Friday 5 January 2024

पारंपरिक कारागिरांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा

बुलडाणा,दि.05(जिमाका) : औजारे व साधने यांचा वापर करुन व हातांनी काम करणाऱ्या पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करुन देण्यासाठी तसेच त्यांना सर्वांगिण आधार देवून त्यांचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना मंजूर केली आहे. जिल्ह्यात योजनेंतर्गत नोंदणी सुरु झाली असून जास्तीत जास्त पारंपरिक कारागिरांनी जवळच्या सी.एस.सी सेंटरला जावून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे. पारंपरिक कारागिरांना विश्वकर्मा म्हणून मान्यता देणे, कौशल्य वाढविण्यासाठी कौशल्य वृध्दी करणे, व्यवसायाच्या संबंधित आणि योग्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देणे, चांगल्या आणि आधुनिक साधनांसाठी सहाय्य प्रदान करणे, ब्रँड प्रमोशन आणि मार्केट लिंकेजसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे ही योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. कौशल्य पडताळणी नंतर पाच सात दिवस मूलभूत प्रशिक्षण, इच्छूक उमेदवारास पंधरा दिवस प्रगत प्रशिक्षण, दररोज 500 रुपये विद्यावेतन, टुलकिट प्रोत्साहन 15 हजार अनुदान, तारणमुक्त व्यवसायिकता विकास कर्ज 1लाख रुपये आणि 2 लाख रुपये सवलतीचा व्याज दर एमएसएमईद्वारे 8 टक्के व्याज सवलत मर्यादेसह लाभार्थीकडून 5 टक्के व्याज. या कर्जाची क्रेडिट गॅरंटी फि केंद्र सरकार उचलेल. डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन जास्तीत जास्त 100 व्यवहारांसाठी प्रती व्यवहार 1 रुपयांप्रमाणे राहील. विपणन समर्थन नॅशनल कमिटी फॉर मार्केटिंग गुणवत्ता प्रमाणपत्र, ई-फामर्स लिंकेज, व्यापार मेळावे जाहिरात, प्रसिद्धी आणि इतर विपणन सारख्या सेवा प्रदान करण्यात येतील हे लाभ नोंदणीकृत कारागिरांना मिळणार आहेत. योजनेसाठी पात्र कारागीर व्यवसाय- कुंभार, बोट निर्माता, लोहार, हॅमर अँड टुलकिट मेकर, कुलपे बनविणारे, मूर्तीकार, स्टोन ब्रेकर, सोनार, सुतार, मोची, गवंडी राजमिस्त्री, मॅट झाडू निर्माता, नाव्ही, बाहुली आणि खेळणी निर्माता, फुलमाला निर्माता, परीट, शिंपी, मासेमारी जाळी बनविणारा अशा 15 व्यवसायातील कारागिरांना योजनेचा लाभ घेता येईल. योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी http://pmvishwakarma.gov.in वर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, अरुणोदय बिल्डींग, सुवर्ण नगर शिवाजी हायस्कूलजवळ, बुलडाणा येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ****

No comments:

Post a Comment