Thursday 17 August 2023

DIO BULDANA NEWS 17.08.2023

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा

बुलडाणा, दि. 17 : केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी शुक्रवार, दि. 18 ऑगस्ट 2023 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

श्री. गडकरी यांच्या दौऱ्यानुसार, सकाळी 10.30 वाजता मलकापूर येथील  हेलिपॅड येथे आगमन होईल. सकाळी 11 वाजता मलकापूर येथील जीव्हीएम मैदान येथे नांदुरा ते शेळद राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित राहतील. सकाळी 12.40 वाजता येळगाव येथील सहकार विद्या मंदिर हेलीपॅड येथे आगमन होईल. त्यानंतर दुपारी 12.50 वाजता गर्दे वाचनालयातर्फे आयोजित गोकुल शर्मा यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 3.15 वाजता सहकार विद्या मंदिराच्या नवीन इमारत उद्घाटनास उपस्थित राहतील. दुपारी 4.30 वाजता सहकार विद्या मंदिर येथील हेलिपॅड वरून नागपूरकडे प्रयाण करतील.

00000



मलकापूर शासकीय आयटीआयमध्ये स्मार्ट क्लासरुमचे उद्घाटन

बुलडाणा, दि. 17 : मलकापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आझादी का अमृत महोत्सव आणि मेरी माटी मेरा देश निमित्त दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी स्मार्ट क्लासरुमचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे झाले.

यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. मलकापूर येथील कार्यक्रमाला आमदार राजेश एकडे, प्राचार्य जी. एन. काळे, एस. डी. वठुरकर, आयएमसी अध्यक्ष भरतकुमार दंड, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चव्हाण, सदस्य दिनकर नारखेडे उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्कील इंडिया व डिजीटल इंडिया या उपक्रमांतर्गत राज्यातील 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 75 व्हर्च्युअल क्लासमध्ये उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात दुरदृश्य प्रणालीद्वारे झाले. यावेळी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अप्पर मुख्य सचिव अशिषकुमार सिंह, आयुक्त एन. रामास्वामी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी उपस्थित होते.

00000

अभिव्यक्ती मताची स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 17 : विद्यार्थ्यांमधील नाविण्यपूर्ण संकल्पना आणि सर्जनशीलतेचा उपयोग मतदार जागृतीसाठी व्हावा, यासाठी अभिव्यक्ती मताची स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा दि. १ ऑगस्ट ते दि. १५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात येणार आहे. अभिव्यक्ती मताची या विषयावर जाहिरात निर्मिती, भित्तीपत्रक आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धांमध्ये राज्यातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नालिझम) महाविद्यालये आणि सर्जनशील कला शिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतील.

या स्पर्धेत युवा वर्ग आणि मताधिकारी, मताधिकार लोकशाहीचा स्तंभ, एका मताचे सामर्थ्य, सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका, जबाबदारी, लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि मताधिकार हे विषय राहणार आहे. तीनही स्पर्धांचे माध्यम मराठी, हिंदी आणि इंग्रजी राहिल.

विषयनिहाय जाहिरात निर्मिती स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक एक लाख रूपये, दुसरे पारितोषिक ७५ हजार रूपये,  तिसरे पारितोषिक ५० हजार रूपये, दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी १० हजार रुपयांची आहेत. भित्तिपत्रक, पोस्टर स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक ५० हजार रूपये, दुसरे पारितोषिक २५ हजार रूपये, तिसरे पारितोषिक १० हजार रूपये, दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ५ हजार रुपयांची आहेत. घोषवाक्य स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक २५ हजार रूपये, दुसरे पारितोषिक १५ हजार रूपये, तिसरे पारितोषिक १० हजार रूपये, दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ५ हजार रुपयांची आहेत.

स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

00000

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन

बुलडाणा, दि. 17 : क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि क्रीडा वातावरण निर्माण होण्यासाठी हॉकीचे जादुगर स्व. मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त दि. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 21 ते 29 ऑगस्ट 2023 दरम्यान करण्यात आले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मेजर ध्यानचंद यांचे प्रतिमा पुजन, त्यांच्या जीवनावर व्याख्यान, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूचा सत्कार, मान्यवरांचे खेळाडूंना मार्गदर्शन, विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

यावर्षी शालेय व अधिकृत एकविध खेळ संघटनांतर्फे अधिकृत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य तथा सहभाग घेतलेल्या खेळाडूंनी प्रमाणपत्राची छायांकीत प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. 25 ऑगस्ट 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावी. प्रमाणपत्र सादर करणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूचा प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल. यासाठी खेळाडूंनी सहकार विद्या मंदिर येथे दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment