Saturday 20 April 2024

DIO BULDANA NEWS 20.04.2024

 जिल्ह्यात आजपासून घरून मतदान

*मतदानासाठी 101 पथके स्थापन

*टपाली मतप‍त्रिकेद्वारे होणार मतदान

बुलडाणा, दि. 20 : लोकसभा निवडणुकीत प्रथमच दिव्यांग आणि 85 वर्षावरील मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. जिल्हाभरातून घरून मतदानाची मागणी नोंदणी नोंदविलेल्या 2 हजार 863 मतदारांकडून रविवार, दि. 21 एप्रिलपासून मतदान करुन घेतले जाणार आहे. यासाठी 101 स्वतंत्र पथक निर्माण करण्यात आले आहे.

मागणी नोंदविलेल्या दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरून मतदानाची सुविधा देण्यात आली आहे. संबंधित मतदारांना मतदानाची आगाऊ सूचना देण्यात यावी. विहित केलेल्या दिनांक आणि कालावधीत मतदारांकडून मतदान करून घ्यावे. अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिल्या आहे.

येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेले दिव्यांग मतदारांच्या मागणीनुसार रविवारपासून घरपोच मतदान करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. जिल्ह्यात 2 हजार 171 ज्येष्ठ नागरिक आणि 692 दिव्यांग असे एकूण 2 हजार 863 मतदारांच्या घरी जाऊन मतदान पथकामार्फत मतदान करुन घेण्यात येणार आहे. मतदान टपाली मतपत्रिकेद्वारे होणार आहे. जिल्ह्यात दि. 21 ते 23 एप्रिल 2024 दरम्यान सदर मतदान प्रक्रिया होणार आहे.

बुलडाणा विधानसभा मतदारसंघात 112 ज्येष्ठ नागरिक, 84 दिव्यांग असे 196, चिखली विधानसभा मतदारसंघात 318 ज्येष्ठ नागरिक, 96 दिव्यांग असे 414, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात 539 ज्येष्ठ नागरिक, 89 दिव्यांग असे 628, मेहकर विधानसभा मतदारसंघात 820 ज्येष्ठ नागरिक, 283 दिव्यांग असे सर्वाधिक 1 हजार 103, खामगाव विधानसभा मतदारसंघात 120 ज्येष्ठ नागरिक, 83 दिव्यांग असे 203, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात 262 ज्येष्ठ नागरिक, 57 दिव्यांग असे 319, असे 2 हजार 171 आणि दिव्यांग 692 असे एकूण 2 हजार 863 मतदारांना घरपोच मतदान सुविधेचा लाभ देण्यात येणार आहे.

85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदार असलेल्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघ येथे 196 मतदारांसाठी 10 पथक, चिखली येथे 414 मतदारांसाठी 20 पथक, सिंदखेड राजा येथे 628 मतदारांसाठी 19 पथक, मेहकर येथे 1 हजार 103 मतदारांसाठी 32 पथक, खामगाव येथे 203 मतदारांसाठी 10 पथक, जळगाव जामोद येथे 319 मतदारांसाठी 10 पथक, असे एकूण 101 पथक घरोघरी जाऊन मतदान प्रक्रिया राबवणार आहेत. या मतदान पथकामध्ये 2 मतदान अधिकारी हे सूक्ष्म निरीक्षक, 1 व्हिडीओग्राफर, 1 पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे.

घरून मतदानाची प्रक्रिया पारदर्शीपणे, तसेच मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी उमेदवार स्वत: अथवा आपला प्रतिनिधी नियुक्त करुन मतदान प्रक्रियेचे निरीक्षण करु शकतील. याप्रक्रियेमध्ये मतदारांना टपाली मतपत्रिकेवर खूण करुन आपले मतदान नोंदविता येईल. तसेच मतदान नोंदविल्यानंतर मतदारांच्या बोटाला पक्की शाईची खूण करण्यात येणार आहे. तसेच या संपूर्ण प्रक्रियेचे चमूकडून चित्रीकरण करण्यात येईल.

अंध व्यक्तींसाठी मतदान करताना विशेष सोय करण्यात आली आहे. निवडणुकीत 21 उमेदवार आणि 1 नोटा असल्याने मतपत्रिकेचे दोन भाग असणार आहे. एका मतपत्रिकेवर 16 उमेदवार आणि उर्वरीत उमेदवार दुसऱ्या मतपत्रिकेवर असणार आहे. अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका पुरविण्यात येणार आहे. तसेच अंध दिव्यांग व्यक्तींना सोबत्याची मदत घेऊन देखील मतदान करता येणार आहे. दररोज मतदान संपल्यानंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सर्व पथकातील टपाली मतपत्रिकेचे एकत्रिकरण करण्यात येवून सर्व टपाली मतपत्रिकेचे पाकिटे हे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील स्ट्राँगरुममध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार आहे.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान पथकांचा तारखेनिहाय नियोजन केलेले असून त्यास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देण्यात आली आहे. याबाबत मतदार, तसेच उमेदवार यांनादेखील कळविण्यात आले आहे. तरी या कालावधीत उपरोक्त मतदारांनी बाहेरगावी जाऊ नये, अथवा गैरहजर राहू नये, तसेच सदर मतदान प्रक्रियेचा लाभ घेऊन सर्व मतदारांनी मतदान करावे व लोकशाहीच्या या उत्सवामध्ये आपला सहभाग नोंदवून लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी या घटकाने पुढे येऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment