Monday 1 April 2024

DIO BULDANA NEWS 01.04.2024

 


लोकसभा निवडणुकीसाठी आज एका उमेदवाराचा अर्ज दाखल

बुलडाणा, दि. 1 : बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज एका उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केला. विजयराज हरिभाऊ शिंदे यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी आज 11 जणांनी 27 अर्जाची उचल केली. यातील विजयराज हरिभाऊ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आतापर्यंत 49 जणांनी 118 अर्जाची उचली केली आहे. तर दोन उमेदवारांनी 4 नामांकन अर्ज दाखल केले आहेत.

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना दि. 28 मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे. इच्छुकांना दि. 4 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नामांकन अर्ज सादर करता येणार आहे. दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची दि. 5 एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे. तसेच दि. 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. उमेदवारांना कोरे नामांकन पत्र देणे, अनामत रक्कम भरणे तसेच अर्ज दाखल करण्यापूर्वी छाननीची व्यवस्था करण्यात आली आहे. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी दि. 4 एप्रिलपर्यंत वेळ असला तरी वेळेवर धावपळ टाळण्यासाठी इच्छुकांनी वेळेच्या आत अर्ज दाखल करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

000000

निवडणूक खर्चाचे लेखे तपासणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 1 : बुलढाणा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांनी त्यांचे खर्चविषयक लेखे तपासणी करणे आवश्यक आहे. या खर्च लेखे तपासणीला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, सर्व उमेदवारांना त्यांचे निवडणूक खर्चाचे लेखे तपासणीकरीता वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारांना उपस्थित राहावे लागणार आहे. निवडणूक विषयक खर्च तपासण्यासाठी दि. 12 एप्रिल, दि. 18 एप्रिल, दि. 23 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात उपस्थित राहावे लागणार आहे.

निवडणुकीतील उमेदवार निवडणूक खर्चाचे लेखी तपासणीकरिता सादर करणार नाहीत, त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील 77 मधील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची सबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक अमित शर्मा संपर्क क्रमांक 8625976378 हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लेखे तपासणीसाठी उपस्थित राहणार आहेत, असे नोडल अधिकारी खर्च नियंत्रण समिती तथा मुख्यलेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद यांनी कळविले आहे.

00000

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य

बुलडाणा, दि. 1 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करताना मतदान ओळखपत्र आवश्यक आहे. मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त मतदारांना ओळख पटविण्यासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य मानण्यात येणार आहे.

 मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात येते. ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करु शकत नसल्यास अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त नमूद कागपत्रे पुरावा म्हणून सादर करु शकतील, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे.

या 12 पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बॅक, पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजननेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकालांगता प्रमाणपत्र ग्राह्या मानण्यात येणार आहे.

0000000





सातत्यपूर्ण निवडणूक शिक्षणासाठी जिल्ह्यात 57 लोकशाही दालन

बलशाली भारतासाठी युवकांमध्ये लोकशाही रूजविणे आवश्यक

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलढाणा, दि. 1 : भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो, त्यामुळे सुदृढ लोकशाही व्यवस्थेत युवकांची महत्त्वपूर्ण भुमिका आहे. तसेच त्यांच्यामध्ये लोकशाही मुल्यांचा प्रचार-प्रसार करुन लोकशाहीबाबत जबाबदारी आणि जाणीव निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील ५७ वरीष्ठ महाविद्यालयात लोकशाही दालन स्थापन करण्यात आले आहेत. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच युवकांमध्ये शाश्वत लोकशाहीचा संस्कार रुजविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

भारत हा लोकशाही व्यवस्था असलेला देश आहे. एक सक्षम लोकशाही म्हणून विश्वस्तरावर भारताची विशेष ओळख आहे. लोकांनी लोकांचे व लोकांसाठी निवडुन दिलेले सरकार हे या देशातील राजकीय व्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रामपंचायतीपासून ते भारतीय संसदेपर्यत नियुक्त प्रतिनिधींना सार्वत्रिक निवडणुकीद्वारे राज्यकारभारासाठी निवडण्याचा जनतेला मौलिक अधिकार प्राप्त झाला आहे. दर पाच वर्षांनी प्रक्रियेद्वारे आपला प्रतिनिधी राजकीय व्यवस्थेत पाठविण्याचा जनतेला मुलभूत अधिकार प्राप्त झाला आहे. या अधिकारामुळे प्रत्येक मतदाराने मतदानाचे कर्तव्य पार पाडणे, हे सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक सुजान भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक मतदार जाणीव जागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

जनजागृतीसाठी जिल्ह्यातील 57 वरिष्ठ महाविद्यालयामध्ये लोकशाही दालन स्थापन करण्यात आले आहे. सदर दालनात मतदार नोंदणी प्रक्रिया, मतदानाचा अधिकार, मतदाराचे कर्तव्य, यासोबतच संवैधानिक मूल्य अशा स्वरूपातील विविध दृकश्राव्य साहित्य साधने, भित्तीपत्रके, चित्र प्रदर्शनी, भारत निवडणूक आयोगाने मतदार जाणीव जागृतीसाठी प्रसिद्ध केलेले विविध साहित्याचा वापर करण्यात आला आहे. या माध्यमातून सातत्यपुर्ण निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही शिक्षण उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांना निवडणूक प्रक्रियेविषयी शिक्षित करून युवकांच्या आणि विशेषत: पहिल्यांदाच मतदानास जाणाऱ्या नवमतदारांच्या लोकशाही व्यवस्था व संवैधानिक मूल्य यामध्ये सेतू निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती जिल्हा स्विप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांनी दिली आहे.  भारत, जगातील एक तरुण लोकसंख्येचा देश असताना युवकांची निवडणूक प्रक्रियेतील असंवेदनशीलता व अनिच्छा दूर करून भविष्यातील युवा पिढीला मतदान प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी आणि सुदृढ लोकशाहीसाठी हा उपक्रम आशादायी असल्याची भावना बी. एम. मोहन यांनी व्यक्त केली आहे.

00000

दिव्यांग केंद्र स्थापन करण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित

बुलडाणा, दि. 1 : जिल्ह्यात दिव्यांग केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. सदर केंद्र स्थापन करण्यासाठी दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्याल दिव्यांग कल्याण व पुनर्वसन केंद्र स्थापन करावयाचे आहे. त्यानुषंगाने दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्याचे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या व पुरेशी जागा व इमारत, आर्थिकदृष्ट्या सक्षम, कामाचा अनुभव, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, थेरपीची सुविधा आदी सोयीसुविधा असलेल्या स्वयंसेवी संस्थांकडून केंद्र शासनाच्या अनुदान धोरणाच्या मान्यतेच्या अधिन राहून दिव्यांग कल्याण व पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याकरीता प्रस्ताव मागविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी अटी व शर्तीची पुर्तता करीत असल्यास परीपूर्ण प्रस्ताव दि. 15 एप्रिल 2024 पर्यंत जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, बुलडाणा येथे विहित मुदतीत सादर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

00000000

No comments:

Post a Comment