Tuesday 30 April 2024

DIO BULDANA NEWS 30.04.2024



 जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी

बुलडाणा, दि. 30 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, अक्षय गाडगे, नाझर गजानन मोतेकर, सुरेश खोडके आदी उपस्थित होते. उपस्थितांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिवादन केले.

000000

महाराष्ट्र दिनानिमित्त आज ध्वजारोहण

बुलडाणा, दि. 30 : महाराष्ट्र दिनाच्या 64वा वर्धापन दिनानिमित्त बुधवार, दि. 1 मे रोजी सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

पोलिस कवायत मैदान येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

पाणीटंचाई निवारणासाठी टँकर मंजूर

बुलडाणा, दि‍. 30 : जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थि‍तीत पिण्याच्या स्त्रोतापासून आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे देऊळगाव राजा तालुक्यातील तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

दरडोई दरदिवशी 20 लिटर्स उपलब्ध होण्यासाठी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. बामखेड, मंडपगाव, चिंचोली बु., ता. देऊळगाव राजा येथे प्रत्येकी एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या तीन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सदर गावांमधील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे, असे उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा यांनी कळविले आहे.  

00000

बुलढाणा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 4 जूनला मतमोजणी

बुलडाणा, दि. 30 : बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी दि. 26 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीची मतमोजणी बुलडाणा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि. 4 जूनला होणार आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. त्यानुसार 5 बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये दि. 26 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्यात आले. मतमोजणीची सुरवात मंगळवार, दि. 4 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजता करण्यात येणार आहे.

बुलढाणा लोकसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गणेश नगर, मलकापूर रोड, बुलढाणा येथे होईल. मतमोजणी सकाळी 8 वाजता सूरू होणार आहे. याची नोंद सर्व उमेदवार, प्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

मलकापूर विधानसभा क्षेत्रातील

13 मे रोजीचा आठवडी बाजार रद्द

बुलडाणा, दि. 30 : रावेर लोकसभा मतदारसंघासाठी दि. 13 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा क्षेत्रातील मलकापूर आणि नांदुरा तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्या मतदान होणार असल्याने सोमवार, दि. 13 मेचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या संपूर्ण निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या क्षेत्रात कोणताही कायदा भंग होऊ नये, आचारसंहितेचे पालन होण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी संबंधीत गाव, शहरामध्ये मुख्य मार्गावर रस्त्यावर आठवडी बाजार भरतो. आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिक बाजार खरेदी करण्यासाठी येत असतात. तसेच आजुबाजूचे गावातील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होण्याची, तसेच मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे जिल्हादंडाधिकारी यांना बाजार व जत्रा अधिनियम, 1862 च्या कलम 5 नुसार मलकापूर विधानसभा मतदारसंघाममध्ये दि. 13 मे 2024 रोजी कायदा व सुव्यवस्था, तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही यासाठी आठवडी बाजार रद्द करण्यात आले आहे. सदर आठवडी बाजार त्या पुढील दिवशी भरविण्याची मुभा देण्यात आली आहे.

00000

No comments:

Post a Comment