Wednesday 17 January 2024

DIO BULDANA NEWS 17.01.2024

 शिवाजी महाराज जयंती, श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्त

आनंदाचा शिधावाटप

बुलडाणा, दि. 17 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सन 2024 मधील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वितरीत करण्यात येणार आहे.

वितरीत करावयाच्या "आनंदाचा शिधा" संचात 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात चनाडाळ, रवा, मैदा व पोहा हे सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच "आनंदाचा शिधा" प्रति शिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच ई पॉस प्रणालीव्दारे शंभर रूपये प्रति संच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येणार आहे.

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्ह्यातील 4 लाख 81 हजार 275 शिधापत्रिकाधारकांना 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात चनाडाळ, रवा, मैदा व पोहा हे सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधा जिन्नस संच ई पॉस प्रणालीद्वारे 100 रूपयांत वितरीत करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पामधून गाळ काढण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 17 : जिल्‍ह्यातील पाटबंधारे विभागाच्या धरणामधून शेतीसाठी गाळ काढावा, असे आवाहन पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.

धरणामध्ये साठलेल्या गाळामुळे धरणाच्या साठवण क्षमतेत घट झाली आहे. या धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास धरणाची मूळ साठवण क्षमता पुनःस्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात वाढ होणार आहे. जिल्ह्यामध्ये सन २०२३-२४ मध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. त्यामुळे मार्च २०२४ नंतर धरणातील अंदाजे ५५ हजार ८५ घनमीटर गाळ काढून शेतीकरिता वापरणे शक्य होईल. शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाची परवानगी घेऊन देखरेखीखाली शेतीसाठी धरणातील गाळ काढता येणार आहे. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने शेतीसाठी धरणातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सु. शा. सोळंके यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यात माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविण्यात येणार

बुलडाणा, दि. 17 : शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होण्यासाठी तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यासाठी आढावा सभा नुकतीच पार पडली.

येथील केब्रीज स्कूल येथे शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षेतखाली आढावा सभा पार पडली. सभेत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान यशस्वीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जयराम भटकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सिध्देश्वर काळुसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एन. खरात, योजना शिक्षणाधिकारी वैशाली ठग, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर, उमेश जैन यांनी अभियान यशस्वीपणे राबविण्यासंदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या.

माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचे विभागीय समन्वयक मंगेश भोरसे यांनी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अंतर्गत स्वच्छता मॉनीटर टप्पा क्रमांक - 2 मध्ये शाळांची नोंदणी करण्यासंदर्भात कचऱ्याबाबत होणाऱ्या निष्काळजीपणाचे असामाजिक कृत्य रोखण्याची सवय विद्यार्थ्यांना होण्याबाबत मार्गदर्शन केले.

अधिव्याख्याता समाधान डुकरे आणि प्राथमिक उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर यांनी अभियान राबविताना शाळांची नोंदणी आणि येणाऱ्या अडचणींबाबत सादरीकरण केले. सभेसाठी अधिव्याख्याता श्री. गायकवाड, श्री. गवई, श्री. अजगर, श्री. राजुकुमार, संजय दालमिया यांनी पुढाकार घेतला.

या अभियानाचा प्रभावी विस्तार होण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला -क्रीडा गुणांचा विकास आदी घटकांचा अंतर्भाव होणे आवश्यक आहे, तसेच महत्वपूर्ण घटकाना योग्य त्या प्रमाणात प्राधान्य दिल्यास शाळेचा सर्वागीण विकास निश्चितपणे होऊ शकतो. यासाठी सर्व शाळांनी यामध्ये सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. आर खरात यांनी केले आहे.

000000

राज्य वाङमय पुरस्कार स्पर्धेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 20 : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङमयनिर्मितीसाठी 2023 मध्ये प्रकाशित पुस्तकासाठी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार देण्यात येत आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत आहे.

स्पर्धेसाठी दि. 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 यांच्या कार्यालयात, तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार 2022 नियमावली व प्रवेशिका या शीर्षाखाली व ‘व्हाटस् न्यू’या सदरात पुरस्काराच्या शीर्षाखाली, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.

प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक व प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करू शकतात. त्याचप्रमाणे, जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत प्रवेशिका दाखल करता येतील. लेखक व प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर किंवा पाकिटावर स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार 2023 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

00000




दहिद बु. जिल्हा परिषद शाळेत

राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव

बुलडाणा, दि. 17 : दहिद बु. येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी आयएसओ उच्च प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ जन्मोत्सव, युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती, तसेच 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या उपक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद राजपूत अध्यक्षस्थानी होते. शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष नीता जैन, उच्च श्रेणी मुख्याध्यापक आत्माराम गायकवाड उपस्थित होते.

दहिद बु. येथील शाळा जिल्हाभरात ‘उपक्रमांची शाळा’ म्हणून परिचित आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबविले जाते. राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त शाळेतील विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊची वेशभूषा धारण केली होती. मोहिनी जैन यांनी राजमातांचा जीवनपट सादर केला. तसेच विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत भाग घेतला. विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपटावर भाषणे सादर केली. ऋत्विका राजपूत हिने तलवार बाजीचे प्रदर्शन केले.

कार्यक्रमास तंटामुक्ती अध्यक्ष राजूभाऊ राजपूत उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत शाळेत माता-पालकांसाठी रांगोळी, तसेच घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. राजेंद्र गवई यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री जाधव यांनी आभार मानले. स्पर्धेसाठी सुनंदा गायकवाड, आशा खेत्रे, कावेरी जाधव, पल्लवी खरात, गणेश मुळे, जितेंद्र पालकर यांनी यांनी पुढाकार घेतला.

00000

No comments:

Post a Comment