Wednesday 24 January 2024

DIO BULDANA NEWS 24.01.2024

 राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृती सप्ताह

बुलडाणा, दि. 24 : राष्ट्रीय मतदार दिन गुरूवार, दि.25 जानेवारी 2024 रोजी साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त दि. 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान मतदार जागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे.

या सप्ताहात मतदार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. मतदार नोंदणीची शिबीर आयोजित करण्यासंदर्भांत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्य घेण्यात येणार आहे. हे शिबीरे आयोजित करताना वातावरण निर्मिती करण्यासाठी घोषवाक्य, भिंतीपत्रके, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने लोकशाही निष्ठा ठेवण्यासंबधी शपथ घेण्यात येणार आहे. जिल्हा कार्यालयाकडुन राष्ट्रीय मतदारदिनी वर्षभरामध्ये निवडणूक कर्तव्यार्थ उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली आहे. आयोगाच्या स्थापनेनिमित्त 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिवस 2024 ची थीम थीम मतदाना इतके अमुल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही’ अशी आहे.

तरुण मतदारांना राजकीय प्रक्रियेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र शासनाने दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येत आहे. संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा करण्यात येतो. त्यामध्ये मतदान केंद्रे, उपविभाग, विभाग, जिल्हा आणि राज्य मुख्यालयांचा समावेश आहे. राष्ट्रीय मतदार दिवस उत्सवाचा मुख्य हेतू  हा विशेषत: नवीन मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करणे, नोंदणी सुलभ करणे आणि जास्तीत जास्त नोंदणी करणे आहे. या दिवसाचा उपयोग मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी, निवडणूक प्रक्रियेत माहिती देऊन जास्तीत जास्त सहभाग वाढविण्यासाठी केला जातो. नवीन मतदारांचा सत्कार करण्यात येतो. तसेच मतदार फोटो ओळखपत्र दिले जाते.

या उपक्रमामुळे तरुणांना सबलीकरणाची, अभिमानाची भावना मिळते. त्यांना त्यांचा मताधिकार वापरण्याची प्रेरणा मिळते. यासाठी विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करून नवमतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यात येते. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामार्फत विविध स्पर्धा घेऊन विजेत्यांना प्रमाणपत्र दिले जाणर आहे. 

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यामध्ये सर्व नागरीकांनी, नवीन मतदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी केले आहे.

00000

वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी आज निवड

बुलडाणा, दि. 24 : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग आणि महिला बालकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना 2023-24 साठी लाभार्थ्यांची गुरूवार, दि. 25 जानेवारी रोजी निवड करण्यात येणार आहे.

योजनांकरीता प्राप्त झालेल्या पात्र अर्जामधून ईश्वर चिठ्ठीने लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ईश्वर चिठ्ठीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

समाज कल्याण विभागाच्या मागासवर्गीय शेतकऱ्यासाठी एचडीईपी पाईप, मागासवर्गीय शेतकऱ्यासाठी 5 एचपी विद्युत मोटर पंप, मागासवर्गीय महिलांसाठी शिलाई मशिन, दिव्यांग व्यक्तीकरिता मिनी पिठाची गिरणी, तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या ग्रामीण भागातील महिला व मुलींना पिठाची चक्की पुरविणे (विघयो), ग्रामीण भागातील महिला व मुलींना शिलाई मशिन पुरविणे (विघयो), ग्रामीण भागातील महिला व मुलींना मिनी दाल मिल पुरविणे (विघयो), ग्रामीण भागातील महिला व मुलींना मसाला उद्योग यंत्र पुरविणे (विघयो) या योजनांसाठी लाभार्थी निवड करण्यात येणार आहे.

यावेळी लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

000000

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या मेळाव्यात योजनांची माहिती

बुलडाणा, दि. 24 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मेळावा पार पडला. मेळावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात मंगळवारी, दि. २३ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात आला.

 महामंडळामार्फत मातंग व तत्सम जातीतील कुटुंबाची सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत, तसेच त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महामंडळाने नाविण्यपूर्ण योजना सुरु केल्या आहेत. महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागाळापर्यत पोहोचण्याकरीता योजनांचा प्रचार व प्रसार करण्याकरीता मेळावा घेण्यात आला.

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे आमदार संजय गायकवाड, महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिल म्हस्के, महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक अ. ब. साळुंके, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त अनिता राठोड, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे उपस्थित होते.

मेळाव्यानिमित्त शाहीर केशव डाखोरे वाशिमकर यांचा अण्णाभाऊंच्या जीवनावर शाहीरी कार्यक्रम झाला. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व महाव्यवस्थापक यांनी महामंडळाच्या नाविण्यापूर्ण योजनांबाबत मार्गदर्शन केले.

आमदार गायकवाड यांनी मातंग समाजातील लाभार्थींनी योजनांचा लाभ घ्यावा, तसेच नाविण्यपूर्ण योजना लवकरच ऑनलाईन करण्यात येणार असलयाचे सांगितले. आमदार गायकवाड यांच्या हस्ते विविध योजनांतील धनादेश वितरीत करण्यात आले. तसेच थेट कर्ज योजनेचे मंजुरी आदेश वाटप करण्यात आले. श्री. गाभणे यांनी प्रास्ताविक केले. वैशाली तायडे यांनी सूत्रसंचालन केले. विजय तायडे यांनी आभार मानले.

00000

मेहकर येथे आजपासून कृषि महोत्सव, प्रदर्शनी

बुलडाणा, दि. 24 : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कृषि विभागातर्फे मेहकर येथे कृषि महोत्सव आणि कृषि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवार, दि. 25 जानेवारी 2024 पासून दि. 29 जानेवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे.

मेहकर येथील राजश्री आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील प्रांगणात ही प्रदर्शनी सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. कृषि प्रदर्शनीचे उद्घाटन गुरूवारी दुपारी २ वाजता पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार प्रतापराव जाधव अध्यक्षस्थानी राहतील. आमदार संजय रायमुलकर स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षा खडसे, आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, राजेश एकडे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे उपस्थित राहणार आहेत.

योवळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे, मेहकर बाजार समितीचे सभापती माधव जाधव, लोणार बाजार समितीचे सभापती बळीराम मापारी, मेहकर बाजार समितीचे उपसभापती विलास मेहरूत, लोणार बाजार समितीचे  उपसभापती जगाराव आडे यांनी केले आहे.

00000

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 24 : जिल्ह्यातील उत्कृष्ठ क्रीडापटू, दिव्यांग गुणवंत खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांचे कार्य, योगदानाचे मुल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला), दिव्यांग गुणवंत खेळाडू यांना जिल्हा क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येते. यासाठी दि. 20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहे.

यावर्षी प्रजासत्ताक दिनी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार होते. परंतु अपरिहार्य कारणामुळे दि. 26 जानेवारी 2024 रोजी जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरीत केले जाणार नाही. त्यामुळे पात्र खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांनी परिपूर्ण प्रस्ताव दि. 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करावे. सदर पुरस्कार महाराष्ट्र दिनी दि. 1 मे 2024 रोजी वितरीत करण्यात येतील. या पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख 10 हजार रूपये असे आहे. त्या अनुषंगाने सन 2021-22 व 2022-23 च्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्षे वास्तव्य असावे. क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केलेले असावे. त्याने वयाची 30 र्वो पुर्ण केली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरीता त्या जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल. दिव्यांग खेळाडू व गुणवंत खेळाडू पुरस्कार वर्षासह लगतपूर्व 5 वर्षापैकी 2 वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केले असावे. एका जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. एकदा एका खेळामध्ये किंवा एका प्रवर्गामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त केलेली व्यक्ती पुन्हा त्याच खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळण्यास पात्र असणार नाही.

पुरस्कार वर्षाची गणना 1 जुलै ते 30 जुन अशी राहील. तीनही पुरस्काराकरीता अर्जासोबत सादर करण्यात आलेले प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे पुन्हा सादर करु नये. अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे व प्रमाणपत्र सत्य असल्याबाबत संबंधित तहसिलदार यांच्याकडून ॲफीडीवेट करुन घ्यावे.

विहीत नमुन्यातील अर्ज आणि पुरस्काराच्या अटी व शर्ती आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथून अर्ज प्राप्त करुन घ्यावे. परिपुर्ण अर्ज सिल बंद लिफाफ्यामध्ये दि.20 फेब्रुवारी 2024 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर यांनी केले आहे

00000

पॉवरलिफ्टींग स्पर्धेचे आयोजन

बुलडाणा, दि. 24 : जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे विना अनुदानीत क्रीडा स्पर्धेत पॉवरलिफ्टिंग खेळाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील राज्य संघटनेद्वारे मान्यताप्राप्त अधिकृत पावर लिफ्टिंग खेळाच्या संघटनांनी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष, सचिव यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment