Thursday 18 January 2024

DIO BULDANA NEWS 18.01.2024



 राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला सुरवात

बुलडाणा, दि. 18 : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा सन 2023-24 चे आयोजन जिजामाता क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत 23 लाख रूपयांचे बक्षीसे देण्यात येणार आहे.

स्पर्धेत एकूण 500 पदक, 32संघ, 8 विभाग सहभागी होत आहे. राज्य व्हॉलीबॉल संघटना, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने श्री शिवछत्रपती व्हॉलीबॉल चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दि. 22 जानेवारी 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. स्पर्धेमध्ये राज्यामधील आठ विभागाचे 19 व 21 वर्षाखालील मुले व मुली सहभागी झाले आहे.

स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज चषक प्रतिकृतीसह रोख बक्षीस देण्यात येणार आहेत. यात 21 वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक 20 हजार रूपये, 21 वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक 20 हजार रूपये, 18 वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक 20 हजार रूपये, 18 वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक 20 हजार रूपये, 21 वर्षाखालील मुले द्वितीय क्रमांक.15 हजार रूपये, 21 वर्षाखालील मुली द्वितीय क्रमांक 15 हजार रूपये, 18 वर्षाखालील मुले द्वितीय क्रमांक 15 हजार रूपये, 18 वर्षाखालील मुली द्वितीय क्रमांक 15 हजार रूपये, 21 वर्षाखालील मुले तृतीय क्रमांक 10 हजार रूपये, 21 वर्षाखालील मुली तृतीय क्रमांक 10 हजार रूपये, तसेच विजयी चमु व खेळाडूंना प्रथम क्रमांक 18 ते 21 वर्षाखालील मुले व मुली 48 सुवर्ण पदके, द्वितीय क्रमांक 18 ते 21 वर्षाखालील मुले व मुली 48 रौप्‍य पदके, तृतीय क्रमांक 18 ते 21 वर्षाखालील मुले व मुली 48 कांस्य पदके देण्यात येणार आहे.

स्पर्धेत एकूण 23 लाख 36 हजार रूपयांची बक्षीसे देण्यात येणार आहे. स्पर्धा सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 6 ते 10 पर्यंत चालणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन दि. 19 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. स्पर्धेसाठी चार व्हॉलीबॉल कोर्ट तयार करण्यात आले आहे. स्पर्धेकरीता तांत्रिक तज्‍ज्ञ तालुका क्रीडा अधिकारी श्याम देशपांडे, स्पर्धा निरीक्षक म्हणून कॅप्टन अशोक राऊत आहेत.

00000

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचा मंगळवारी मेळावा

बुलडाणा, दि. 18 : साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यासाठी मंगळवार, दि. 23 जानेवारी 2024 रोजी सकाळी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, चिखली रोड येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित मार्फत मातंग समाज व तत्सम जातीतील कुटुंबाची सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत, यासाठी महामंडळाने नाविण्यापुर्ण योजना सुरु केली आहे. महामंडळाचे भागभांडवलात वाढ होवून एक हजार कोटी झाले आहे.

साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, बार्टी तर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरता योजनांचा प्रचार आणि  प्रसार करण्याकरीता महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, बार्टी कार्यालयाचे अधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. महामंडळाच्या नवीन योजना सुविधा लोन, महिला समृद्धी योजना, शैक्षणिक कर्ज योजना, थेट कर्ज योजना आदी नाविण्यापुर्ण योजनांची माहिती मेळाव्यात देण्यात येणार आहे.

मेळाव्याला जिल्ह्यातील मातंग समाज, तत्सम जातीतील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.

00000
ग्रंथालय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 18 : ग्रंथालय संचालनालयाकडून उत्कृष्ट ग्रंथालयांना पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकते व सेवकांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावे डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येतो.

राज्यातील शहरी आणि ग्रामीण विभागातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे १ लाख रुपये, ७५ हजार रुपये ५० हजार रुपये, २५ हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता आणि एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवकांना प्रत्येकी ५० हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र, तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता आणि उत्कृष्ट सेवकांना प्रत्येकी २५ हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.

सन २०२२-२३च्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारे ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवकांनी विहित नमुन्यातील अर्ज दि. २२ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

00000

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार

योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 18 : मुद्रांक शुल्क भरलेला नसणे किंवा नियमापेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या अथवा नोंदणी केलेली नसलेल्या दस्तांसाठी सरकारने महाराष्ट्र शुल्क अभय योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. दि. 1 डिसेंबर 2023 पासून दि. 31 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 अशा दोन टप्प्यांत ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहजिल्हा निबंधक रमेश पगार यांनी केले आहे.

            मुद्रांक शुल्क अभय योजनेमध्ये कमी स्टॅम्प ड्युटी भरलेल्या जुन्या दस्तांवरील मुद्रांक शुल्कामध्ये आणि दंडामध्ये मोठ्याप्रमाणात सूट दिली आहे. दि. ०१ जानेवारी १९८० ते दि. ३१ डिसेंबर, २००० या कालावधीत निष्पादित केलेल्या ज्या दस्तांमध्ये कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम १ लाखापेक्षा कमी असणार आहे. अशा दस्तांवरील कमी भरलेले संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ करण्यात येऊन व त्यावरील दंडाची रक्कम देखिल संपूर्णपणे माफ करण्यात आली आहे. तर, कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम ही १ लाखापेक्षा जास्त असेल तर, कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये  ५० टक्के सूट देऊन त्यावरील दंडाची संपूर्ण रक्कम माफ करण्यात आली आहे. दि. १ जानेवारी, २००१ ते दि. ३१ डिसेंबर, २०२० या कालावधीमध्ये निष्पादित केला असेल तर, अशा दस्तांवर देखिल कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये २५ टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येऊन त्यावरील दंड हा २५ लाख ते १ कोटी मर्यादेपर्यंतच वसुल करण्यात येणार आहे. त्यापेक्षा जास्त दंडाची रक्कम असेल तर, ती संपूर्णपणे माफ केली जाणार आहे.

काही कारणास्तव पहिल्या टप्यामध्ये सवलत घेण्यासाठी अर्ज करण्यास विलंब झाला तर दुसऱ्या टप्यामध्ये देखिल सवलतीसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. परंतु, हा लाभ हा कमी प्रमाणात मिळेल.

या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्यासह नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अभय योजनेसाठी अर्जदार यांना संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात समक्ष किंवा ऑनलाईन अर्ज करता येतील. अर्जाचा नमुना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर igmaharashtra.gov.in तसेच, सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच योजनेची सविस्तर माहिती या विभागाच्या igrmaharashtra.gov.in वर प्रकाशने परिपत्रक-मुद्रांक अभय योजना या सदराखाली उपलब्ध आहे.

00000

No comments:

Post a Comment