Thursday 31 August 2023

DIO BULDANA NEWS 31.08.2023

 आयुष्मान भव मोहिमेत आबालवृध्दांची आरोग्य तपासणी

*लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा, दि. 31 : जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान आयुष्मान भव आरोग्य मोहीम राबविण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील सर्व वयोगटातील नागरीकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी या मोहिमेंतर्गत आबालवृद्धांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आयुष्मान आपल्या दारी ३.० या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्डाचे वितरण करण्यात येणार आहे. आयुष्मान सभा उपक्रमामध्ये आरोग्य विषयक सेवासुविधांची जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मेळावे घेण्यात येणार आहे. आयुष्मान कार्ड आणि आभा कार्डबाबत आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. यात असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण आणि क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. आयुष्मान मेळाव्यांतर्गत मधुमेह, ताणतणाव, रक्तदाब, विविध प्रकारचे कॅन्सर, कुष्ठरोग, क्षयरोग, कुपोषण, नेत्रचिकित्सा आदीबाबत जनजागृती करणे आणि आयुष्मान भारत आरोग्य वर्धिनी केंद्रस्तरावर दर आठवड्याला सलग चार आठवडे तपासणी करण्यात येणार आहे.

या मोहिमेदरम्यान आयुष्मान कार्ड आणि आभा कार्ड तयार करणे, सर्व समावेशक आरोग्य सेवा, आयुष, मानसिक आरोग्य, वाढत्या वयातील आजार, परिहारक उपचार, मौखिक आरोग्य, नेत्र, कान, नाक व घसा यांचे आरोग्य, समुपदेशन सेवा तसेच योगा, वेलनेस उपक्रम, मोफत औषधी, प्रयोगशाळा तपासणी व टेलीकन्सलटेशन सेवा देण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व अंगणवाडीतील मुले आणि प्राथमिक शाळेतील मुलांची आरोग्यविषयक तपासणी या मोहिमेदरम्यान करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत मुलांची ३२ सामान्य आजारांची तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास मुलांवर जिल्हा ठिकाणी शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. त्यांना आवश्यक उपयुक्त साहित्यही देण्यात येणार आहे. आयुष्मान भव मोहिमेचा जिल्ह्यातील नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000








जिल्हा क्रीडा कार्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

बुलडाणा, दि. 31 : राज्यातील क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि जनतेमध्ये क्रीडा वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने हॉकीचे जादुगर स्व. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे सहकार विद्या मंदिरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला.

यावेळी आमदार संजय गायकवाड, डॉ. सुकेश झंवर, श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त अनुराधा सोळंकी, एकविध खेळ संघटनेचे प्रतिनिधी जयसिंग जयवार, उर्दू हायस्कूलचे प्राचार्य श्री. दाऊद, कुणाल गायकवाड आदी उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अनुराधा सोळंकी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय आर्चरी खेळाडू प्रथमेश जवकार यांच्या वतीने वडील समाधान जवकार यांनी सत्कार स्विकारला. आंतरराष्ट्रीय खेळाडू मानव गणेश जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्ह्यात सन 2022-23 या वर्षात शासनमान्य शाळा, विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विद्यार्थ्यांनी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित जिल्हास्तर शालेय विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन उच्चतम गुण प्राप्त केले आहेत, अशा 14 वर्षे मुले व मुली या वयोगटातून प्रथम सहकार विद्या मंदिर, बुलडाणा, द्वितीय यशोधाम पब्लिक स्कूल, मलकापूर, तृतीय आदर्श विद्यालय, चिखली, 17 वर्षे मुले व मुली या वयोगटातून सेठ काशीराम कळस्कर विद्यालय, निमगाव, ता. नांदुरा, द्वितीय सहकार विद्या मंदिर, बुलढाणा, तृतीय स्कूल ऑफ स्कॉलर्स, मलकापूर, 19 वर्षे मुले व मुली या वयोगटातून प्रथम राजमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा, चांधई, ता. चिखली, द्वितीय नुतन इंग्लिश स्कूल, मलकापूर, तृतीय जी. एस. सायन्स आणि आर्ट कॉलेज, खामगाव यांची निवड गुणांकनाद्वारे करण्यात आली. या शाळांना प्रोत्साहनापर रक्कम प्रदान करण्यात आली. सन 2022-23 या वर्षात विविध गट आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी प्राविण्यप्राप्त 110 खेळाडूचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले,

00000

विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करावेत

*जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा, दि. ३१ : विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी अथवा पाल्यांना राष्ट्रीय स्तरासाठी एकरकमी 10 हजार आणि आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 25 हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी माजी सैनिक, पत्नी अथवा पाल्यांपैकी पात्र उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 20 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कार्यालयाने केले आहे.

यात पुरस्कारासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य आदी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कारप्राप्त, संगणक क्षेत्रात अति उत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात व इतर नैसर्गिक आपत्तींमध्ये बहुमोल कामगिरी करणारे, तसेच देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक, पत्नी अथवा पाल्यांना अशा कार्याबद्दल राष्ट्रीयस्तरावर 10 हजार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 25 हजार रूपयांचा पुरस्कार, शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येते. पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉड्रन लिडर रूपाली सरोदे यांनी केले आहे.

00000

पारधी, फासेपारधींना व्यवसायासाठी अनुदान

बुलडाणा, दि. 31 : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम योजनेंतर्गत सन 2022-23 या वर्षात पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहे. यात पारधी, फासेपारधी समाजाच्या लाभार्थ्यांनी दि. 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर योजनेसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी योजनेचे छापील अर्ज दि. 14 सप्टेंबर 2023 पर्यंत लाभार्थ्यांना विनामूल्य देण्यात येईल. योजना ही पारधी, फासेपारधी समाजाच्या महिला लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर मनीमाळ व्यवसाय करण्यासाठी 20 लाभार्थींना अर्थसहाय्य, पारधी, फासेपारधी समाजातील लाभार्थ्यांना वाघरी मटन टपरी व्यवसाय करण्यासाठी 100 टक्के अनुदानावर 20 लाभार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. अर्जासोबत अर्जदाराने पारधी, फासेपारधी जमातीचा दाखला प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, दारिद्र्यरेषेखाली असल्यास प्रमाणपत्र, तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, रेशनकार्ड, विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, परितक्त्या असल्यास पुरावा, शैक्षणिक पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो सादर करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

00000

गणेशोत्सवात जादूटोणा विरोधी देखावा करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 31 : येत्या काळात गणेशोत्सव आणि दुर्गोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाच्या काळात मंडळांनी जादूटोणा विरोधी देखावे करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.

भारतीय समाजात रूजलेल्या अनिष्ठ प्रथांमुळे समाजाचे नुकसान झाले आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्‍ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व या प्रथांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम जारी करण्यात आला आहे. जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील गणेश मंडळ, तसेच देवी मंडळांनी पोस्टर, चित्र, त्याअनुषंगाने देखावे निर्माण करावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

000000

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

बुलडाणा, दि. 31 : दर महिन्यात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सप्टेंबर 2023 महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 4 सप्टेंबर   2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी लोकशाही दिनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील अशाप्रकारे पाठवावेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी कळविले आहे.

00000

अंगणवाडी मदतनीसांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध

बुलडाणा, दि. 31 : बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातर्फे अंगणवाडी मदतनीसांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्जाची छाननी पूर्ण करण्यात आली असून अंतिम गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्प, बुलडाणा (उत्तर) मलकापूर अंतर्गत शेगाव, नांदूरा, जळगाव जामोद, मलकापूर, मोताळा, संग्रामपूर आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प, बुलडाणा दक्षिण या प्रकल्पामध्ये बुलडाणा, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव नगर परिषद क्षेत्रातील अंगणवाडी केंद्राच्या मदतनीस पदांची अर्जाची अंतिम तपासणी पूर्ण झाली आहे. प्राथमिक गुणवत्तायादी दोन्ही कार्यालय, तसेच नगर परिषद कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रिया शासन निर्णयानुसार पार पाडण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी कोणत्याही भूल, थापा अथवा अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी मं. मा. पांचाळ यांनी केले आहे.

00000

गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी

15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

मुंबई, दि. 31 : राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

            या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक या प्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपयांचे, तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे वेळापत्रक

            उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना 15 सप्टेंबर 2023 पर्यंत स्पर्धेत अर्ज करता येईल. mahotsav.plda.@gmail.com या ई - मेलवर गणेशमंडळांनी अर्ज करावा. पु. ल. देशपांडे कला अकादमी तर्फे ई-मेलवर प्राप्त अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला १८ सप्टेंबरपर्यंत परीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. १९ ते २८ सप्टेंबर दरम्यान जिल्हास्तरीय समितीचे सदस्य स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करतील. व्हिडिओग्राफी आणि कागदपत्रे तपासून अभिप्रायासह गुणांकन करतील. जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेश मंडळाची शिफारस १ ऑक्टोबरपर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला करेल. राज्यस्तरीय समिती राज्यातील उत्कृष्ट ३ गणेश मंडळाची शिफारस अकादमीला करेल. त्यानुसार कला अकादमी विजेत्या मंडळांची घोषणा करेल व १२ ऑक्टोबरला विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. 

            राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ४ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत. तसेच अर्जही उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असेही आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment