Thursday 11 January 2024

DIO BULDANA NEWS 11.01.2024

 पालक मंत्री दिलीप वळसे पाटील आज जिल्ह्यात


बुलडाणा, दि.११(जिमाका): राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील उद्या शुक्रवार, (दि.१२) रोजी बुलडाणा जिल्हा दौ-यावर येत आहेत.
पालकमंत्री श्री. वळसे -पाटील यांचे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त उद्या सिंदखेड राजा येथील शासकीय विश्रामगृहावर छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी ८:४५ वाजता आगमन होईल.
त्यानंतर सकाळी ९ वाजता राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊसाहेब भोसले यांच्या जन्मस्थळी आगमन व राजे लखुजीराव जाधव राजवाडा, सिंदखेड राजा - राज्य संरक्षित स्मारक व राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊसाहेब भोसले यांच्या ४२६ वी जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत मंजूर असलेल्या राजवाडा जतन व संवर्धन या कामाचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.

राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊसाहेब भोसले यांचे जन्मस्थळ येथून सकाळी ९:३० वाजता पंचायत समिती येथे आगमन व सिंदखेड राजा विकास आराखडा संदर्भात बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

0000

भारतीय सशस्त्र सैन्य दलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी

बुलडाणा, दि. 8 : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी पात्र उमेदवारांची कंबाईन डिफेंस सर्व्हीस या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे राज्यातील युवक आणि युवतींसाठी दि. 1 फेब्रुवारी ते 15 एप्रिल 2024 या कालावधीत कोर्स क्र. 62 आयोजित करण्यात आला आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दि. 25 जानेवारी 2024 रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीवेळी त्यांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर पुणे या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील सीडीएस 62 कोर्ससाठी किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या किंवा व्हॉटस ॲप क्रमांक 9156073306 या क्रमांकावर सीडीएस 62 हा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधीत परिशिष्ट उपलब्ध करुन दिले जाणार आहे. शिफारस पत्र आणि त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट दोन प्रतीत घेऊन आणि ते पुर्ण भरून सोबत घेऊन यावे लागणार आहे.

केंद्रामध्ये सीडीएस कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी पात्रता आवश्यक आहे. त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असवा, उमेदवार लोकसंघ आयोग नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशनकरीता ऑनलाईन अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक, ईमेल आयडी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 व भ्रमणध्वनी क्रमांक 9156073306 यावर संपर्क करावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रूपाली सरोदे यांनी केले आहे.

00000

चोंढी तलावासाठी मच्छीमार संस्थांच्या प्रस्तावावर

हरकती सादर करण्याचे आवाहन

            बुलडाणा, दि. 11 : जिल्ह्यात नव्याने तयार झालेल्या चोंढी, ता. संग्रामपूर येथील तलाव मत्स्य व्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत झाला आहे. या तलावासाठी दोन संस्थांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहे. यावरील हरकती किंवा आक्षेप सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासनाने मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी सुधारीत निकष लागू केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात नविन तयार झालेला संग्रामपूर तालुक्यातील चोंढी तलाव हा कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, बुलडाणा या कार्यालयाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत झाला आहे.

त्यानुसार कार्यालयास प्राप्त झालेल्या संस्था नोंदणीच्या अनुषंगाने नाव राखून ठेवण्याचा आणि बँकेत खाते उघडण्याच्या प्रस्तावास प्राप्त झाल्यानंतर नैसर्गिक न्याय तत्वाने सक्रिय मच्छीमारांना समान संधी मिळण्याच्या हेतूने प्राप्त प्रस्तावावर १५ दिवसाची जाहिर नोटीस देवून आक्षेप आणि हरकती मागविण्यात आल्या आहे. प्राप्त हरकतीवर संबंधिताचे म्हणणे ऐकल्यानंतर त्यांच्या अभिप्रायासह सदर प्रस्ताव १५ दिवसात सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) यांच्याकडे क्रियेशिलता तपासणीसाठी पाठविण्यात येईल. १५ दिवसानंतर प्राप्त हरकतीवर कोणताही विचार केला जाणार नाही.

नियोजित मोईन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. चोंढी, पो. रुधाना, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा आणि नियोजित जयभवानी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. चोंढी, पो. रुधाना, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा या दोन नियोजित संस्थाचे प्रस्ताव कार्यालयास प्राप्त झालेले आहेत, असे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) अ. वि. भोयर यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment