Monday 1 January 2024

शेतकऱ्यांनी हरभरा घाटे अळी, मर रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन

बुलडाणा,दि.01(जिमाका): रब्बी हंगामातील हरभरा पिकावर घाटे अळीच्या तोडणाऱ्या अळ्या आणि मर रोगाचे वेळेत एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे. लहान अळ्या सुरुवातीस पानांची खालील बाजू खरवडून खातात. त्यामुळे पानांवर पांढरट डाग दिसून येतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास पानांची जाळी झालेली दिसून येते. अळ्या झाडांचे कोवळे शेंडे देखील कुरतडून खातात त्यामुळे शेंडे पाने विरहित होतात. पिकास आलेल्या कळ्या व फुले कुरतडून खाल्ल्यामुळे घाटे कमी प्रमाणात लागतात. पूर्ण वाढ झालेली अळी घाट्यात खुपसून दाणे फस्त करते. त्यामुळे घाट्यांवर गोलाकार छिद्रे दिसून येतात. घाटे पक्वतेच्या कालावधीतील ढगाळ वातावरण किडीच्या वाढीस अतिशय पोषक असल्यामुळे अल्पावधीतच किडीची संख्या झपाट्याने वाढू शकते. एकात्मिक व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी हेक्टरी 200 ग्रॅम ज्वारी शेतामध्ये फेकावी जेणेकरून त्याचा नैसर्गिक पक्षी थांबा' म्हणून चांगला उपयोग होतो. वेळोवेळी निंदणी, कोळपणी करून पीक तण विरहित ठेवावे. बांधावरील कोळशी, रानभेंडी व पेटारी इ. तणे काढून नष्ट करावीत. मुख्य पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी. इंग्रजी टी आकाराचे पिकापेक्षा 1ते दीड फूट उंचीचे पक्षीथांबे 50 प्रती हेक्टरी दर 15-20 मीटर अंतरावर लावावेत. त्यामुळे चिमणी, साळुंखी, कोळसा इ. पक्षी त्यावर बसतात व घाटे अळ्या खातात. अळीच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे जमिनीपासून मीटरभर उंचीवर लावावेत. पिक सुरवातीला कायिक वाढीत असताना 5 टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टिन 0.30% डब्लू. एस. पी. 300 पी. पी. एम.50 मि.ली. प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पहिली प्रतिबंधात्मक फवारणी व 15 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी केल्यास घाटे अळीचा पतंग अशा पिकावर अंडी घालण्याचे टाळतो. पिक 50 टक्के फुलोऱ्यावर असताना व घाटे भरतांना सुरवातीच्या काळात अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास शक्य तितक्या अळ्या वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात बुडवून माराव्यात. जैविक घटकांचा वापर घाटेअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या दिसू लागताच, एच. ए. एन. पी. व्ही. विषाणू 250 एल. ई. 10 मि.ली. प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. विषाणूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व उन्हापासून संरक्षण करण्यासाठी 1 ग्रॅम राणीपाल (नीळ) फवारणीच्या द्रावणात मिसळावे. रोगकारक बुरशी बिव्हेरिया बॅसिअॅना 1.15 % डब्लू. पी. 50 ग्रॅम किंवा बॅसिलस थुरिनजिएन्सीस कुर्सटाकी प्रजाती 0.5 % डब्लू. पी. 40 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रासायनिक किटकनाशके-किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास (दोन अळ्या प्रती मीटर ओळीत आढळून आल्यास किंवा 5 टक्के घाट्यांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास अथवा सतत 2-3 दिवस प्रत्येक सापळ्यात 8 ते 10 पतंग आढळून येत असल्यास) कीटकनाशकांची फवारणी करावी. फवारणीसाठी रासायनिक किटकनाशके प्रति 10 लिटर पाण्यामध्ये वापरावीत. इमामेक्टीन बेन्झोएट हे प्रति 10 लिटर पाण्यामध्ये 1.90% ई. सी. किंवा 7.5 मि.ली. वापर, क्लोरेंट्रॅनिलीप्रोल 18.50% एस. सी. किंवा 2.5 मि.ली., ईथिऑन 50% ई. सी. किंवा 20 मि.ली, फ्लुबेन्डामाईड 20% डब्लू. जी. किंवा 5 ग्रॅम, फ्लुबेन्डामाईड 39.35 % डब्लू. जी. किंवा 2 मि.ली., नोव्हॅल्युरॉन 10% ई. सी. किंवा 15 मि.ली., क्विनॉलफॉस 25% ई. सी. किंवा20 मि.ली. आणि नोव्हॅल्युरॉन 5.25% + इंडोक्साकार्ब 4.50% एस. सी. 16.5 मि.ली. पाण्यात वापरावीत. हरभऱ्यावरील मर रोग फ्युजारियम ऑक्सिस्पोरम बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार जमिनीमधून आणि रोगग्रस्त बियाणेव्दारे होतो. रोगाची बुरशी साधरणतः 6 वर्षापर्यंत जमिनीत जिवंत राहू शकते. पण ज्या भागात हवामान जास्त थंड राहते तेथे याचा प्रार्दुभाव कमी दिसतो. या रोगाच्या बुरशीमुळे झाडाच्या अन्नद्रव्य वाहून नेणाऱ्या पेशी मरतात. झाडाचा जमिनीवरचा भाग, देठ आणि पाने सुकतात व झाडे वाळून मरतात. जमिनी खालचा खोडाच्याभागाचा रंग फिकट होतो व कोवळी रोपे सुकतात. रोगग्रस्त झाडाच्या खोडांना उभा छेद दिल्यास आतील भाग तांबुस, तपकिरी व काळसर रंगाचा झालेला दिसतो. हरभऱ्याचे एकात्मिक व्यवस्थापन पिकाची वेळेवर पेरणी करावी. मर प्रतिकारक्षम वाणांचा वापर करावा. लागवडीपूर्वी 3 ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा ट्रायकोडर्मा हरजियानाम 1 टक्के डब्ल्यू. पी. 6 ग्रॅम प्रती किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. ट्रायकोडर्मा व्हिरीडी 5 किलो प्रती हेक्टरी शेणखतातून मिसळून द्यावे. ट्रायकोडर्मा व्हीरीडी 5 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. रोगग्रस्त झाडे आढळून आल्यास तात्काळ उपटून नष्ट करावीत, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. ******

No comments:

Post a Comment