Monday 14 August 2023

DIO BULDANA NEWS 12.08.2023

 हर घर तिरंगा मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड
*ध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे
बुलडाणा, दि. 12 : स्वातंत्र्य दिनानिमित्त गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही हर घर तिरंगा मोहिम उद्यापासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या समारोपानिमित्त गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. तिरंग्यासोबत सेल्फी काढून harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावेत. 
राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबतच्या तरतुदी केल्या आहेत. राष्ट्रध्वज हा हँण्डस्पून आणि हस्तनिर्मित वूल, कॉटन, सिल्क आदीचा असावा. राष्ट्रध्वजाचा आकार आयाताकृती असावा, त्याची लांबी व रुंदीचे प्रमाण 3:2 असावे. राष्ट्रध्वजाचा आकार 9 प्रकारात असावा. त्याचा आकारानुसार लांबी व रुंदी दिली आहे. प्रकार 1 -  लांबी,  रुंदी अनुक्रमे 6300 व 4200 मी.मी, प्रकार 2 – लांबी व रुंदी अनुक्रमे 3600 व 2400, प्रकार 3- लांबी, रुंदी अनुक्रमे 2700 व 1800, प्रकार 4- लांबी, रुंदी अनुक्रमे 1800 व 1200, प्रकार 5 - लांबी, रुंदी अनुक्रमे 1350 व 900, प्रकार 6 - लांबी, रुंदी अनुक्रमे 900 व 600, प्रकार 7- लांबी, रुंदी अनुक्रमे 450 व 300, प्रकार 8-  लांबी, रुंदी अनुक्रमे 225 व 150, प्रकार 9 -  लांबी, रुंदी अनुक्रमे 150 व 100 मी.मी असावी.
राष्ट्रीय सणावेळी राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. भारतीय ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा वापर करताना खराब झालेले, माती लागलेल्या ध्वजाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचे निदर्शनास येते. उपयोगात आणलेले ध्वज सन्मानपूर्वक जतन करावे किंवा शासकीय यंत्रणांना सोपवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 
00000

No comments:

Post a Comment