Tuesday 16 April 2024

DIO BULDANA NEWS 16.04.2024

 जात प्रमाणपत्र पडताळणीतर्फे समता पंधरवडा

नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 16 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे समता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १२ ते २९ एप्रिल या कालावधीत 'समता पंधरवडा' राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

समता पंधरवड्यात अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतील २०२३-२०२४ मधील सर्व प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तालुका आणि महाविद्यालयनिहाय संख्यात्मक माहिती समानसंधी केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालय, तसेच जिल्हास्तरावर संकलित करण्यात येणार आहेत.

समता पंधरवड्यात सीईटी देणारे विद्यार्थी, डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज देखील भरण्यात येऊन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. समान संधी केंद्राच्या माध्यमातून सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज जमा करण्यात येणार असून प्राप्त अर्जावर तत्काळ कार्यवाही करुन वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जात पडताळणी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थी, सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, तसेच मोहिमेचा लाभ घ्यावा. असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

लोकसभा निवडणूक कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू

बुलडाणा, दि. 16 : लोकसभा निवडणूक 2024ची घोषणा झाली असून दि. 16 मार्च पासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी यांना प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यात मुंबई पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) लागू करण्यात आले आहे.

 जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी, तसेच मतदारसंघाचे मतदार नसतील अशा व्यक्तींनी कोणत्याही प्रकारच्या राजकीय सभा घेऊ नये. जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहणे आवश्यक असल्याने दि. 26 एप्रिल 2024 रोजी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टीने तसेच लोकसभा निवडणूक निर्भय व नि:पक्षपातीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने राजकीय नेते आणि कार्यकर्ते या मतदारसंघाचे मतदार नसतील, अशा व्यक्तींनी मतदानाचा दिनांक आणि मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर म्हणजे दि. 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेनंतर कोणत्याही प्रकारच्या राजकीय सभा घेऊ नये. तसेच मतदानाचा निश्चित केलेल्या दिनाकाच्या 48 तासाच्या अगोदर सदर मतदारसंघ सोडून जाण्याचे आदेश करण्यात आले आहे.

सदर बंदी आदेश संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याकरीता मलकापूर विधानसभा मतदारसंघ वगळून दि. 24 एप्रिल 2024 रोजीचे सकाळी 6 वाजेपासून ते दि. 26 एप्रिल 2024 च्या रात्री 22.00 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती मुंबई पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 135 व भारतीय दंड संहिता, 1860चे कलम 188 नुसार कार्यवाहीस पात्र राहणार आहे.

000000

No comments:

Post a Comment