Tuesday 2 April 2024

DIO BULDANA NEWS 02.04.2024

 







आज लोकसभा निवडणुकीसाठी सहा उमेदवारांचे अर्ज दाखल

बुलडाणा, दि. 2 : बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 6  उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. उमेदवारांनी त्यांचे नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे सादर केले. दरम्यान दि. 4 एप्रिल ही नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.

आज बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी 4 जणांनी 6 अर्जाची उचल केली. दरम्यान आज सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. आतापर्यंत 53 जणांनी 124 अर्जाची उचली केली आहे. तर 8 उमेदवारांनी 14 नामांकन अर्ज दाखल केले आहेत.

आज प्रतापराव गणपतराव जाधव – शिवसेना, रेखा कैलास पोफळकर – अपक्ष, प्रताप पंढरीनाथ पाटील - बहुजन मुक्ती पक्ष, रविकांत चंद्रदास तुपकर - अपक्ष, असलम शहा हसन शहा - महाराष्ट्र विकास आघाडी, मोहंमद हसन इनामदार - मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना दि. 28 मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे. इच्छुकांना दि. 4 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नामांकन अर्ज सादर करता येणार आहे. दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची दि. 5 एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे. तसेच दि. 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. उमेदवारांना कोरे नामांकन पत्र देणे, अनामत रक्कम भरणे तसेच अर्ज दाखल करण्यापूर्वी छाननीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना ऑनलाईन नामांकन अर्ज दाखल करता येणार आहे. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी दि. 4 एप्रिलपर्यंत वेळ असला तरी वेळेवर धावपळ टाळण्यासाठी इच्छुकांनी वेळेच्या आत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

000000

क्रीडा गुण सवलतीसाठी प्रस्ताव सादर सादर करण्याचे आवाहन

           बुलडाणा, दि. 2 : माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा देणाऱ्या जिल्हा, विभाग, राज्य स्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्यप्राप्त, तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या किंवा सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यात येते. यासाठी शाळा, महाविद्यालयांनी अर्ज दि. 5 एप्रिल 2024 पर्यंत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा, विभागीय, राज्य व राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन, सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव, विहित नमुन्यात अर्ज, हॉल तिकीट, संबंधित खेळाचे प्रमाणपत्र, शालेय परिशिष्ठ-ई आदीसह तसेच

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, विभागीय, जिल्हास्तरीय प्रमाणपत्र क्रमवार सादर करावेत. प्रत्येक पृष्ठ मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. सेवा हमी कायद्यानुसार ग्रेस गुण देण्याकरीता ऑनलाईन पोर्टल सिस्टीम schooleducation.mahaonline.gov.in कार्यरत आहे. राज्य, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या, सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण वेबसाईटवर विद्यार्थी, खेळाडूंनी प्रथम आपली नोंदणी करुन क्रीडा गुण सवलतीचा अर्ज, परिक्षेचे हॉल तिकीट आणि खेळाचे प्रमाणपत्र यासोबत अपलोड करणे गरजेचे आहे. सदरच्या प्रस्तावाची हार्डकॉपी किमान 2 प्रतीत सादर करावी लागणार आहे.

क्रीडा स्पर्धा एकविध खेळ संघटनाद्वारे आयोजित केल्या असल्यास, संघटना परिशिष्ट-10 सोबत, विहित नमुन्यात अर्ज, हॉल तिकीट, मान्यताप्राप्त खेळाचे प्रमाणपत्र, शालेय परिशिष्ठ-ई आदीसह  संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी खेळाडूंचे परिपूर्ण प्रस्ताव प्रतीत सादर करण्याची मुदत दि. 20 मार्च 2024 पर्यंत होती. मात्र अद्यापपर्यंत संबंधित प्रस्ताव सादर केलेला नसल्यास विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांनी दि. 5 एप्रिल 2024 पर्यंत कार्यलयीन वेळेत दोन प्रतीत आवश्यक कागतपत्रांसह प्रस्ताव सादर करावेत. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत वाढीव क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत.

तसेच एकविध खेळाच्या अधिकृत संघटनांनी जिल्हा, विभाग, राज्य क्रीडा स्पर्धांचा अहवाल dsobld@gmail.com ईमेलवर पाठवावा. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.

0000000

पाणी पुरवठादाराकडून दरपत्रक आमंत्रित

बुलडाणा, दि. 2 : शैक्षणिक सत्र सन 2024-25 वर्षासाठी 75 विद्यार्थी क्षमतेच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी आरओ कॅनद्वारे पुरवठा आणि विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी ट्रँकरद्वारे पाण्याचा पुरवठा नियमीत स्वरुपात करण्याकरिता दरपत्रक आमंत्रित करण्यात आले आहे. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, खामगांव येथे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

दुचाकीसाठी नवीन नोंदणी मालिका

बुलडाणा, दि. 2 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दुचाकी वाहनाकरीता नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात आली आहे. दि. 2 एप्रिल 2024 पासून दुचाकी वाहनाकरीता MH28- BY ही नवीन मालिका नोंदणी क्रमांक 0001 ते 9999 सुरु करण्यात येत आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment