Tuesday 2 January 2024

बुलडाणा सिड हब बनण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा,दि.02(जिमाका): जिल्ह्यातील भाजीपाला बिजोत्पादन कंपनी, शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी उत्पादक गटांनी देशात बुलढाणा जिल्ह्याची ओळख सिड हब होण्यासाठी एकत्रित येऊन बिजोत्पादनाचे जाणिवपूर्वक प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये भाजीपाला बिजोत्पादन वाढवणे, बिजोत्पादन करताना येणाऱ्या अडचणी आणि उपाययोजनांसंदर्भात सिड हब अनुषंगिक बाबी व क्षेत्र विस्तारासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी भाजीपाला बिजोत्पादन कंपन्यांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेत त्यावर विविध उपाययोजना सूचविल्या. सद्यस्थितीत जिल्ह्यातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार व चिखली या चारच तालुक्यात भाजीपाला बिजोत्पादन होते. जिल्ह्यामध्ये भाजीपाला बिजोत्पादन केंद्र उभारणीसाठी कंपनी व शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक गटांनी योग्य समन्वय ठेवत क्षेत्र जास्तीत जास्त विस्तारण्यासाठी यावे. त्यासाठी कंपन्यांना सिंचनाची सोय आवश्यक असल्यास मागेल त्याला शेततळे योजनेंतून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेततळ्यांचा लाभ घ्यावा. तसेच मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेंतर्गत सौर कृषि पंपाकरिता 95 टक्के अनुदान आहे. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक गटांनी समूह पद्धतीने भाजीपाला बिजोत्पादन करण्याबाबत करार करुन घ्यावेत. तसे केल्यास दोघांनाही फायदा होईल. भाजीपाला बिजोत्पादन कंपनींतर्गत काम करणारे कर्मचारी, मजूर व त्यांच्या कुटुंबाला आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, ई-श्रम योजना, जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेण्याबाबत प्रोत्साहीत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. या बैठकीला जिल्ह्यातील कृषि विकास अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी,तालुका कृषि अधिकारी व सर्व भाजीपाला बिजोत्पादन कंपनी प्रतिनिधी व शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. *****

No comments:

Post a Comment