Monday 29 January 2024

DIO BULDANA NEWS 29.01.2024

 जिल्ह्यातील जातीनिहाय सर्व्हेक्षणाला नागरिकांनी सहकार्य करावे

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 29 : जिल्ह्यात जातनिहाय सर्व्हेक्षण घरोघरी जाऊन करण्यात येत आहे. यात नागरिकांशी निगडीत अन्य माहितीही घेण्यात येत आहे. नागरिकांनी ही माहिती घेण्यासाठी आलेल्या प्रगणकाला योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

सर्वेक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील एक हजार 306 गावांमध्ये 5 लाख 64 हजार 572 घरांपर्यंत पोहोण्यात येणार आहे. यात 28 लाख 51 हजार 802 लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. आतापय्रंत 87 टक्के सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून 4 लाख 91 हजार 67 घरांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसात सर्व्हेक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी आज जातनिहाय सर्व्हेक्षणाचा तहसिलदारांकडून आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, मुख्याधिकारी गणेश पांडे आदी उपस्थित होते. यात प्रामुख्याने प्रगणकांची उपलब्धता, आतापर्यंत झालेल्या नोंदी, खुल्या प्रवर्गातील नोंदी, मराठा समाजाच्या नोंदी, सर्वेक्षणाच्या कामाची टक्केवारी आदींबाबत माहिती घेतली. तहसिलस्तरावरून दररोज सायंकाळी चार वाजता गुगल शीट मध्ये डाटा भरावा. तसेच सर्व्हेक्षणात अद्यापपर्यंत ज्या कुटुंबापर्यंत पोहोचू शकले नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचून सर्व्हेक्षणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे.

यात नगरपालिका किंवा जास्त घनता असलेल्या क्षेत्रात सर्व्हेक्षण करताना मेहनत घ्यावी लागणार आहे. कमी कालावधीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचून सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे लागणार आहे. त्यामुळे सार्वजनिक सुविधा आहेत, त्यांची माहिती प्रगणकाने स्वत: भरावी. नागरी भागात कार्यालये, शाळा, दुकाने अशा ज्या ठिकाणी नागरिक उपलब्ध होतील, त्याठिकाणी सर्व्हेक्षण करण्यात यावे. तसेच मजूर, स्थलांतरीत नागरिकांचे योग्य सर्व्हेक्षण करावे.

जिल्ह्यात खुल्या प्रवर्गातील नागरिकांची संख्या कमी दिसून येत आहे. त्यामुळे या नोंदी घेण्याकडे प्रगणकांनी अधिक लक्ष पुरविणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्याचे सर्व्हेक्षण दोन दिवसात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवले असल्याने यात सर्व यंत्रणांनी जाणिवपूर्वक काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.

00000

तलाठी भरतीमधील निवडयादीतील

उमेदवारांच्या मुळ कागदपत्र तपासणी

*उमेदवारांनी तपासणीसाठी हजर राहण्याचे आवाहन

*बुधवार, गुरुवारी होणार कागदपत्रांची तपासणी

बुलडाणा, दि. 29 : तलाठी पदभरती 2023 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी बुधवार, दि. 31 जानेवारी आणि गुरुवार, दि. १ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. यावेळी उमेदवारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तलाठी पदभरती 2023 ही दि. 17 ऑगस्ट 2023 ते दि. 14 सप्टेंबर 2023 यादरम्यान टीसीएस कंपनीमार्फत ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात आली.  या परीक्षेच्या निकालामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे व ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे जिल्ह्याच्या एनआयसी संकेतस्थळावर निवड, प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध केलेल्या निवडयादीतील उमेदवारांनी सामाजिक प्रवर्ग, समांतर आरक्षणनिहाय जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे मुळ प्रमाणपत्र तपासणीकरीता हजर रहावे लागणार आहे. उमेदवारांनी येताना ऑनलाईन अर्जाची प्रत, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, तसेच ऑनलाईन अर्जामध्ये नमुद केलेली सर्व मुळ प्रमाणपत्रे व या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या प्रतीचा एक संच व दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-अ, भटक्या जमाती-ब, भटक्या जमाती-क, विशेष मागास प्रवर्ग उमेदवारांची कागदपत्रे तपासणी बुधवार, दि. 31 जानेवारी रोजी होईल, तर इतर मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस, अराखीव उमेदवारांची कागदपत्रे तपासणी गुरुवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. किरण पाटील यांनी कळविले आहे.

00000

रोहयोच्या लेखापरीक्षणासाठी अर्ज आमंत्रित

बुलडाणा, दि. 29 : जिल्हाधिकारी कार्यालयातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संवैधानिक लेखा परिक्षणासाठी इच्छुकांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. यासाठी दि. 1 ते 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान अर्ज करावे लागणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जिल्ह्याचे सन 2023-24 या आर्थिक वर्षाचे अकाऊंड मॅनेजमेंट निगडीत सेवा आणि संवैधानिक लेखापरिक्षण करण्याकरीता इच्छुक निविदा धारकांकडून निविदा मागविण्यात येत आहे. सदर निविदा दि. 1 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत सिलबंद लिफाफा पद्धतीने मागविण्यात येत आहे. सदर निविदा ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, मनरेगाची कामे करणाऱ्या सर्व यंत्रणा, पंचायत समिती कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय (रोहयो शाखा) यांचे लेखा परिक्षण करणे यासाठी मागविण्यात आली आहे. या निविदा दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय उघडण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती buldana.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

000000


No comments:

Post a Comment