Tuesday 23 April 2024

DIO BULDANA NEWS 23.04.2024





 लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या मदतीसाठी व्होटर हेल्पलाईन

*मतदारांना व्होटर स्लीप, संदेश पत्राचे वितरण

*मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी संस्थांना आवाहन

बुलडाणा, दि. 23 : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या मदतीसाठी व्होटर हेल्पलाईन ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मतदारांना निवडणुकीसंदर्भात सर्व माहिती आणि सेवा मिळणार आहे. ॲप सहजपणे डाऊनलोड करण्यासाठी क्यूआर कोडही देण्यात आला आहे.

व्होटर हेल्पलाईन ॲपला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या या ॲपने मतदारांशी संबंधित सेवा देऊन क्रांती घडवून आणली आहे. या ॲपमध्ये नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांसाठी सेवा, ई-इपिक डाऊनलोड, निवडणूक विषयक माहिती, उमेदवारांची माहिती, निवडणूक निकाल, माहिती स्त्रोत, नवीन घडामोडी, तक्रारी आणि सूचना यासह मतदारयादीतील तपशिलांची दुरुस्ती, मतदारयादीतील नावाचा शोध आणि इतर निवडणूक संबंधित सेवांनी या ॲपने ईसीआयला नागरिकांशी जोडले आहे. तसेच ही प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि कार्यक्षम बनविली आहे.

मतदारांना मतदान करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक विभागातर्फे बुलढाणा मतदारसंघातील 17 लाख 82 हजार मतदारांना व्होटर स्लीपचे घरपोच वाटप करण्यात आले आहे. या स्लीपमध्ये मतदारांचे मतदान केंद्र आणि इतर माहिती देण्यात आली आहे. यासोबतच जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे मतदान करण्याबाबतचे आवाहनपर संदेशपत्रक वाटप करण्यात आले आहे. या माध्यमातून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

मतदान केंद्रावर मतदारांना किमान सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहे. मतदान केंद्राच्या बाजूच्या खोलीत मतदारांसाठी बैठक, पाणी, पंखे आदीची सोय करण्यात येणार आहे. मतदार याठिकाणी थांबून क्रमाने मतदान करण्यास जाऊ शकतील. दिव्यांग मतदारांना सक्षम ॲपद्वारे सुविधा पुरविण्यात येणार आहे. दिव्यांग मतदारांना ॲपवरून मतदान केंद्रावरील सोयीसुविधांसाठी नोंदणी करावी लागणार आहे. तसेच दिव्यांग आणि 85 वर्षावरील नागरिकांना घरून मतदान करण्याची सोय दिली आहे. यात आजपर्यंत 2 हजार 650 मतदार म्हणजेच 93 टक्के मतदान झाले आहे.

उष्णाघाताच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रावर वैद्यकीय पथक उपस्थित राहणार आहे. त्यांच्याकडे औषधे आणि ओआरएसचा पुरेसा साठा उपलब्ध राहणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी गृहनिर्माण सोसायटीं, मेडीकल असोशिएशन यांना आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच मतदानासाठी कर्तव्यावर असणाऱ्यांना प्रमापणपत्र देण्यात आले आहे. यामध्ये 11 हजाराहून अधिक मतदान होणार आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे 100 टक्के मदान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

गेल्या लोकसभेत राज्याचे 61.02 टक्के, तर जिल्ह्यात 63.54 टक्के मतदान झाले आहे. यावर्षी जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृती केली असल्यामुळे मतदानाचा टक्का वाढणार आहे. गेल्या लोकसभेत बुलडाणा विधानसभा क्षेत्रात 55.39 टक्के मतदान झाले होते. यावर्षी या भागत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनी मतदानासाठी पुढे येऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

न्याय पालिकेतील कर्मचाऱ्यांची मतदार प्रतिज्ञा

कर्मचारी, नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे

-प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी

बुलडाणा, दि. 23 : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी न्यायपालिकेंतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. तसेच आपले कुटुंबीय आणि आपल्या परिसरातील नागरिकांनाही मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांनी केले.

भारतीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या 'सुनियोजित मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग' या प्रमुख कार्यक्रमांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय व निमशासकीय विभागांमधून मतदार जागरूकता मंचाची स्थापन करण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकामध्ये शासकीय आणि निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक साक्षरता आणि सहकार्यता निर्माण करण्यासाठी हा फोरम महत्वपूर्ण आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. 22 एप्रिल रोजी जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावरील न्यायालयांमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांच्या मार्गदर्शनाखाली एकाचवेळी मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हा न्यायाधीश राजेंद्र मेहरे, संजय डिगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल बी. एम. मोहन, तसेच दूरचित्रवाणी परिषदेच्या माध्यमातून तालुकास्तरावरील सर्व न्यायालयाचे न्यायधीश, कर्मचारी आणि विधिज्ञ उपस्थित होते.

सुरुवातीला सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या माझे मत, माझा आवाज या नागरिकांना करण्यात आलेल्या मतदानविषयक आवाहन संदेशाचे प्रक्षेपण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल बी. एम. मोहन यांनीही मतदान करण्याबाबत सर्वांनी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. त्यानंतर जिल्हा न्यायाधीश संजय डिगे यांनी उपस्थितांना मतदार प्रतिज्ञा दिली. जिल्हा प्रणाली प्रशासक प्रदिप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

00000



डाक विभागाकडून मतदार जागृती रॅली

            बुलडाणा, दि. 23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाचा टक्का वाढावा आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशातील निवडणुकांमध्ये कुणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये बुलडाणा डाक विभागाकडून मतदार जागृतीसाठी आज दि. 23 एप्रिल रोजी मतदाता जागृती रॅली काढण्यात आली होते.

जिल्ह्यात निवडणूक आचार संहिता लागू असताना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून अतिशय शांत, शिस्तबद्ध पद्धतीने डाक विभागाचे डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक अधीक्षक सतीश निकम आणि पोस्टमास्टर रविंद्र झिने यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. यात डाक कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाहीला मजबूत करावे, असे आवाहन डाक विभागाने केले.

000000






राज्य उत्पादन शुल्कच्या अवैध दारूविरूद्ध चार कारवाई

बुलडाणा, दि. 23 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविरूद्ध कारवाई सुरू केली आहे. यात आज दि. 23 एप्रिल रोजी चार कारवाया करण्यात आल्या. यात 1 लाख 90 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक मलकापूर यांनी दि. २३ एप्रिल रोजी बोदवड-मलकापूर रस्त्याबर बोदवड, जि. जळगाव येथील एका गुन्ह्यांमध्ये एक स्विप्ट चारचाकी वाहनामध्ये एकुण देशी २५.१२ लिटर आणि विदेशी १७.३२ लिटर असा २ लाख ३५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, मलकापूर श्री. शिंदे आणि जवान ए. पी. सुसरे यांनी सहभाग घेतला.

तसेच चिखलीच्या पथकाने नशिराबाद फाट्याजवळ नाईकनगर, ता. सिंदखेडराजा येथे १ पिकअप बोलेरो चारचाकी वाहनासह देशी दारु १९०.०८ लिटर व विदेशी दारू ८.६४ लिटर मद्य पकडुन ७ लाख ३१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात निरीक्षक श्री. रोकडे, दुय्यम निरीक्षक नयना देशमुख, श्री. पहाडे, जवान श्री. तिवाने, संजीव जाधव यांनी सहभाग घेतला.

बुलडाणाच्या पथकाने देऊळघाट येथे दोन कारवाया केल्या. यात पहिल्या कारवाईत अशोक सुखदेव पन्हाळे याच्या राहत्या घरी देशी दारु २६४.९6 लिटर मद्य पकडून १ लाख ३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात निरीक्षक के. आर. पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक निलेश देशमुख, जवान अवचार, विशाल पाटील यांनी सहभाग घेतला. दुसऱ्या कारवाईत गजानन दगडू पन्होळे याच्या राहत्या घरातून देशी दारू ४३.२० लिटर मद्य पकडून १६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंत २०४ गुन्हे नोंदविले असून २०० वारस गुन्ह्यात २०८ आरोपींना अटक केली आहे. यात २२ वाहनांसह ३५ लाख ८३ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व गुन्ह्यांमध्ये देशी मद्य १ हजार ३४०.४ लिटर. विदेशी मद्य १५०.५२ लिटर. बिअर ९१.०७ लिटर, ताडी १४८ लिटर, रसायन सडवा २६ हजार ९१४ लिटर, हातभट्टी १ हजार ६७६ लिटर पकडण्यात आले आहे.

00000

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार रद्द

           बुलडाणा, दि. 23 : लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मलकापूर आणि नांदुरा तालुका वगळता असणारे आठवडी बाजार रद्द करण्यात आले आहे.

निवडणूक कालावधीतील आदर्श आचार संहितेचे पालन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होऊ शकतो. याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाजार व जत्रा अधिनियम 1862च्या कलम 5 नुसार बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही यादृष्टीकोनातून मलकापूर आणि नांदुरा तालुका वगळता शुक्रवारी भरणारे बाजार रद्द करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे..

000000


No comments:

Post a Comment