Thursday 11 April 2024

DIO BULDANA NEWS 11.04.2024

बुलडाणा येथे पशूपक्षीपालन प्रशिक्षण

बुलडाणा, दि. 11 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग, व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींसाठी बुलडाणा येथे शेळी, कुक्कट, गाय, म्हैसपालन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. दि. २३ ते २७ एप्रिल २०२४ या पाच दिवसाच्या कालावधीत हे प्रशिक्षण होणार आहे.

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश हा सुशिक्षित बेरोजगारांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करावा हा आहे. सदर प्रशिक्षणात शेळी, कुकुट, गाय आणि म्हैसपालनाचे तंत्र आणि प्रकार त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग आणि लक्षणे, खाद्य निर्मिती आणि चार्याचे प्रकार, उद्योग सुरु करण्यासाठी संपूर्ण सहकार्य, त्यासोबत उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन, सहकार्य, तसेच शासकीय योजनांची माहिती प्रशिक्षणात तंज्ज्ञ व्यक्ती करणार आहेत.

प्रशिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार हा किमान पाचवी पास, वय १८ ते ५० वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षण नोंदणीसाठी दि. २३ एप्रिल २०२४ पर्यंत कार्यलयीन वेळेत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता, संपर्क क्रमांक ८२७५०९३२०१, ९०११५७८८५४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले आहे.

000000



जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा जोतिराव फुले यांना अभिवादन

बुलडाणा, दि. 11 : जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नाझर गजानन मोतेकर, रमेश मुळे, अपेक्षा इंगळे आदी उपस्थित होते.

000000

पाणी टंचाई निवारणार्थ टँकर मंजूर

बुलडाणा, दि‍. 11 : जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थि‍तीत पिण्याच्या स्त्रोतापासून आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. दरडोई दरदिवशी 20 लिटर्स उपलब्ध होण्यासाठी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. अंभोरा, ता. देऊळगाव राजा येथे एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. अंभोरा गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सदर गावामधील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे, असे उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा यांनी कळविले आहे.

000000

आचारसंहितेमुळे लोकशाही दिन रद्द

बुलडाणा, दि‍. 11 : सामान्य जनतेच्या तक्रारी आणि गऱ्हाणी अडचणी जाणून घेण्यासाठी व तक्रारींचे निरसन करण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. राज्यात लोकसभेच्या 48 जागांकरीता पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत लोकशाही दिनाचे आयोजन रद्द करण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment