Wednesday 10 January 2024

DIO BULDANA NEWS 10.01.2024

 आज महा-60 कार्यक्रमाचे आयोजन

बुलडाणा, दि. 10 : डिस्ट्रीक्ट आऊटरिच प्रोग्राम अंतर्गत महा – 60 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि. 11 जानेवारी 23024 रोजी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

उद्योग संचालनालयाकडून उद्योजकता विकासाबाबत जागरुकता वाढवण्यासाठी आणि जिल्ह्यात उद्योजकतेची परिसंस्था निर्माण करण्यासाठी डिस्ट्रीक्ट आऊटरिच प्रोग्राम महा-60 कार्यक्रम बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यात गुरुवार, दि. 11 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता राजर्श्री शाहू कॉलेज, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, एक्सईडी डेव्हलपमेंट लिमीटेडचे कार्यकारी संचालक संदेश कांबळे, डॅडी चिप्सचे मनोज बुरड, आयडीबीआय कॅपिटलचे मुकुंद तिवारी, राजर्षी शाहू कॉलेजचे प्राचार्य शिरीश जैन, बाबला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सादिक बाबला, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनिल पाटील, व्यवस्थापक एन. एस. पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

00000

दिव्यांग व्यक्तींनी बिजभांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 10 : दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान शिबीरामध्ये बिजभांडवल योजनेसाठी मागणी नोंदविलेल्या दिव्यांग व्यक्तींनी परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान शिबीरामध्ये दिव्यांग व्यक्तींनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण विभागाकडून लघु उद्योगासाठी वित्तीय सहाय्य योजना दिव्यांग बिजभांडवल या योजनेकरीता मागणी नोंदविलेली आहे, अशा  दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग बिजभांडवल योजनेचा परिपूर्ण अर्ज भरावा. तसेच सोबत परिपूर्ण कागदपत्रे जोडावीत. सदर अर्ज दि. 25 जानेवारी 2024 पर्यंत जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, बुलडाणा येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रूपये अनुदानाचा लाभ

बुलडाणा, दि. 10 : राज्यातील सहकारी संघ आणि खासगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर ५ रूपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दुध संघ आणि खासगी दुध प्रकल्पांनी आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास विभाग, मुंबई यांच्याकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासनाने जाहीर केलेल्या ५ रूपये प्रतिलिटर दुधास अनुदान योजनेत सहभागी होण्यासाठी सहकारी संघ आणि खासगी दुध प्रकल्पांनी विहीत नमुन्यात अर्ज करावे लागणार आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या सहकारी दुध संघ आणि दुध प्रकल्पांनी डीबीटी करण्यासाठी दुध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांचा आधार कार्ड आणि पशुधनाच्या कानातील बिल्याशी संलग्न करणे आवश्यक आहे. या योजनेत दुध उत्पादक शेतकरी दुध संघ, खासगी प्रकल्पास दुध पुरवठा करतात ते शेतकरी सहकारी संघ, खासगी प्रकल्पामार्फत सहभागी होवू शकतात. या योजनेचा कालावधी दि. ११ जानेवारी २०२४ ते दि. १० फेबुवारी २०२४ असा आहे.

या योजनेत सहभागी होणाऱ्या सहकारी संघ, खासगी प्रकल्पांनी आपला स्वतंत्र अर्ज उपरोक्त माहितीसह ddemaharashtra@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावेत, असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. डी. एन. काळे यांनी केले आहे.

00000




नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

बुलडाणा, दि. 10 : नेहरू युवा केंद्र आणि जिजामाता महाविद्यालयाच्या वतीने ‘मेरा भारत - विकसित भारत @2047’ या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मंगळवार, दि. 9 जानेवारी 2024 रोजी जिजामाता विद्यालयात पार पडली.

आमदार संजय गायकवाड उद्घाटक म्हणून उपस्थित होते. जिजामाता महाविद्यालयातील कला शाखेचे प्रमुख डॉ. जे. जे. जाधव अध्यक्षस्थानी होते. यावेळी ओमसिंग राजपूत, नेहरू नेहरू युवा केंद्राचे लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. जे. कांदे, गजेंद्र दांडगे उपस्थित होते.

आमदार श्री. गायकवाड यांनी जिल्ह्यात शिक्षणाच्या सोयीसुविधा निर्माण करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच शिक्षणापासून वंचित राहू यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. शिक्षणासोबतच शहराचा विकास करण्यात येत आहे.

स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रुती दिलीप तायडे, द्वितीय क्रमांक प्रांजल मेरसिंग जाधव, तृतीय क्रमांक ऋतुजा कैलास पवार, प्रोत्साहनपर सुयोग विजय शेळके यांनी बक्षीस पटकविले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.

परीक्षक म्हणून यशवंत अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. जयकुमार गवई, नजीम खान पठाण, प्रा. अभिजीत वडाळकर यांनी काम पाहिले. राष्ट्रीय युवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. डी. जे. कांदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रूपाली हिवाळे यांनी सूत्रसंचालन केले. अजयसिंग राजपूत यांनी आभार मानले. यावेळी अजय समाधान वानखेडे यांच्या बासरी वादनाचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमासाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख प्रा. पवन ठाकरे, नेहरू युवा केंद्राचे धनंजय चाफेकर, विलास सोनोने यांनी पुढाकार घेतला.

00000

बुलडाणा येथे विविध प्रशिक्षणाचे आयोजन

बुलडाणा, दि. 10 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग, व्यवसाय सुरु करू इच्छिणारा सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी बुलडाणा येथे 14 ते 18 जानेवारी 2024 दरम्यान शेळीपालन, कुक्कट पालन, गाय- म्हैस पालनासाठी पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय अधिकारी प्रदिप इंगळे यांनी केले आहे.

सुशिक्षित बेरोजगारांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरु करावा हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू आहे. या कालावधीत शेळी, कुक्कुट आणि गाय-म्हशी पालनाचे तंत्र आणि प्रकार त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग आणि लक्षणे, खाद्यनिर्मिती व चाऱ्याचे प्रकार व उद्योग सुरू करण्यासाठी संपूर्ण सहकार्य त्यासोबत उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन आणि सहकार्य  तसेच विविध शासकीय योजनांची माहिती या प्रशिक्षणात देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणारा उमेदवार हा किमान पाचवी पास, तसेच 18 ते 50 वर्षे वयादरम्यानचा असावा. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी दि. 5 जानेवारी 2024 पर्यंत  नाव नोंदणी करावी, असे आवाहन प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, चिखली रोड, बुलडाणा, तसेच 8275093201 आणि 9011578854 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

अनुकंपाधारक उमेदवारांची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध

बुलडाणा, दि. 10 : जिल्हा परिषदेतील अनुकंपाधारक उमेदवारांची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. याची अनुकंपाधारक उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनुकंपाधारक उमेदवारांची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अंतिम ज्येष्ठता यादीतील अनुकंपा धारक उमेदवारांचे ज्येष्ठतेनुसार, उपलब्ध पदानुसार व त्या पदाचे सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांची शासन निर्णयामधील तरतुदीनुसार तात्पुरती निवड करण्यात आली आहे. सदर अनुकंपाधारक उमेदवारांची गट-क आणि गट-ड मधील सरळसेवेच्या पदावर २० टक्के मर्यादेत तात्पुरती निवड यादी जिल्हा परिषद, बुलढाणा zpbuldhana.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या ज्येष्ठता यादीतील उमेदवारांचे आक्षेप, हरकती असल्यास ते सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

मनुष्यबळाच्या सांख्यिकीय माहितीचे विवरणपत्र

31 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 09 :  जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये मनुष्यबळाचा  सांख्यिकीय   माहितीचे त्रैमासिक विवरणपत्र दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाने विकसित केलेल्या mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रोजगारविषयक सेवा ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडे नोंदणीकृत सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, आस्थापना, तसेच अनुदानित, विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांनी सेवायोजन कार्यालये रिक्तपदे अधिसुचित करणे सक्तीचे कायदा १९५९ नुसार त्रैमासिक विवरण पत्र (ईआर-१) ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे.

सदर सुविधा mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. माहे डिसेंबर २०२३ चे त्रैमासिक विवरण पत्र (ईआर-१) दि. १ जानेवारी २०२४ पासून दि. ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरण्यात यावे, ऑनलाईन त्रैमासिक विवरण पत्र (ईआर-१) भरण्यास अडचण निर्माण झाल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

 

No comments:

Post a Comment