Wednesday 10 April 2024

DIO BULDANA NEWS 09.04.2024

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

उमेदवाराच्या खर्चाच्या नोंदी तीन वेळा तपासणार
* खर्च नोंदी तपासणीचे वेळापत्रक जाहिर
बुलडाणा, दि. 08  : बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची खर्च नोंदवही तपासणीसाठी वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. खर्च तपासणीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक अमित शर्मा हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत उमेदवारांचे खर्च तपासण्यात येतील.
उमेदवाराचे खर्च 12, 18 आणि 24 एप्रिल रोजी तपासण्यात येणार आहे. सदर वेळापत्रकानुसार सर्व उमेदवारांनी आपल्या खर्चाचे लेखे आवश्यक त्या सर्व अभिलेख्यासह तपासणीसाठी स्वत: किंवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करावे. सदर तपासणी निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार अनिवार्य असल्याने सर्व उमेदवार किंवा प्राधिकृत प्रतिनिधीने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
वेळापत्रक याप्रमाणे : पहिली तपासणी दि. 12 एप्रिल 2024, दुसरी तपासणी दि. 18 एप्रिल, तर तिसरी तपासणी दि. 24 एप्रिल रोजी होईल. तपासणीचा वेळ ही सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार असून सदर तपासणी नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे होईल. वरील नमुद रोजी सर्व उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
उमेदवारांनी त्यांचे लेखे सविस्तर भरावे. निवडणुकीच्या विविध टीमच्या माध्यमातून खर्च घेण्यात येणार आहे. त्यामुळे यात त्रुटी राहू नये, तसेच खर्च निवडणुकीच्या बँक खात्यातून धनादेशाने देण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन निवडणूक खर्च निरीक्षक अमित शर्मा यांनी केले आहे.
खर्च लेखे तपासणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा वित्त अधिकारी प्रकाश राठोड यांनी केले आहे.
00000


उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा, दि. 08  : येत्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. यानंतर प्रचार सुरू होणार असून या प्रचारामध्ये सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन करीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले.
सोमवारी नामांकनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर निवडणुकीसाठी कायम राहिलेल्या 21 उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यावेळी सामान्य निवडणूक निरीक्षक पी. जे. भागदेव, कायदा व सुव्यवस्थेचे निरीक्षक सेंथिल कृष्णा, खर्चविषयक निरीक्षक अमित शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी शरद पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले उमेदवारांच्या नामांकनापासून खर्चाची तपशील घेण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडून त्यातूनच व्यवहार करावा. दहा हजारावरील रक्कम देताना धनादेशाचा उपयोग करण्यात यावा. खर्चाच्या नोंदी नियमित घेऊन खर्च निरीक्षक तीन टप्प्यात त्याचा आढावा घेणार आहे, यावेळी खर्च सादर करण्यात यावा. तसेच निवडणुकीनंतर तीस दिवसाच्या आत खर्चाचे पूर्ण विवरण सादर करण्यात यावे.
उमेदवारांनी प्रचार साहित्य प्रकाशित करताना प्रकाशकाचे नाव, मुद्रकाचे नाव छापण्यात यावे, अन्यथा अशाप्रसंगी गुन्हाही नोंद करण्यात येतो. वाद, द्वेषमूलक आणि कुणाचीही बदनामी होणार नाही, यासाठी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यासाठी पूर्वपरवानगीची गरज नाही. मात्र निवडणुकीच्या शेवटच्या 48 तासांमध्ये जाहिराती द्यावयाच्या असल्यास त्या माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून घ्याव्यात.
निवडणूक प्रक्रिया शांतता, भयमुक्त आणि निर्भयपणे होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. सी-व्हिजील, इ-केवायसी, 1950 हेल्पलाइन, निवडणूक निरीक्षकांचे क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी आयोगाच्या निर्देशाचे पालन करण्यात येत आहे. तसेच ईव्हीएमच्या सुरक्षिततेसाठी स्ट्रॉंगरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघातील 17 लाख 82 हजार 700 मतदार असून 1962 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. तसेच यात 56 आदर्श मतदान केंद्र राहणार आहे. तसेच 1 हजार 139 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. दिव्यांगांना सक्षम ॲपवर नोंदणी करून मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा प्राप्त करून घेता येणार आहे. दिव्यांग आणि 85 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यासाठी मतदान केंद्र अधिकारी यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या मतदारांच्या घरी जाऊन 21 ते 23 एप्रिल दरम्यान बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 4 हजार 395 सर्विस वोटर आहेत. त्यांची ही सुविधा करण्यात आली आहे. प्रशासनातर्फे निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली असून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यावर्षी 70 टक्क्याहून अधिक मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
0000
कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा, दि. 08  : रेतीमाफीयांशी संगनमत करून शासकीय पथकातील कर्मचाऱ्यांना धमकी देणारा शासकीय वाहन चालक संतोष भिवसन सातभाकरे याला निलंबित करण्यात आले आहे. शासकीय कामकाजात अडचण आणणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिला आहे.
शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीपत्रातून रेतीचे अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या पथकातील पाच शासकीय कर्मचाऱ्यांना दि. 18 मार्च रोजी रात्री नऊ वाजताचे दरम्यान वाहन चालक श्री. सातभाकरे यानी धमकी दिली होती. शासकीय पथक जलंब-माटरगाव रस्त्याने जात असताना वाहन चालक श्री. सातभाकरे हा खाजगी वाहनातून येऊन पथकाच्या वाहनासमोर त्यांनी आपले खाजगी वाहन उभे केले. तसेच कर्मचारी संतोष रामदास भेंडे यांच्यासोबत वाद घातला. पुन्हा या रस्त्याने आल्यास याद राखा, अशी धमकी दिली. त्याचवेळी या ठिकाणी सात ते आठ चारचाकी वाहने आली. यातील जणानी श्री. सातभाकरे याच्या सांगण्यावरून पथकातील कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली. याबाबत त्यांनी तातडीने वरिष्ठांना माहिती दिली. याबाबतच्या अहवालानुसार तहसीलदार दीपक बाजाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी वाहनचालक श्री. सातभाकरे याला दि. 26 मार्च रोजी निलंबित केले आहे.
शासकीय सेवेत असताना शासकीय वाहन चालक श्री. सातभाकरे यांचे वर्तन अयोग्य आहे. रेतीचे अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या माफीयांना अभय देण्यासाठी श्री. सातभाकरे यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे उघड झाले. तसेच रेतीमाफियांसह कर्मचाऱ्यांना धमकी देण्याचा प्रकार घडला असल्याने जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी तातडीने कारवाई करून श्री. सातभाकरे याला निलंबित केले आहे.
कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांचे असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. असा कोणताही प्रकार घडत असल्यास तातडीने निदर्शनास आणावा. याबाबत योग्य ती चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले.
000000

No comments:

Post a Comment