा हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहे. सिंचनाची छोटी छोटी कामे हाती घेऊन जिल्ह्याची सिंचन क्षमता 70 टक्क्यांवर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

उत्कृष्ट रस्ते, पायाभूत सुविधा, शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून दिल्यास शेतकरी समृद्ध होईल. शेतीतील उत्पन्न वाढावे यासाठी चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. खारपाण पट्ट्यात तलाव बांधून यात खाऱ्या पाण्यातील झिंग्याचे उत्पन्न घेतल्यास शेतकऱ्यांच्या प्राप्तीमध्ये चांगली वाढ होण्यास मदत होईल. स्मार्ट शहर होण्यासोबतच स्मार्ट खेडीही निर्माण होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा विकास झाल्याशिवाय देश आत्मनिर्भर होणार नाही. शेतकऱ्यांनी बायोडिझेलच्या उत्पादनाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न होता आता ऊर्जादाता होणे गरजेचे आहे. केंद्र शासनाने नॅनो एरिया उपलब्ध करून दिल्यामुळे उत्पादनात वाढ होणे गरजेचे आहे. येत्या काळात प्रत्येक गावात चार ड्रोन देऊन त्याद्वारे फवारणी होणार आहे. यामुळे पिकांना परिणामकारक होत देणे शक्य होणार आहे.

यावेळी श्री. गडकरी यांनी शेगाव ते संग्रामपूर, संग्रामपूर ते मध्य प्रदेश सीमा, जळगाव जामोद ते पाळधी या 1700 कोटी रुपयांच्या कामांची घोषणा केली.

0000

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्‌भावना दिनाची शपथ

बुलडाणा, दि. 18 : सद्भावना दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ देण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अवल कारकून शिला पाल, नाझर गजानन मोतेकर आदी उपस्थित होते. उपस्थितांना सामाजिक एकोपा, सौहार्द ठेवण्याची शपथ देण्यात आली.

00000

No comments:

Post a Comment