सहज प्रणाली: महसुल दस्तऐवज, एका क्लिकवर

सहज प्रणाली: महसुल दस्तऐवज, एका क्लिकवर

बुलडाणा, (जिमाका) दि. 9 :  जिल्ह्यातील शेतकरी व नागरिक जुने महसुली अभिलेख, प्रमाणपत्रासाठी वारंवार महसूल कार्यालयाला भेटी देत असतात. यामुळे नागरिकांचा वेळ व अनेक अडचणीला सामोर जावे लागत होते. परंतु आता सहज प्रणालीच्या माध्यमातून महसुल दस्तऐजव एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या प्रणालीचा सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 जुने महसुली अभिलेख जसे जुने नकाशे, भुसंपादन निवाडा प्रत, अकृषक आदेश, इनाम जमीन वाटप रजिस्टर, जन्म-मृत्यु नोंद रजिस्टर, लवाद आदेश, नझुल प्रकरणे, प्रमाणित प्रत, नक्कल अशा विविध महसूल दस्तावेजासाठी नागरिक अभिलेख कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालयात भेट देत असतात. तथापि जुने महसुली अभिलेख शोधणे ही एक वेळ खाऊ आणि क्लिष्ट प्रक्रिया होती. तसेच जुने दस्ताऐवज जीर्ण झाल्याने उपलब्ध होण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे नागरिकांना सुलभपणे नक्कल मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.

या समस्येवर मात करणेसाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतुन जिल्हा महसुल प्रशासनांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल शाखा, भुसंपादन शाखा, पुनर्वसन शाखा, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, तसेच सर्व तहसिलदार कार्यालय येथील जुने महसुली अभिलेख जतन करण्यासाठी व नागरिकांना सुलभ रितीने अभिलेख उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून अभिलेखाचे संगणकीकरण हा नाविन्यपूर्ण उपक्रम दि. 1 ऑगस्ट 2024 या महसुल दिनांपासुन राबविण्यात आला.  त्यानुसार जिल्हा महसुल प्रशासनाने एक सॉफ्टवेअर विकसित केले असून नागरिकांना आवश्यक दस्ताऐवज सदर प्रणालीव्दारे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. प्रणालीमध्ये प्रकरणाचे वर्ष, पक्षकाराचे नाव, तालुका, गाव, निवाडा क्र.गट क्र. ईत्यादी तपशीलाव्दारे शोधता येईल. सदर प्रणालीला सहज प्रणाली नाव देण्यात आले असुन त्याचे लोकार्पण न्यायमुर्ती अनिल स. किलोर यांचे हस्ते दि. 23 मार्च 2025 रोजी करण्यात आले आहेत.

सदर प्रणालीव्दारे शेतकरी व नागरिकांना आवश्यक असणारे दस्तऐवज, जुने महसुली अभिलेख निःशुल्क पाहता येणार असुन आवश्यक दस्तऐवजाची प्रमाणित प्रत विहीत शुल्क ऑनलाइन प्रणालीव्दारे भरुन जिल्हाधिकारी कार्यालय येथील अभिलेख कक्ष व तहसिलदार कार्यालयातील अभिलेख कक्षातुन सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करुन घेता येणार आहे.

> सहज प्रणालीचे फायदे : जमीन दस्ताऐवजांची विनाविलंब उपलब्धता, नागरिकांच्या वेळेची व पैशाची बचत, एआयचा वापर असल्याने कामकाजात सुलभता, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासन, शेतकऱ्यांना न्यायालयीन व अर्ध न्यायिक प्रकरणांमध्ये मदत, विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यास सुलभता, महसुली प्रशासनातील कार्यक्षमतेत गतीमानता, अभिलेख्यांचे कायम स्वरुपी जतन.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या