Tuesday 9 January 2024

DIO BULDANA NEWS 09.01.2024

 शुक्रवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

बुलडाणा, दि. 09 : जिल्हा रूग्णालयात नियमितपणे दिव्यांग तपासणी शिबीर घेण्यात येते. मात्र शुक्रवार, दि. 12 जानेवारी 2024 रोजी रोजी स्थानिक सुट्टी असल्यामुळे शिबीर रद्द करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात नियमित शुक्रवारी मतिमंद, मनोरूग्ण, कान, नाक, घसा व नेत्र संबंधित दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र बुधवार, दि. 12 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे या दिवसाचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे. 

00000

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतील निर्वाह भत्याचे वितरण

*निर्वाह भत्या व्यतिरिक्त रक्कम जमा करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 09 : केंद्र शासनाने अनुसुचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची 60 टक्के हिश्याची रक्कम महाडीबीटी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

रक्कम जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना अनुज्ञेय असलेल्या निर्वाह भत्ताची रक्कम वजा करुन उर्वरीत शिक्षण, परीक्षा आणि इतर शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालयास सात दिवसांच्या आत जमा करावी लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीची सन 2021-22 व 2022-23 वर्षातील केंद्र शासनाची 60 टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. करीता ज्या विद्यार्थ्यांच्या खात्यात अशी रक्कम जमा झाली अथवा काही दिवसात जमा होणार आहे, अशा विद्यार्थ्यांनी त्या रकमेमधून निर्वाह भत्याची 60 टक्के रक्कम वजा करुन उर्वरीत रक्कम महाविद्यालयात जमा करावी, याबाबत संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

दुकानाचे नामफलक मराठीत आवश्यक

बुलडाणा, दि. 09 : प्रत्येक दुकानाचे नामफलक सुरवातीला मराठीत नाव असणे अनिवार्य असल्याची तरतूद महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दुकानांचे नामफलक मराठीत असणे आवश्यक आहे.

अधिनियमाच्या कलम 7 नुसार सर्व आस्थापनांना कलम 36 क (1), कलम 6 नुसार नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेत दहापेक्षा अधिक कामगार आहेत, अशा सर्व आस्थापनेचे नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असावे. परंतु अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडील देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरीक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील.

मराठी भाषेतील अक्षरलेखन, नाम फलकावर सुरवातीला लिहिणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील अक्षराचा टंक आकार, इतर कोणत्याही भाषेतील अक्षराचा टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. तसेच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशी आस्थापना नाम फलकावर महान व्यक्तींची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहिणार नाही.

याबाबत शासनाने दि. 17 मार्च 2022 रोजी अधिनियमात सुधारणा केली आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापना मालकांनी याचे तंतोतंत पालन करावे, या तरतुदीचा भंग करणाऱ्या आस्थापना मालकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आ. शि. राठोड यांनी केले आहे.

00000

बालिकेच्या ताब्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 09 : बाल कल्याण समितीच्या आदेशाने सखी नामक बालिकेचे पुर्वसन करण्यासाठी दत्तक विधान मुक्त करणे आवश्यक आहे. या बालिकेच्या ताब्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आल आहे.

बालिका नामे सखी ही दि. ५ जानेवारी २०२३ रोजी बाल कल्याण समितीच्या आदेशाने यशोधाम, दी लव्ह ट्रस्ट फॉर इंडियन चिल्ड्रेन इन नीड (इंडिया), बुलडाणा येथे दाखल झाली आहे. सदर बालिकेची आई कुसुम वामन लकडे, रा. सव, हिला वैद्यकिय मंडळाने ५० टक्के कायमस्वरुपी दिव्यांग प्रमाणपत्र दिले आहे. सद्यस्थितीत सदर महिला ही सेवा संकल्प प्रतिष्ठान, पळसखेड सपकाळ, ता. चिखली येथे आश्रयाला आहे. सदर बालिका अद्यापपर्यंत यशोधाम, दि लव्ह ट्रस्ट फॉर इंडियन चिल्ड्रेन इन नीड (इंडिया), बुलडाणा येथे दाखल आहे.

बालिकेला विचारण्यासाठी, तसेच बालिकेचे कोणीही नातेवाईक सांभाळण्यासाठी किंवा ताबा घेण्यासाठी आलेले नाहीत. त्यामुळे सदर बालिकेला बाल कल्याण समिती कडुन पुनर्वसनासाठी दत्तक विधान मुक्त करण्यासाठी विधीमुक्त करणे आवश्यक आहे. बालकाचे कोणीही रक्त संबंधातील नातेवाईक असल्यास त्यांनी ३० दिवसाच्या आत यशोधाम, दि लव्ह ट्रस्ट फॉर इंडियन चिल्ड्रेन इन नीड (इंडिया), बुलडाणा, खामगाव रोड, सेंट जोसेफ स्कुलजवळ, सुंदरखेड, बुलडाणा, ता. बुलडाणा, जि. बुलडाणा या संस्थेस संपर्क साधावा, तसेच मोबाईल क्रमांक ९५५२२०६५०३ सामाजिक कार्यकर्ता रामेश्वर जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहान जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी केले आहे.

00000

नायलॉन मांजावर कायमस्वरूपी बंदी

बुलडाणा, दि. 09 : मकरसंक्रांती सण आणि इतर वेळेस पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याची निर्मिती, विक्री, साठवणूक आणि वापर करण्यास संपूर्ण जिल्ह्यात कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे.

 दोन पतंगांमध्ये दोऱ्याचे घर्षण होवून मोठ्या प्रमाणात मांजा तुटुन उंच झाडे आणि इमारतीमध्ये मांजा अडकतो. त्यामुळे वनपक्ष्यांच्या जिवीतास धोका निर्माण होवून पशू-पक्षी जखमी, मृत होतात. पतंगासह तुटलेल्या नायलॉन मांजाच्या धाग्याचे तुकडे जमिनीवर पडुन त्याचे विघटन होण्यासारखे नसल्याने गटारे आणि नदी-नाल्यासारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात.

गाय अथवा तत्सम प्राण्यांनी नायलॉन मांजाचे तुकडे समाविष्ट असलेले खाद्य सेवन केल्यामुळे गुदमरण्याचा त्रास होतो. अशाप्रकारे मांजा, धाग्यांमधील प्लास्टिकच्या वस्तूंमुळे विविध प्रकारचे दुष्परिणाम होतात. प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूंचा वापर करुन बनविण्यात आलेल्या आणि सर्वसाधारण नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्यामुळे पक्षी आणि मानव जिवीतास इजा पोहोचते. काही वेळा या इजा प्राणघातक ठरतात, त्यामुळे पतंग उडवण्याच्या नायलॉन मांजा, धाग्यामुळे होणाऱ्या प्राणघातक इजांपासून पक्षी आणि मानवाच्या जिवीताचे संरक्षण करण्यासाठी नायलॉन मांजाची साठवणुक, विक्री, निर्मिती व वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हादंडाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986चे कलम 5 व उपद्घोतात नमूद शासन पत्र दि. 18 जून 2016 मध्ये नमूद केल्यानुसार आदेश पारीत करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, साठवणुकदार यांना नायलॉन मांजाची विक्री आणि साठवणूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस विभागांनी स्वतंत्ररित्या पथके तयार करुन आवश्यक ती कार्यवाही करावी. आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था यांनी उल्लंघन केल्यास सदर बाब ही पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 चे कलम 15 अन्वये शिक्षेस पात्र राहणार आहे.असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

00000

ऑनलाईन प्लेसमेन्ट ड्राईव्हचे आयोजन

बुलडाणा, दि. 09 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करीअर सेंटरच्या वतीने दोन दिवसीय ऑनलाईन प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन दि. १० ते ११ जानेवारी २०२४ दरम्यान करण्यात आले आहे.

रोजगार मेळाव्यामध्ये नवकिसान बायो, नांदेड, नवभारत फर्टीलायझर, अमरावती, स्पंदन स्पुर्थी फायनान्स, क्रेडिट अॅक्सेस ग्रामीण कोटा लिमिटेड, पीपल ट्री व्हेंचर, धुत ट्रान्समिशन, तसेच इतर स्थानिक व जिल्ह्याबाहेरील कंपनीने प्लेसमेन्ट ड्राईव्हसाठी पदे अधिसूचित केली आहे. रोजगार कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी या प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले आहे.

या ड्राईव्हद्वारे संबंधित कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजू आणि रोजगार इच्छुक उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील. तसेच त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार विभागाच्या ncs.gov.in आणि राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी आणि बारावी पास उमेदवारांनी आपले आयडी आणि पासवर्डचा वापर करुन आपले लॉगइनमधुन ऑनलाईन अर्ज करुन सहभागी व्हावे.

या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार ज्या ठिकाणी असतील तेथूनच आयडी आणि पासवर्डचा उपयोग करुन लॉगइनमधून ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होऊ शकतील. पात्र गरजू आणि नोकरी इच्छुक महिला, पुरुष उमेदवार आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदांकरीता अर्ज करु शकतील, असे सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी कळविले आहे.

00000

दुष्काळी भागात उपाययोजना, सवलती लागू

बुलडाणा, दि. 09 : खरीप हंगाम सन २०२३ च्या महसूल व वन विभाग (मदत व पुनर्वसन) यांच्यामार्फत राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तसेच या तालुक्या व्यतिरीक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यापेक्षा कमी आणि एकूण पर्जन्यमान ७५० मिमिपेक्षा कमी झाले आहे, अशा एकूण १ हजार २१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागात उपाययोजना आणि सवलती लागू करण्यात आल्या आहे.

शासन निर्णयानुसार राज्यातील २४ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा आणि १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. दि. १० नोव्हेंबर २०२३च्या शासन निर्णयानुसार १ हजार २१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खरीप २०२३ हंगामातील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती व अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार व्यापारी बँकांनी सार्वजनिक बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामिण बँका, लघुवित्त बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून कार्यवाही करण्यात येणार आहे.

खरीप २०२३ हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीची मुदत दि. ३१ मार्च २०२४ असल्याने वरीलप्रमाणे बाधित तालुक्यातील जे शेतकरी विहीत मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत, अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप २०२३च्या हंगामातील पीक कर्जाच्या व्याजासह भारतीय रिर्जव्ह बँकेच्या निर्देशानुसार पुनर्गठन करण्यात येणार आहे. तसेच खरीप २०२३ हंगामाकरीता दुष्काळ, दुष्काळसदृष्य घोषित केल्याचे आदेश दि. १० नोव्हेंबर, २०२३ पासून अंमलात येणार आहे. हे आदेश रद्द न केल्यास पुढील ६ महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहतील, याबाबत राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांनी कार्यवाही करावी, खरीप हंगाम २०२३ मधील पीक कर्जाच्या पुनर्गठनाची कार्यवाही सर्व बँकांनी दि. ३० एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करावी, तसेच पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

00000

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2022-23

बुलडाणा, दि. 09 : राज्य शासनाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी दि. 22 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

क्रीडा विभागातर्फे राज्यातील क्रीडापटू आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली २०२३ची नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन २०२२-२३ या वर्षाच्या पुरस्कारासाठी दि. २२ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. पुरस्काराकरीता राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करणाऱ्या इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम आणि दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील स्क्रोलिंग लिंकमध्ये उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर दि. ८ ते २२ जानेवारी २०२४ पर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करता येईल. या क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.

00000

शुक्रवारी मिलेट दौडचे आयोजन

बुलडाणा, दि. 09 : संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 ते वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त शुकवार, दि. 12 जानेवारी 2024 रोजी मिलेट दौडचे आयोजन करण्यात आले आहे.

ही दौड जिल्हाधिकारी कार्यालयातून सुरू होणार आहे. या सहभागी होणाऱ्यांनी सकाळी सात वाजता उपस्थित राहावे, ही दौड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, कारंजा चौक, भोंडे सरकार चौक, तहसिल कार्यालय, संगम चौकतून जिजामाता प्रेक्षागार मैदान येथे समापत होईल. मिलेट दौडमध्ये सहभागी होण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

00000

No comments:

Post a Comment