Monday 22 April 2024

DIO BULDANA NEWS 22.04.2024

शुक्रवारच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

*17 लाख 82 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

*शहरी 381, ग्रामीण 1581 असे 1962 मतदान केंद्र

*11 हजार अधिकारी, 5 हजार पोलिस राहणार तैनात

बुलडाणा, दि. 22 : भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. लोकसभा मतदारसंघासाठी 17 लाख 82 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 1 हजार 104 ठिकाणी 1 हजार 962 मतदान मतदान केंद्र राहणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. यात 17 लाख 82 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यावेळी 18 ते 19 वर्षे वयोगटातील नव्याने नोंदणी केलेले 26 हजार 500 मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहे. मतदार संघात 9 लाख 33 हजार 173 पुरूष, तर 8 लाख 49 हजार 503 महिला आणि 24 तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. यात दिव्यांग 14 हजार 234, 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक 26 हजार 830, तर 4 हजार 395 सैन्यदलातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील 1 हजार 104 ठिकाणी स्थापित 1 हजार 962 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या सर्व मतदान केंद्रावर मतदारांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. याठिकाणी रांगविरहीत मतदानासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. मतदारांना रांगेत उभे ठेवण्याऐवजी मतदान केंद्रालगत असलेल्या स्वतंत्र कक्षामध्ये बैठक, वीज, पंखे, पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानंतर टोकन क्रमांकानुसार मतदानासाठी केवळ पाच मतदारांना रांगेत उभे ठेवण्यात येणार आहे. उष्ण वातावरणात मतदारांना मतदान करणे शक्य व्हावे, यासाठी सुविधा पुरविण्यात येणार आहे. तसेच उन्हामुळे निर्माण होणाऱ्या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेली सुविधा देण्यात येणार आहे.

मतदानासाठी एकूण 1 हजार 962 मतदान केंद्र राहणार आहे. यापैकी 381 शहरी तर 1581 नागरी भागात मतदान केंद्र राहणार आहे. यातील 987 मतदान केंद्राचे वेबकास्टींगद्वारे लाईव्ह स्वरूपात मतदान प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांगांकरीता विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सक्षम ॲपद्वारे व्हील चेअर आणि मतदान केंद्रावर नेण्या-आणण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानुसार या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्राशिवाय आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्टार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार आहे..

मतदान प्रक्रियेमध्ये मतदानाच्या दिवशी कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी कर्तव्यावर नियुक्त असणाऱ्या मतदान केंद्रावर त्यांना मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील कर्तव्यावर असलेल्या 1 हजार 149 अधिकारी, कर्मचारी पोस्टाद्वारे मतदान करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्यासाठी डाक मतदान प्रक्रियेची सुविधा राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात घरून मतदानाला रविवारपासून सुरूवात झाली आहे. यात दिव्यांग 692 आणि 85 वर्षावरील 2 हजार 171 असे गृह मतदानासाठी नोंदणी केलेले एकूण 2 हजार 863 मतदारांचे मतदान करण्यात येत आहे.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 11 हजार 592 अधिकारी कर्मचारी कार्यरत असणार आहे. तसेच 5 हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. 24 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते दि. 26 एप्रिल रोजी मतदानाच्या दिवसापर्यंत हे आदेश लागू राहतील. मतदान केंद्राच्या ठिकाणी 144 कलम लागू करण्यात आले असून 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे­. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू आणि रोकड जप्त करण्यात येत आहे. यात आतापर्यंत 1 कोटी 60 लाख रूपयांपर्यंतचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात 25 लाखाहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. नागरिकांना मतदानाला येण्यासाठी आणि मतदान केंद्रावर सर्व सोयी पुरविण्यात येणार आहे. नागरिकांनी मतदान प्रक्रियेमध्ये निर्भयपणे सक्रीय सहभाग नोंदवून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे..

000000

शेतकऱ्यांना धरणातील गाळ मोफत उपलब्ध

गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 22 : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या उपक्रमात शेतकऱ्यांना धरणातील गाळ मोफत घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना गाळ काढणे आणि शेतापर्यंत वाहतूक करण्याचा खर्च उचलावा लागणार आहे. शेतकऱ्यांना धरणातील गाळ मोफत उपलब्ध असून यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण आणि राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या मालकीच्या 177 जलाशयांमधील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गाळ काढण्यात येत आहे. शेतामध्ये गाळ टाकल्याने जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होत असल्याने शेतकऱ्यांना गाळ मोफत उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना गाळ काढण्यासाठी कोणत्याही यंत्रणेला शुल्क देण्याची गरज नाही. हा गाळ शेतीच्या उपयोगासाठी मोफत उपलब्ध असणार आहे. गाळ उपसा करणे आणि वाहतूक करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार येणार नाही.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार हा उपक्रम ग्रामपंचायत आणि शेतीसाठी उपयुक्त ठरणारा आहे. त्यामुळे गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना सहकार्य करावे. या उपक्रमात नागरिकांनी सहकार्य करावे, पावसाळा सुरू होण्यासाठी जेमतेम दोन महिन्यांचा कालावधी राहिलेला आहे. या अल्प कालावधीत धरणातील गाळ काढावा लागणार आहे. विहित मुदतीत ही कामे होऊ शकली नसल्यास ग्रामपंचायतीचे नुकसान होणार आहे. पावसाळ्या धरणातील गाळ काढता येणे शक्य नसल्याने जलसंधारण विभागाने या कामात अटकाव करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

गाळ काढण्यामुळे तलावातील पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. तसेच हा गाळ शेतीमध्ये टाकण्यात आल्यामुळे सुपिकता वाढणार आहे. त्यामुळे या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे. धरण, तलावातील गाळ शेतामध्ये नेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. गाळ घेऊन जाऊन शेतकऱ्यांनी शेती सुपिक करून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा. या उपक्रमात नागरिक, ग्रामपंचायत आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले

000000 

No comments:

Post a Comment