Friday 5 January 2024

जिल्ह्यातील मन, तोरणा आणि पैनगंगेतील गाळ काढण्यासाठी खासगी संस्थांना आवाहन

• सामाजिक दायित्व निधीतून काढणार गाळ – जिल्हाधिकारी बुलडाणा,दि.05(जिमाका): जिल्ह्यातून वाहणा-या मन, तोरणा व पैनगंगा नद्यांच्या पात्रातील गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील यांत्रिकी संघटना, अशासकीय संस्थेच्या मदतीने खाजगी कंपन्यानी सामाजिक दायित्वाच्या निधीतून तो काढावा, यासाठी या संघटना आणि संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यातील मन 38 हजार 470, तोरणा 23 हजार 425 आणि पैनगंगा नदीतून 1 लाख 94 हजार 525 घन मीटर गाळ काढण्यात येणार आहे. गाळ काढण्याचे काम अधिक जलदगतीने पूर्ण करण्याच्या दृष्टिकोणातून अशासकीय संस्था आणि खासगी संस्थेच्या मदतीने यंत्रसामग्री (परिचलनासाठी आवश्यक मनुष्यबळासह) तसेच त्यासाठी लागणारे पेट्रोल, तेल, वंगण या सर्वांची उपलब्धता करून देत असल्यास त्यांना तसे काम क्षेत्रीय कार्यकारी अभियंता (स्थापत्य) यांच्या देखरेखीखाली करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातून वाहणा-या मन, तोरणा व पैनगंगा नद्यांच्या पूरप्रवण क्षेत्रातील बाधीत होणा-या शहरी भागातील पुराचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टिने तसेच नद्यांची वहन क्षमता पुनस्थापित करण्याच्या दृष्टिने नदीपात्रातील गाळ व राडारोडा तसेच तदीपात्रात गाळामुळे निर्माण झालेली बेटे, नदीपात्रातील अडथळे ई. निष्कासित करण्यासाठी अशासकीय संस्था व खाजगी कंपन्यांनी पुढे येण्याचे आवाहन समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे. *****

No comments:

Post a Comment