Monday 15 April 2024

DIO BULDANA NEWS 15.04.2024



 निवडणूक निरीक्षकांकडून मतमोजणी परिसराची पाहणी

बुलडाणा, दि. 15 : लोकसभा निवडणुकीसाठी  दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बुलडाणा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. या परिसराची पाहणी निवडणूक सामान्य निरीक्षक पी. जे. भागदेव यांनी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोनेवार, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार आदी उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षक श्री. भागदेव यांनी मतदानानंतर मतदान यंत्रासह आदी साहित्य ठेवण्यात येणाऱ्या स्ट्राँग रूमची पाहणी केली. मतदानानंतर याठिकाणी रात्री उशिरा मतदान यंत्रासह इतर साहित्य येणार आहे. त्यामुळे पुरेशी प्रकाशाची सोय करण्यात यावी. तसेच संपूर्ण साहित्य ठेवण्यात आल्यानंतर प्रत्येक खोली सिल करण्यात यावी. सुरक्षेसाठी सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा कार्यान्वित करण्यात आले आहे. याचे नियंत्रण योग्य पद्धतीने करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त  इतर कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. मतमोजणीवेळी व्हीव्हीपॅट मशिनवरील मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींना सुकर प्रवेश देण्यात यावा. मतमोजणीसाठी विधानसभा संघनिहाय व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी उमेदवार, तसेच निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांसाठी बैठक व्यवस्था करण्यात यावी. मतदान यंत्र स्ट्राँग रूममधून आणणे आणि परत नेण्यासाठी वेगळी मार्गीका तयार करावी. तसेच मतपत्रिका, सर्व्हीस वोटरची मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना श्री. भागदेव यांनी केल्या.

00000






उत्पादन शुल्क विभागाने नोंदविले 167 गुन्हे

*आचारसंहिता कालावधीत कारवाई

बुलडाणा, दि. 15 : राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोकसभा निवडणूक २०२४च्या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत १६७ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. या १६४ वारस गुन्ह्यात १७० आरोर्पीना अटक करण्यात आली आहे. तसेच ९ वाहनासह एकूण १८ लाख ५७ हजार ६२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यांमध्ये देशी मद्य ६७२.६८ लिटर, विदेशी मद्य ८८.२ लिटर, ताडी १४८ लिटर, रसायन सडवा २ लाख ४८ हजार ५७० लिटर, हातभट्टी १ हजार ५९४ लिटर पकडण्यात आली आहे.

जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेशच्या सीमेवर निमखेडी आणि हनवतखेड येथे सीमा तपासणी नाका उभारण्यात आला आहे. मध्यप्रदेशच्या सिमेपासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुनगाव शिवार, ता. जळगाव जामोद येथे राज्य उत्पादन शुल्कच्या खामगाव पथकाने दि. २६ मार्च २०२४ रोजी दारुबंदी अधिनियमांतर्गत छापा टाकला. यात हातभट्टी निर्मितीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर छाप्यामध्ये १३० लिटर हातभट्टी, मोहासडवा १ हजार २०० लिटर, प्लॉस्टिक नळ्या ६ नग, पंधरा लिटरक्षमतेचे पतरी डबे ८६ नग, जर्मन घरव्या ६ नग, २० लिटर क्षमतेवे जार ५ नग. १० लिटर क्षमतेचे ३ कॅन असा ५९ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये आरोपी राजू नथ्थू बोबडे, वय ५५ वर्षे आणि प्रशांत रत्नाकर राऊत, दोघे रा. सुनगाव ता. जळगाव जामोद यांना अटक करण्यात आली. तसेच राज्य उत्पादन शुल्कच्या बुलडाणा पथकाने दि. १० एप्रिल २०२४ रोजी गोतमारा शिवारातील कुऱ्हा फाटा, ता. मोताळा येथे हातभट्टी दारु ६० लिटर २ वाहनासह पकडण्यात आली. त्यात एकुण ८१ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात आरोपी अनिल शिवाजी गवळी आणि सुनिल मोहनसिंग बिडवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

परिसरात अशी अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास या विभागास टोल फ्री नंबर १८००२३३९९९९ वर किंवा व्हॉटअॅप नंबर ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000





दिव्यांग मतदार जागृतीसाठी विशेष प्रयत्न

दिव्यांग मतदाराच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज

बुलडाणा, दि. १५ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदार मतदानाच्या कर्तव्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी दिव्यांगासाठी काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्त्यांनी दिव्यांग जनजागृतीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले.

स्थानिक अपंग कल्याण व पुनर्वसन संस्थेच्या वतीने आज दिव्यांग मतदार जाणीव जागृती करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अजय कारंजकर, सचिव जयसिंग जयवार, दिव्यांग कल्याण विभागाचे सहाय्यक सल्लागार शालिग्राम पुंड आदी उपस्थित होते.

येत्या दि. २६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील १ हजार ९६२ मतदान केंद्रावर बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दिव्यांग मतदारांसाठी सक्षम ॲप विकसित करण्यात आले आहे. यामध्ये नोंदणी करून दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर येण्याची सुविधा, व्हीलचेअर, तसेच आवश्यकता भासल्यास मागणीनुसार मदतनीस देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मतदारांनी विशेषत: नवमतदार, महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनी लोकशाहीच्या या उत्सवात उत्साहाने सहभागी होऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक जाणीव जागृती करण्यात येत आहे.

मतदान प्रक्रियेतील प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी बी. एम. मोहन यांच्या पुढाकाराने विविध घटकांना केंद्रस्थानी ठेऊन सुनियोजित मतदार शिक्षण व निवडणूक सहभाग कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग मतदारांसाठी स्वयंसेवी संस्था व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जाणीव जागृतीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

त्याअनुषंगाने आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्ह्यातील सुमारे १८ हजार नवमतदार, सोळा हजार दिव्यांग मतदार, 30 हजार ज्येष्ठ मतदार यांच्यासह संपूर्ण मतदारांना लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी करून घेण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहे.

दरम्यान जिल्ह्यातील सर्व दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. मतदानाच्या कर्तव्यापासून कुणीही वंचित राहणार नाही, यासाठी सर्वांनी संघटीत प्रयत्न करावेत, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी बी. एम. मोहन यांनी केले आहे.

00000

बुधवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

बुलडाणा, दि. 15 : जिल्हा रूग्णालयात नियमितपणे दिव्यांग तपासणी शिबीर घेण्यात येते. मात्र बुधवार, दि. 17 एप्रिल 2024 रोजी रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे या दिवशीचे शिबीर रद्द करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात नियमित बुधवारी दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र बुधवार, दि. 17 एप्रिल 2024 रोजी रामनवमीनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे या दिवसाचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

000000

पाणीटंचाई निवारण्यासाठी विंधन विहिरींना मंजुरी

बुलडाणा, दि. 15 : पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यात 41 गावांसाठी 7 कुपनलिका आणि 65 विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.

पाणी टंचाई निवारणार्थ शेगाव तालुक्यातील 4, सिंदखेडराजा 26, खामगाव 1, नांदुरा मधील 10, बुलडाणा 41 गावासाठी 7 कुपनलिका व 65 विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. य गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विंधनविहिरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, यांनी करावयाचा आहे. विंधन विहिरी शेगाव तालुक्यातील जानोरी, बेलुरा, कुरखेड, चिंचखेड. सिंदखेराजा तालुक्यातील दत्तपूर, डावरगाव, जऊळका, किनगाव राजा, पांगरी उगले, उगला, सावरगाव माळ, आडगाव राजा, शेलू, धांदरवाडी, जांभोरा, केशव शिवणी, वाघरुळ, वाकद जहागीर, मलकापूर पांग्रा, जळगाव, निमगाव वायाळ, पिंपळखुटा, निमखेड कसबा, सोनोशी, सोयदेव, तढेगाव, उमरद, वडाळी, वाघाळा, रुम्हणा, खामगाव तालुक्यातील खामगाव ग्रामीण, नांदुरा तालुक्यातील निमगाव, दादगाव, हिंगणा भोटा, हिंगणा दादगाव, बेलाड, खरकुंडी, पलसोडा, धाडी, हिंगणे गव्हाड, मोमिनाबाद या गावासाठी  कूपनलिका व विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे. यामुळे या गावामधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चित मदत मिळणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

000000000

मतदानासाठी कामगारांना सुट्टी जाहीर

बुलडाणा, दि. 15 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी बुलढाणा मतदार संघात दुसऱ्या टप्यात दि. 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. यात मतदारांना निवडणुकीच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 निवडणूक होणाऱ्या मतदानक्षेत्रात सर्व मतदाराना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक होणाऱ्या मतदानक्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींना लागू राहिल, यात खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स रिटेलर्स आदींचा समावेश आहे.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी केवळ दोन ते तीन तासाची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, बुलढाणा यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.

त्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींच्या मालक, व्यवस्थापनाने सूचनांचे योग्य पालन होईल, याची दक्षता घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त झाली नसल्याने मतदान करता येणे शक्य झाले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. मतदारसंघातील सर्व कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सर्व प्रकारच्या आस्थापनाधारकांनी भरपगारी सुट्टी द्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे.

00000

जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा झाल्याने

रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 15 : जिल्हा रुग्णालयातील रक्त केंद्रात रक्ताचा साठा संपला आहे. काही दिवस पुरेल इतकाच रक्त साठा केंद्रात शिल्लक आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांनी रक्तदान शिबिर आयोजित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रक्त केंद्रातून प्रती महिना सरासरी ३०० रक्त पिशवी नि:शुल्क रक्त संक्रमणासाठी उपलब्ध होतात. उन्‍हाळा आणि इतर कारणामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन होत नसल्यामुळे रक्त संकलन ठप्प झाले आहे. रक्त केंद्रात सध्या १५ रक्त पिशव्या शिल्लक आहेत. थॅलेसिमीया व सिकलसेल रुग्णांना कायमस्वरूपी आणि अपघात झालेल्या व्यक्ती आणि गर्भवती स्त्रियांना आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज असते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि धार्मिक संघटनांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, तातडीने रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन रक्त केंद्र जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. प्राची तायडे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment