Friday 5 January 2024

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन

बुलडाणा,दि.05(जिमाका): सर्वसामान्य नागरिकांना पाच लक्ष रुपयांपर्यंत आरोग्याच्या सुविधा मोफत मिळाव्यात, यासाठी केंद्र शासनाने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना सुरु केली असून, योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी ई-केवायसीसह आभा कार्ड काढून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील केवायसीचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी ई-केवायसी करून घ्यावी. बुलढाणा जिल्ह्यात 18 लक्ष 5 हजार 550 योजनेचा लाभ घेण्यास पात्र लाभार्थी असून, त्यापैकी केवळ 6 लाख 12 हजार 18 लाभार्थ्यांची ई केवायसी पूर्ण झाली आहे. त्यामुळे उर्वरित 11 लक्ष 93 हजार 532 लाभार्थ्यांची ई केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही. जिल्ह्यात एकूण उद्दिष्टापैकी 34 टक्के काम पूर्ण झाले असून, अद्याप 66 टक्के नागरिकांनी आभा कार्ड काढलेले नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी नोंदणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाने सामान्य आणि सर्व शासकीय व निमशासकीय तसेच खासगी यंत्रणांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच उर्वरित लाभार्थ्यांनी स्वतः आयुष्मान अँप मोबाईल गुगल प्ले स्टोअरमधून डाउनलोड link beneficiary.nha.gov.in करून स्वतःची ई केवायसी पूर्ण करता येणार आहे. तसेच आभा कार्ड काढण्यासाठी https://abha.abdm.gov.in/abha या लिंकवर जाता येईल. जिल्ह्यातील महा ई सेवा केंद्रांवर जावूनही हे कार्ड काढता येणार आहे. तसेच नागरिकांना आपले सरकार महा ई सेवा केंद्रांची यादी buldhana.nic.in वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आरोग्य कर्मचारी आशा ताई, अंगणवाडी सेविका, आरोग्य सहायक, एएनएमपरिचारिका आणि ग्रामपंचायत केंद्रचालक, खासगी सेतू केंद्रचालकांमार्फत आयुष्मान भारत ई केवायसी करून घेणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांना दुर्धर आजार जडल्यास योजनेच्या खाजगी आणि शासकीय अंगीकृत रुग्णालयात 1556 विविध गंभीर आजारावर पाच लक्ष रुपये किमतीचे विमा संरक्षण केंद्र शासन देत आहे. लाखोंना झाला फायदा तुम्ही कधी करणार ई केवायसी यादीत नाव नसल्यास शिधा पत्रिका आणि आधार कार्ड घेऊन आरोग्य मित्र मदत केंद्रावर भेटणे गरजेचे आहे तसेच गंभीर आजार आणि अडचणीवेळी 18002332200 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे समन्वयक डॉ. विवेक सावके यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ******

No comments:

Post a Comment