जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा,दि.01(जिमाका): उत्कृष्ठ क्रीडापटू, क्रीडा प्रशिक्षक, मार्गदर्शकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. यासाठी जिल्ह्यातील इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला), दिव्यांग गुणवंत खेळाडूंना प्रजासत्ताक दिनी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण करण्यात येते. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि 10 हजार रुपये रोख असून, त्या अनुषंगाने सन 2021-22 व 2022-23 च्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जदाराचे सलग 15 वर्षे राज्यात वास्तव्य असले पाहीजे. क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे व त्याने वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असावीत. गुणांकनासाठी त्या जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल. दिव्यांग व गुणवंत खेळाडूने पुरस्कार वर्षासह सलग 5 वर्षापैकी 2 वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. एका जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. एकदा एका खेळ किंवा प्रवर्गामध्ये पुरस्कार प्राप्त व्यक्ती पुन्हा पुरस्कार मिळण्यास पात्र असणार नाही. पुरस्कार वर्षाची गणना 1 जुलै ते 30 जून असे राहील. पुरस्कारासाठी अर्जासोबत सादर प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे परत सादर करू नयेत. अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे व प्रमाणपत्र सत्य असल्याबाबतचे संबंधित तहसिलदाराचे शपथपत्र सादर करावे. विहीत नमुन्यातील अर्ज आणि पुरस्काराच्या अटी व शर्तीच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे दि.10 जानेवारी 2024 पर्यंत सादर करावेत, जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. ******

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या