बेकायदेशीर बालगृहांची १०९८ वर माहिती द्या; महिला व बालविकास विभागाचे आवाहन

 

बेकायदेशीर बालगृहांची १०९८ वर माहिती द्या; महिला व बालविकास विभागाचे आवाहन

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : आपल्या परिसरात कुठेही अनधिकृत, बालगृहे, वसतिगृहे चालवली जात असल्याचे आढळताच टोल फ्री क्रमांक १०९८ वर तत्काळ माहिती द्यावी व बालकांच्या शोषणास प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील आळंदी आणि ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे विनापरवानगी बालगृहे, वसतिगृहे आणि अनाथाश्रम चालवले जात असल्याचे वृत्त माध्यमांद्वारे प्रसिद्ध झाले. या ठिकाणी बालकांना जबरदस्तीने ठेवून त्यांच्यावर शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण होत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. ही बाब अतिशय गंभीर असून बाल न्याय अधिनियम २०१५, सुधारित अधिनियम २०२१ आणि महाराष्ट्र बाल न्याय नियम २०१८ यांचे सरळ उल्लंघन आहे. या अधिनियमाच्या कलम ४२ नुसार, अशा प्रकारच्या संस्थांना आवश्यक ती मान्यता व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक आहे. प्रमाणपत्राविना संस्था चालवणाऱ्या व्यक्तीस एक वर्षापर्यंत कारावास व किमान १ लाख रुपयांचा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतो.

नागरिकांनी आपल्या परिसरात अशा कोणत्याही अनधिकृत संस्थांची माहिती मिळाल्यास त्वरित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा अथवा चाईल्ड हेल्पलाइन टोल-फ्री क्रमांक १०९८ वर माहिती द्यावी, जेणेकरून बालकांवरील शोषण रोखता येईल. बालकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व नागरिकांनी सजग राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिवेश मराठे यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या