Thursday 25 January 2024

DIO BULDANA NEWS 25.01.2024

 राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सुधारीत नियमावली जाहीर

बुलडाणा, दि. 25 : शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार साहसी उपक्रम या पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार इक्वेस्ट्रियन, गोल्फ, यॉटींग, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलियर्डस् अॅण्ड स्नूकर, सॉफ्टबॉल पुरुष व बेसबॉल महिला आणि जिम्नॅस्टिक्स एरोबिक्स, अॅक्रोबॅटिक्स या खेळांसाठी अर्ज सादर करता येणार आहे

सुधारीत नियमावलीनुसार पुरस्काराकरीता पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीनुसार पुरस्काराकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत. यातील पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीमध्ये शासनाने दि. २५ जानेवारी, २०२४च्या शासन निर्णयानुसार सुधारणा केली आहे. शासनाच्या दि. २९ डिसेंबर २०२३ रोजीचा शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट ४.४ येथे इक्वेस्टरियन, गोल्फ, यॉटींग, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अॅन्ड स्नूकर, सॉफ्टबॉल पुरुष व बेसबॉल महिला या खेळांचा समावेश करण्यास व मॉडर्न पेंटॅथलॉन या खेळामध्ये गुणांकन करताना टेट्राथलॉन या उपप्रकाराचा विचार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०२२-२३ मध्ये करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

पुरस्काराकरीता विहित केलेला अर्ज क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे दि. २५ ते ३१ जानेवारी, २०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्ज स्वीकारण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे कार्यालय कार्यालयीन वेळेत सुट्टीच्या दिवशी देखील सुरु ठेवण्यात येणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी कळविले आहे.

00000



शेतकऱ्यांनी शेतीला प्रयोगशाळा मानून प्रयोग करावेत

-खासदार प्रतापराव जाधव

*मेहकर येथे कृषि महोत्सव, प्रदर्शनीला सुरवात

बुलडाणा, दि. 25 : शेती नफ्याची होण्यासाठी पुढच्या पिढीवर सकारात्मक संस्कार होणे गरजेचे आहे. कष्ट केल्यानंतर शेती नफ्याची होते. तसेच शेती ही एक प्रयोगशाळा आहे, या शेतीमध्ये जेवढे जास्‍त प्रयोग केले जातील, तेवढी त्यात सुधारणा होईल, असे मत खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले. कृषि प्रदर्शनीचे उद्घाटन आज खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार संजय रायमुलकर स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे, आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे, मेहकर बाजार समितीचे सभापती माधव जाधव, लोणार बाजार समितीचे सभापती बळीराम मापारी, मेहकर बाजार समितीचे उपसभापती विलास मेहरूत, लोणार बाजार समितीचे  उपसभापती जगाराव आडे उपस्थित होते.

खासदार जाधव म्हणाले, शेतमध्ये विविध प्रयोग करणे शक्य आहे. या प्रयोगातून शेतीची उत्पादकता वाढते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी पारंपरीक पद्धतीने शेती करण्याऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करावी. खतांचा वापर करताना संतुलीत मात्रे खतांचा उपयोग केल्यास शेतपिकांपासून चांगले उत्पादन मिळण्यास मदत होईल. कृषि प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी, आजही आपली शेती प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पूरक व्यवसायाची कास धरावी. शेतीसोबत जोडधंदा केल्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होऊन आर्थिक प्रगती होण्यास मदत मिळत असल्याचे सांगितले.

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कृषि विभागातर्फे मेहकर येथील राजश्री आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील प्रांगणात कृषि महोत्सव आणि कृषि प्रदर्शनीस आजपासून सुरुवात करण्यात आली. दि. 29 जानेवारीपर्यंत कृषि महोत्सव सुरू राहणार आहे. नागरिकांनी या कृषि प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

00000








राष्ट्रीय मतदार दिवस विविध उपक्रमांनी साजरा

बुलडाणा, दि. 25 : जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शारदा ज्ञानपीठ येथे राष्ट्रीय मतदार दिवसानिनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला शारदा ज्ञानपीठचे अध्यक्ष डॉ. देशपांडे बुलढाणा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहसिनी गोणेवार, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, शरद पाटील, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसिलदार रूपेश खंडारे, गटविकास अधिकारी सरीता पवार उपस्थित होते.

            या कार्यक्रमात शारदा ज्ञानपीठ, श्री शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, पंकज लध्दड अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित पोस्टर, रांगोळी, चित्रकला स्पर्धेच्या प्रदर्शनीची पाहणी केली. तसेच विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी यांनी मतदानाचे महत्व समजावून सांगून उपस्थित विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी करून भविष्यात जागरूक मतदार होण्याचे आवाहन केले.     जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील लोकसंख्या, मतदार, मतदारांची टक्केवारी, मतदारयादीतील इतर तपशिलाची माहिती दिली. जिल्हाधिकारी यांनी विशेषत: नवीन मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करून नोंदणी सुलभ करणे आणि जास्तीत जास्त नोंदणी, मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेची माहिती देऊन सहभाग वाढविण्याचे आवाहन केले.

            यावेळी नवमतदारांचा सत्कार करण्यात आला. त्यांना राष्ट्रीय मतदार दिवस समारंभात मतदार फोटो ओळखपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमात राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त लोकशाही निष्ठा ठेवण्यासंबधी शपथ देण्यात आली.

00000

पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आज ध्वजवंदन

बुलडाणा, दि. 25 : प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शुक्रवार, दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस कवायत मैदान येथे ध्वजवंदन होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

श्री. वळसे पाटील हे शुक्रवार, दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता शासकीय विश्राम भवन येथून निघून 9.15 वाजता भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन, संचलन समारंभ व इतर कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1.30 वाजता सिंदखेड राजा येथील दि चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. शाखा सिंदखेडराजाच्या नुतन वास्तू उद्घाटन व स्थानांतरण सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता मेहकर येथील राजश्री आयुर्वेदिक महाविद्यालय समोरील प्रांगण येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीवर्षानिमित्त कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, कृषी विभाग आणि मेहकर, लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आयोजित श्री अन्न निरंतर कृषी महोत्सव व कृषी प्रदर्शनास भेट देतील. त्यानंतर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गे नाशिककडे प्रयाण करतील.

00000











रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हेल्मेट रॅली

बुलडाणा, दि. 25 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त शहरातून हेल्मेट रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी हेल्मेट रॅलीला हिरवी झेंडी दाखविली.

हेल्मेट रॅली शहरातून जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेट बॅंक चौक, तहसिल चौक, त्रिशरण चौक, सर्कुलर रोड मार्गे धाड नाका, जयस्तंभ चौक मार्गे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी शिपाई संवर्गातील कर्मचारी व सफाई कामगारांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चालकाचे नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांच्या अध्यक्षेत स्कुल बस समितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधिक्षक बाबुराव महामुनी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, मुख्याधिकारी गणेश पांडे, शिक्षणाधिकारी सिध्देश्‍वर काळुसे, उपस्थित होते. उपस्थितांनी रस्ता सुरक्षा संबंधी मार्गदर्शन केले. तसेच वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले.

00000

सेस फंड योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

बुलडाणा, दि. 25 : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे सेस फंड योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून आता दि. 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या 20 टक्के सेस फंड योजनेंतर्गत सन 2023-24 या वर्षासाठी मागासवर्गीय शेतकऱ्यांना, मागासवर्गीय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीस 100 टक्के अनुदानावर 5 एचपी विद्युत मोटार पंप, एचडीपीई पाईप, मागासवर्गीय महिलांकरीता शिलाई मशिन पुरविण्याची योजना घेण्यात आली आहे. सदर योजनेचे अर्ज पंचायत समितीस्तरावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मागासवर्गीय शेतकरी व महिला लाभार्थ्यांनी परीपूर्ण अर्ज अनुषंगिक सर्व कागदपत्रासह संबंधीत गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करावेत.

या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment