Friday 11 August 2023

DIO BULDANA NEWS 11.08.2023

 जिल्हाधिकारी कार्यालयात दिली पंचप्रण शपथ

*‘मेरी माटी, मेरा देश’ मोहिम

*कर्मचाऱ्यांच्या दिवा घेऊन सेल्फी

बुलडाणा, दि. 11 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ मोहीमेस बुधवार, दि. 9 ऑगस्टपासून सुरूवात करण्यात आली. मोहीमेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी पंचप्रण शपथ दिली. त्यानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हाती दिवा घेऊन सेल्फी काढल्या.

‘मेरी माटी, मेरा देश’ मोहीमेतून आपल्या मातीविषयी प्रेम निर्माण व्हावे, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना पंचप्रण शपथ दिली. त्यानंतर अधिकारी, कर्मचारी यांनी दिवा घेऊन सेल्फी काढल्या.

यावेळी स्वातंत्र्यसंग्राम सैनिकाच्या पत्नी सुमनबाई पांडुरंग पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी अंकुश टिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी शरद पाटील, सुरेश थोरात, तहसीलदार संजिवनी मोपळे, माया माने, प्रिया सुळे, नायब तहसिलदार प्रमोद करे, नाझर गजानन मोतेकर आदी उपस्थित होते.

‘मेरी माटी, मेरा देश’ मोहीमेत जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँक कार्यालय, जिल्हा माहिती  कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क, समाज कल्याण विभाग या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी पंचप्रण शपथ घेतली.

या उपक्रमात शालेय प्रांगणामध्ये शिलाफलकाची उभारणी, वसुधा वंदन, वीरांना वंदन, ध्वजारोहण व राष्ट्रगीत आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानात ग्रामपंचायत स्तरापासून ते महानगरापर्यंत सर्व स्थानिक स्वराज संस्थांनी तसेच राज्य शासनाचे विभाग विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, सहभागाचे छायाचित्र yuva.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी केले आहे.

00000

 पिकांवरील रोगावर उपाययोजना करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 11 : सध्यास्थितीमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. ढगाळ वातावरण आणि क्वचित रिमझिम पाऊसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर पिकांची वाढ कमी झालेली आढळून येत आहे. त्यावर विविध प्रकारच्या किडीचा आणि रोगाचा प्रादूर्भाव आपणास पहावयास मिळत आहे, त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

कपाशीवर तुडतुडे व फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. यात प्रादूर्भाव कमी असल्यास पाच टक्के निंबोळी अर्क किंवा बाजारात उपलब्ध असलेली निमयुक्त कीटकनाशकाचा वापर करावा. पिवळे व निळे चिकट सापळ्याचा वापर प्रति एकरी २० प्रमाणे करावा. रसशोषक किडीनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास प्रति १० लिटर पाण्यामध्ये बुप्रोफेंजीन 25 टक्के प्रवाही 20 मिली किंवा डायफैथुरान 50 टक्के पा. मी भुकटी ही १२ ग्रॅम किंवा फेपौनिल ५ टक्के ही ३० मिली याप्रमाणे फवारणी करावी.

आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे सतत पाऊस असल्यानंतर एकदम उघडी मिळाल्यानंतर कपाशीमध्ये आढळतो. याच्या व्यवस्थापनासाठी कपाशीची झाडे ७२ तासाच्या आत आपल्या पायाच्या बोटांनी दाबून घ्यावी. त्यानंतर बाविस्टीन ही 30 ग्रॅम अधिक १३.००.४५ ही १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये घेऊन प्रति झाड १५० ते २०० मिली याप्रमाणे आवळणी करावी.

सोयाबीन पिकावर खोडमाशी व चक्रीभुंगा रोगाने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडास नियंत्रणासाठी इथियान 50 टक्के ही 30 मिली किंवा इंडॉक्सिकार्ब 15.8 टक्के ही ७ मिली किंवा क्लोरेनट्रीनिलीप्रोल 18.5 टक्के ही ३ मिली याप्रमाणे प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. अळीवर्गीय किडीच्या व्यवस्थापनासाठी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास सरासरी ४ आळ्या प्रति मीटर ओळ याप्रमाणे असल्यास प्रोफेनोफोस ५० टक्के प्रवाही ही २० मिली किंवा इंडॉक्सिकार्ब 15.8 टक्के ही ७ मिली किंवा क्लोरेनट्रीनिलीप्रोल १८.५ ही ३ मिली याप्रमाणे प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकावर मुळकुज व खोडकुज च्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा हे 100 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन तुरीच्या ओळीमध्ये ड्रेचिग करावी, असे आवाहन जळगाव जामोद कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ अनिल गाभणे यांनी केले आहे.

00000

साक्षरता वाढविण्यासाठी स्वयंसेवकांनी योगदान द्यावे

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 11 : राज्यात असलेल्या निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या निरक्षरांना साक्षर करण्यासाठी जिल्‌ह्यातील स्‍वयंसेवकांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.

केंद्र शासनाने 2022 ते 2027 या कालावधीसाठी नवसाक्षरता कार्यक्रम सुरू केला आहे. त्यानुसार राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. जिल्हा साक्षर करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील निरक्षर लोकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. राज्यस्तरावरून वर्षनिहाय निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या योजनेत कोणतेही मानधन देण्यात येणार नसल्याने राष्ट्रीय कार्यात स्वयंसेवक, सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, जिल्हा साक्षर होण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

00000

विशेष लेख

स्वातंत्र्य संग्रमातील स्मृती…

प्रबोधनाचा समृद्ध वारसा

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप उत्साहात साजरा करण्यात येत आहे. इतिहासाची पाने उलगडल्यास स्वातंत्र्यासाठी संपूर्ण पिढीने स्वातंत्र्यसमरात स्वत:ला वाहून घेतले. विविध पातळ्यांवर स्वातंत्र्यलढा सुरू असताना जनमत तयार करण्यासाठी संत-महात्म्यांनी मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या प्रबोधनाने स्वातंत्र्यलढा अधिक प्रभावी झाला. अशापैकी एक असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाविषयी माहिती देणारा लेख…

स्वातंत्र्यसंग्रामाला अनेक संत-महंतांच्या कार्याचा, प्रबोधनाचा वारसा मिळाला आहे. त्यापैकी एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू होता. या दोन विचारांवर त्यांनी जनमत तयार करीत स्वातंत्र्यसंग्रामात अमूल्य योगदान दिले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली येथे 30 एप्रिल 1909 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते. ते ब्रम्हभट वंशातले होते. भट शब्दाचा अपभ्रंश होऊन त्यांना भात म्हणत. बारश्याला 11 मे 1909 रोजी आकोटचे श्री हरीबुवा, माधानचे प्रज्ञांचक्षु  श्री संत गुलाब महाराज व यावलीचे महाराज यांनी मुलाचे नाव ‘माणिक’ ठेवले आणि आशीर्वाद दिले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूरबाजार येथे झाले. श्री संत आडकोजी महाराजांनी त्यांचे नाव ‘तुकड्या’  ठेवले.

तुकडोजी महाराजांनी 1925 मध्ये ‘आनंदामृत’ ग्रंथाची रचना केली. ते स्वत: भजन, कीर्तन, प्रवचन करीत. त्यांनी खंजिरीवर उत्तम भजने गायले. पुढे त्यांना गांधीजींचा सहवास लाभला. 28 ऑगस्ट 1942 रोजी स्वातंत्र्यसंग्राम चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक झाली. त्यांना डिसेंबरमध्ये सुटका झाली. 1943 मध्ये विश्वशांती नामसप्ताह झाला. 5 एप्रिल 1943 रोजी श्री गुरुदेव मुद्रणालयाची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले. 19 नोव्हेंबर 1943 रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. त्यांनी सर्वांसाठी मंदिरे खुली केली. ते म्हणत ‘गावा गावासी जागवा। भेदभाव समूळ मितवा, उजळा ग्रामोन्नतिचा दिवा। तुकड्या म्हणे।’

संत रामदासांनी ‘दासबोधा’तील एका समासात ‘कसं लिहावं?’ हे सांगितले आहे, तर संत तुकडोजी महाराजांनी ‘काय वाचावं?’ नि ‘कशासाठी वाचावं?’ हे त्यांच्या ग्रामगीतेच्या ग्रंथाध्ययन या चाळीसाव्या अध्यायात सांगितले आहे.

        सामान्य माणसाने चांगले जीवन कसे जगावे, याचे प्रतिपादन ज्या ग्रंथात केले आहे, ते वाचावेत. फार अवजड तत्त्वज्ञानाच्या शाखोपशाखांचे तपशील सांगणारा ग्रंथ पंडितांसाठी उपयुक्त असले, तरी सामान्य माणसांसाठी त्यांचा काय उपयोग? म्हणून आपली आकलन क्षमता किंवा ग्रहण करण्याची शक्ती लक्षात घेऊन आपण ज्याप्रकारचे जीवन जगतो, त्यासाठी उपयुक्त असे ग्रंथच वाचनासाठी निवडावेत. आपण जे वाचतो, त्याचे मर्म आपल्याला कळायला हवे. त्यामुळे ज्ञान आणि सुसंस्कार यांच्याबरोबर आपल्याला मन:शांतीही मिळते. योग्य वाचन केल्याने असे लाभ होतात. वाचन हे फक्त परमार्थासाठीच नसते, तर सध्याचे जीवन जगण्यासाठी आवश्यक असते.

राष्ट्रसंत तुकडोजींचे कार्य

आपला देश हा ग्रामप्रधान आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण या त्यांच्या विचारसराणीचा केंद्रबिंदू होता. देशातील गावांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्राम विकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला. त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही मार्गदर्शक ठरल्यात. हे आज तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंताचे द्रष्टेपण दिसून येते.

अमरावतीजवळील मोझरी येथील गुरुकुंज आश्रमाची स्थापना आणि ग्रामगीतेचे लेखन ही तुकडोजींच्या आयुष्यातील लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.

गावखेडी कशी स्वयंपूर्ण होतील, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली, ती अतिशय परिणामकारक ठरली आहे. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले. सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक, सर्वधर्मिय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.

गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंड व्रतासारखे चालवित आहेत. महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा लक्षणीय पैलू आहे. कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, राष्ट्र व्यवस्था ही स्त्रियांवर अवलंबून आहे, हे त्यांनी किर्तनाद्वारे समाजाला पटवून दिले. देशातील तरुण राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. ते बलोपासक असावेत, जेणेकरून ते समाज आणि राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नितीमान व सुसंस्कृत कसे होतील, याविषयीचे उपदेशपर आणि मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. राष्ट्रसंतानी आपल्या लेखनातून व्यसनाधिनतेचा तीव्र निषेध केला आहे.

जनजागृतीचा जागर

राष्ट्रसंत आपल्या भजनातून जातीभेद पाळू नका, अस्पृश्यता गाडून टाका, दारू पिवू नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत.  प्रत्येक भजनाच्या प्रारंभी थोडे गुरुस्मरण आणि अंधश्रद्धा, वाईटरूढी, व्यसने यांचा त्याग करा. अशा आशयाचे थोडावेळ भाषण केले की, हातातील खंजिरीच्या वेगवान ठेक्यावर त्यांचे पहाडी आवाज आणि सुंदर चालीतील मराठी-हिंदी पदांचे भजन सुरु होई. त्यात कुठल्याही स्तरातील किंवा धर्मातील श्रोता तल्लीन होऊन जाई. सर्व पंथ आणि धर्माचे लोक त्यांचे अनुयायी झाले. त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी म्हणून संबोधू लागले. ‘ग्रामगीता’ लिहून गाव आणि लोकांचे कल्याण कशात आहे, हे समजाविले. भारत कृषी प्रधान देश आहे. म्हणून कृषी उद्योगात सुधारणा सुचविली. सामुदायिक प्रार्थना करावी,  सर्वांशी प्रेमाने वागावे, गोवंश बंदी व पशूसंर्वधन करण्याची शिकवण त्यांनी दिली.

चीन युद्ध (1962) आणि पाकिस्तान युद्ध (1965) झाले तेव्हा तुकडोजी महाराजांनी सैन्यास धीर देण्यासाठी स्वत: सीमेवर जाऊन वीरगीते गाऊन सैन्याचे धैर्य वाढविले. त्यांचा स्वभाव फार प्रयत्नवादी होता. तन, मन, धनाने त्यांनी राष्ट्राची सेवा केली. ते खरे राष्ट्र संत होऊन गेले. 11 ऑक्टोंबर 1968 रोजी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी निर्तवले. त्यांचे चरणी शत: शत: प्रणाम.

 

गजानन कोटुरवार,

जिल्हा माहिती अधिकारी,

बुलढाणा.

00000

कुष्ठरोग्यांच्या सेवाधामाचा शिलेदार शिवाजीराव पटवर्धन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा समारोप करीत असताना स्वातंत्र्याच्या लढाईसोबतच सेवा कार्यातून ज्या महान व्यक्तींनी आपले योगदान दिले. त्यांचे जीवनचरीत्र जाणून घेणे आवश्यक आहे. कुष्ठरोग्यांचा सेवेसाठी आयुष्य वाहून घेतलेले व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यसैनिक पद्मश्री शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन होय. अमरावतीत कुष्ठरोग्यांचे सेवाधाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'विदर्भ महारोगी सेवा मंडळ, तपोवन'चे ते संस्थापक आहेत. त्यांचा स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचा मागोवा घेणारा हा लेख...

स्वातंत्र्यसेनानी डॉ. शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांचा जन्म २८ डिसेंबर १८९२ ला कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील जमखंडी या संस्थेतील आसंगी या छोट्याशा गावी झाला. बालवयातच आई-वडिलांचे छत्र हरवले. त्यानंतर त्यांच्यापेक्षा मोठ्या बहिणींनी कै. बहिणाक्का जोशी यांनी त्यांचे संगोपन केले. हुशार आणि तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या शिवाजीरावांचे प्राथमिक शालेय शिक्षण पुण्यात झाले. शालेय जीवनात टिळकांच्या भाषणांनी त्यांच्यावर संस्कार केले. पुढे कोलकता येथून त्यांनी होमिओपॅथीची पदवी संपादीत केली. कोलकत्यात असताना रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी ते प्रभावित झाले. विवेकानंदांच्या विचारांचे प्रतिक म्हणून त्यांनी भगवा फेटा बांधायला सुरुवात केली. त्यांनी काही काळ गोरगरीबांच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या अलाहबादच्या रामकृष्ण मिशनमध्ये सेवा दिली.

त्यानंतरच्या काळात सन १९१७ मध्ये वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने ते अमरावतीला आले. याच परिसरात त्यांचे कार्य उभे राहिले. दादासाहेब खापर्डे यांच्या मध्यस्थीने नागपूरचे महान थिऑसाफिस्ट अप्पासाहेब मराठे यांच्या कन्या पार्वतीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. शिवाजीराव आणि पार्वतीबाई पटवर्धन यांचे जीवन धगधगते यज्ञकुंड होते. १९१८ साली अमरावती शहरात प्लेगच्या महामारीने थैमान घातले होते. प्रेतांचा खच पडू लागला. सगळे शहर भयग्रस्त झाले. शासकीय यंत्रणा सुन्न आणि उदासीन होती. याचप्रसंगी त्यांनी वैद्यकीय सेवेचा विडा उचलला. या काळात दाजीसाहेबांनी कोणतेही शुल्क न आकारता आणि औषधांचाही खर्च न घेता घरोघरी फिरुन रुग्णांना अहोरात्र सेवा दिली. त्यांच्या या कार्यामुळे ते संपूर्ण विदर्भात लोकप्रिय झाले.

स्वातंत्र्य चळवळीत सहभाग

गांधी विचाराने भारावून त्यांनी स्वातंत्र्य लढाईत सक्रिय सहभाग घेतला. २४ जानेवारी १९२० ला दारुच्या मक्त्याला जाहीर विरोध, ७ जुलै १९२१ ला परदेशी कपड्यांवर बहिष्कार, स्वदेशी कपड्यांचा वापर या गांधीजींच्या आदेशानुसार जाहीर सभेतून निषेध नोंदवून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. १० मार्च १९२१ रोजी महात्मा गांधी अमरावतीला आले असताना, डॉ. पटवर्धन यांच्याकडेच थांबले. यावेळी महात्मांजींबरोबर दाजीसाहेबांचा सर्व कार्यक्रमात अग्रणी सहभाग होता. यावेळी गांधीजीच्या दिलेल्या हिंदी भाषणाच्या मराठीत अनुवाद पार्वतीबाईंनी केला होता.

देशबंधू चित्तरंजनदास, वीर वामनराव जोशी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. दाजीसाहेबांच्या निमंत्रणावरून महात्मा गांधी हे २१ डिसेंबर १९२६ रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या नवीन इमारत उद्घाटनासाठी अमरावतीला आले. यानिमित्त गांधीजींच्या एक वर्षाच्या मौन व्रतानंतर त्यांचे भाषण ऐकण्याची संधी अमरावतीकरांना लाभली.

सन १९३० मध्ये सुरुवातीला सुभाषचंद्र बोस आणि इतर ११ बंगाली देशभक्तांना एक वर्षाची शिक्षा देण्यात येऊन ब्रिटीशांच्या दडपशाहीला सुरुवात झाली. या दडपशाहीविरुद्ध दादासाहेबांनी गावोगावी जाऊन भाषणे केली, लोकांना जागृत केले. ६ एप्रिल १९३० रोजी जालीयनवाला बाग स्मृती सुरु करण्यात आंदोलन सप्ताहात दाजीसाहेब आघाडीवर होते. प्रचार सभा, जनजागरण सभा घेवून त्याविरुद्ध कडकडीत हरताळ पाडण्याचे आवाहन जनमानसांना केले. सरकारच्या दडपशाहीविरुद्ध त्यांनी सहाकाऱ्यांसोबत अमरावती शहरात संपूर्ण हरताळ पाळला. जाहीर सभा घेवून सरकारच्या कृतीचा कडाडून निषेध नोंदविला. स्वातंत्र्य आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवून स्फुर्तीदायी व्याख्यानांनी जागृती केल्याबद्दल डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांना १५ जून १९३० आणि १२ जुलै १९३० अशी दोनवेळा अटक झाली. पटवर्धन दांपत्य तुरुंगवासात असताना त्यांची मुलगी गंभीर आजारी पडली. मुलीचे वडील डॉक्टर, पण तेही तुरुंगात होते. पटवर्धनांना ब्रिटीशांनी अट घातली की, सत्याग्रहात भाग घेणार नाही, असे लिहून द्या तुम्हाला सोडण्यात येईल, पण दाजीसाहेबांनी ठणकावून ‘देशापेक्षा मला मुलगी मोठी नाही.’ पुढच्या काही दिवसांत या मुलीचे निधन झाले.

कुष्ठरोगाच्या रुग्णांची सेवा

तुरुंगवासात असताना त्यांचे लक्ष कुष्ठरोग झालेल्या एका कैद्याकडे गेले. पुढे जाऊन कोणीही त्यास शिवण्याचे धाडस करीत नव्हते. त्याला अन्न पाणी लांबून दिले गेले. त्याचा सुकलेला चेहरा व हात पायाला जखमा होत्या, जखमांतून दुर्गंधी येत होती. त्याच्या या वेदना पाहून डॉ. पटवर्धन कळवळले, त्यांनी त्या क्षणापासूनच रोग्याची सेवा करायला सुरुवात केली. पुढे एकदा शहरातील जवाहर गेटजवळ एक कुष्ठरोगी त्यांना रस्त्यावर बसून भीक मागत असलेला आढळून आला. त्याचदिवशी त्या भिकाऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. विहिरीतून वास येऊ लागला. पण मृतदेह बाहेर काढयास कुणीही तयार नव्हते. लोकांनी मागणी करुन ती विहीर नगरपालिकेला बुजवायला लावली. याचा शिवाजीरावांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांनी उर्वरित आयुष्यात कुष्ठरोग्यांची सेवा हेच आपले ध्येय ठरविले. डॉ. भोजराज यांच्यासह वरुडला व्याख्यानासाठी जाताना त्यांनी रस्त्यात बेवारस मरून पडलेल्या कुष्ठरोग्यांचे हाल पाहिले. कुत्रे त्याच्या प्रेताचे लचके तोडत होते आणि लोक निर्विकारपणे त्याकडे पाहत होते. या सगळ्या घटनांचा डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि त्यांनी कुष्ठ निर्मुलनाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले.

शिवनी, जबलपूर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर दाजीसाहेबांनी महात्मा गांधीजींची भेट घेतली. गांधीजी म्हणाले देशाचे स्वातंत्र्य निश्चित आहे. पण देशाला भूक निवारण, स्वयंरोजगार, कुष्ठरोग निर्मुलन अशा भीषण समस्यांना तोड द्यावे लागणार आहे. हे माझे अपूर्ण राहिलेले कार्य तुम्ही करावे, असे मला वाटते. गांधीजींशी बोलल्यानंतर दाजीसाहेबांच्या कार्याची दिशा पक्की झाली आणि त्यांनी कुष्ठरोग निर्मुलनांचे कार्य अविरत करण्याचा निर्धार केला.

कुष्ठरोग्यांवर उपचार करण्यासाठी कुष्ठधाम उभारण्यासाठी आवश्यक जागेचा सर्वात मोठा प्रश्न होता. अमरावती शहराच्या आजूबाजूच्या परिसरात जागेचा शोध घेण्यास सुरुवात झाली. शहराच्या पूर्वेस ५ किमीवर मोकळी व पडीक जमीन त्यांच्या नजरेस पडली. जुगलकिशोर जयस्वाल हे त्या जमीनीचे मालक होते. दाजीसाहेब तुरुंगात असताना जुगुलकिशोर यांचा मुलगा आजारी पडला होता. अमरावतीमधील तज्ज्ञ व नामवंत डॉक्टरांनी उपचार केले तरी मुलगा दुरुस्त होईना. शेवटी जुगुलकिशोर हताश होवून दाजीसाहेबांना तुरुंगात भेटायला गेले व आपल्या मुलाच्या आजाराची माहिती दिली. दाजीसाहेबांनी ऐकीव माहितीच्या आधारे आजाराच्या लक्षणांचा अंदाज घेवून औषधी लिहून देऊन उपचार केलेत. त्या आजारातून मुलगा पूर्ण बरा झाला. मुलाचे प्राण वाचविल्यामुळे दानशूर जुगुलकिशोर यांनी आपली ८० एकर पडीक जमिन कुष्ठधामासाठी दिली. दाजीसाहेबांच्या जागेची नड लक्षात घेता सुखप्पा प्रेमलवार व लालाशाम या सेवाभावी वृत्तीच्या नागरिकांनीही आपली जमीन स्वयंस्फुर्तीने दाजीसाहेबांना देणगी म्हणून दिली.

‘तपोवन’ची स्थापना

घटस्थापनेच्या 26 सप्टेंबर 1946 दिवशी श्री जगदंबा कुष्ठनिवास, तपोवन या संस्थेची आचार्य विनोबा भावे यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. त्याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तपोवनमध्ये भजन झाले. त्याप्रसंगी दाजीसाहेबांचे या माळरानात पहिले भाषण झाले. त्यादिवशी दाजीसाहेबांनी तपोवनातच मुक्काम केला. कृष्ठरोग्यांशी चर्चा केली. त्यांच्या व्यथा समजून घेऊन त्यांना दिलासा दिला. स्वाभिमानाने जगण्याचा सल्ला देवून जगण्याची उमेद कुष्ठरुग्णांत निर्माण केली.

याच सुमारास 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. 1 जुलै 1950 ला मध्य प्रांताचे राज्यपाल मंगलदास पक्कास यांच्या हस्ते संस्थेचे रितसर उद्घाटन होऊन ती ‘विदर्भ महायोगी सेवा मंडळ’ या नावाने पुढे नावारुपास आली. गाडगेबाबांनी 1954 साली तपोवनमध्ये येऊन साफसफाई केली. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासह अनेकांनी या भूमीला भेटी दिल्या. डॉ. पटवर्धन यांचे कार्य आणि सेवाभावी वृत्तीशी डॉ. राजेंद्र प्रसाद परिचयाचे होते. त्यामुळे या कामाचा सन्मान म्हणून 1959 साली आग्रह करुन डॉ. पटवर्धन यांना पद्मश्री सन्मान स्विकारायला लावला.

दाजीसाहेब हे ध्येयनिष्ठ, देशाभिमानी, कडक शिस्तीचे होते. समाजातील इतर नागरिकांप्रमाणे कुष्ठरुणांना मान-सन्मान मिळावा, कुष्ठरोगी स्वावलंबी व्हावे यासाठी ते सतत झटत राहिले. आजही ‘तपोवन’ च्या कार्यकारणीवर त्यांच्या वारसातील कोणीही नाही. त्यांच्या पुढच्या पिढीने आपले कार्य इतर क्षेत्रात उभे केले. तपोवनमधून बाहेर पडताना पार्वतीबाईंचे एक वाक्य नजरेस पडते आणि पुन्हा आठवणी उभी राहतात. ‘आयुष्यभर फक्त एकच केले, स्नेह सहकार्याची ज्योत अखंड तेवत ठेवली, आता देणं घेणं सारं संपलं आहे. मागणं एकच आहे. अनाथ अपंगाकरिता थोडा उजेड ठेवा.’

डॉ. शिवाजीराव पटवर्धन व पार्वतीबाई यांच्या त्यागातून हे कार्य उभे राहिले आहे. या कार्यासाठी अनेक पुरस्कार त्यांच्याकडे चालत आले, मात्र पटवर्धनांनी ते नम्रपणे नाकारले. विद्यापीठाची डिलीट स्वीकारली नाही. पुण्याचा टिळक पुरस्कार स्विकारला नाही. कुष्ठरुग्णांच्या चेहऱ्यावर उमललेले हास्य जगातील सगळ्या पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे, असे ते म्हणत. त्यांच्या कार्यरुपाने सतत नव्या पिढीला प्रेरणा मिळते. अशा लोकोत्तर, ध्येयनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, सेवाभावी तपस्वी दाजीसाहेबांना कोटी कोटी प्रणाम…

 

गजानन कोटुरवार,

जिल्हा माहिती अधिकारी,

बुलढाणा.

00000

No comments:

Post a Comment