Wednesday 3 April 2024

DIO BULDANA NEWS 03.04.2024

 आज लोकसभा निवडणुकीसाठी सहा उमेदवारांचे अर्ज दाखल

बुलडाणा, दि. 3 : बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 6  उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. उमेदवारांनी त्यांचे नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे सादर केले. दरम्यान गुरूवार, दि. 4 एप्रिल ही नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.

आज बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी 4 जणांनी 8 अर्जाची उचल केली. दरम्यान आज सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. आतापर्यंत 53 जणांनी 124 अर्जाची उचल, तर 12 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. आज नंदू जगन्नाथ लवंगे – अपक्ष, उद्धव ओंकार आठोळे – अपक्ष, मोहंमद हसन इनामदार – मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी, संदिप शेळके  – अपक्ष, सुमन मधुकर तिरपुडे – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया, रविकांत चंद्रदास तुपकर - अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात मोहंमद हसन इनामदार आणि रविकांत चंद्रदास तुपकर यांनी कालही नामांकन अर्ज दाखल केले आहेत.

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना दि. 28 मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे. इच्छुकांना दि. 4 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नामांकन अर्ज सादर करता येणार आहे. दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची दि. 5 एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे. तसेच दि. 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. उमेदवारांना कोरे नामांकन पत्र देणे, अनामत रक्कम भरणे तसेच अर्ज दाखल करण्यापूर्वी छाननीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना ऑनलाईन नामांकन अर्ज दाखल करता येणार आहे. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उद्या दि. 4 एप्रिलपर्यंत वेळ आहे. शेवटच्या दिवशी वेळेवर धावपळ टाळण्यासाठी इच्छुकांनी वेळेच्या आत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

000000





निवडणूक कालावधीत राज्य उत्पादन शुल्काची कारवाई

*आतापर्यंत 70 गुन्हे नोंद

*उत्पादन शुल्कचे चेकपोस्ट

बुलडाणा, दि. 3 : राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीमध्ये विशेष मोहिम राबविण्यात आली. यात 70 गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यात 68 वारस गुन्हे आणि ६९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत 2 वाहनासह 8 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये देशी मद्य ३०३.३० लिटर, विदेशी मद्य २७ लिटर, रसायन सडवा ११ हजार २६५ लिटर, हातभट्टी ६८३ लिटर, बिअर 7.8 लिटर पकडण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्कच्या खामगावच्या पथकाने मध्यप्रदेश सीमेला ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या उमापूर, ता. जळगाव जामोद येथे ३ गुन्हे नोंदवून २३ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. निवडणुकीच्या अनुषंगाने सीमा तपासणी नाक्यावर निमखेडी व हनवतखेड, ता. जळगाव जामोद, तसेच चिखली-जाफ्राबाद रोडवर भोकर येथे तात्पुरते चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग, तसेच विविध जिल्ह्यात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची भरारी पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे.राज्य उत्पादन शुल्कला आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ११ कोटी १२ लाखांचे महसुली उद्दिष्ट देण्यात आले होते. या कार्यालयाने ९७ टक्के उद्दीष्ट प्राप्त करीत १० कोटी ८० लाख रुपयांचा महसूल गोळा केला.

आपल्या परिसरात अवैध मद्यविक्री अथवा बनावट मद्यनिर्मिती आढळल्यास विभागास टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३ वर किंवा व्हॉटसॲप नंबर ८४२२००११३३ किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी. तसेच जिल्ह्यातील किरकोळ आणि ठोक मद्य अनुज्ञप्तीधारकांच्या अनुज्ञप्तीमध्ये बनावट मद्य आढळुन आल्यास अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येणार आहे.

00000

नो व्होटर टू लेफ्ट बिहाइंड

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांच्या मताधिकारासाठी यंत्रणांनी दक्ष राहावे

– जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 3 : सशक्त लोकशाहीसाठी एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, यादृष्टीने दिव्यांग, तसेच ८५ वर्षावरील ज्येष्ठांच्या शतप्रतिशत मताधिकाराबद्दल व्यापक जाणीव जागृती  करण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी संयुक्तरित्या प्रयत्न करून मतदानाचा टक्का वाढवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग मतदार विषयाचे नोडल अधिकारी तथा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग मतदार जाणीव जागृतीसाठी समाज कल्याण विभगांतर्गत संबंधित घटकांची बैठक घेण्यात आली.

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत एकूण १६ हजार ६८१ दिव्यांग मतदार चिन्हांकीत करण्यात आले आहेत. त्यामध्ये अंध, मुकबधीर व अन्य प्रवर्गातील दिव्यांगांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ८५ वर्षावरील २९ हाजार ९९८ ज्येष्ठ मतदार आहेत.  या सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा अधिकार सहज व सुलभतेने बजाविता यावा, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केकरण्यात येत आहे. त्यासंदर्भात दिव्यांगामध्ये जाणीव-जागृती संदर्भाने ही बैठक घेण्यात आली.

यावेळी मनोज मेरत यांनी दिव्यांग व ज्येष्ठांच्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने माहिती देऊन एकही मतदार सुटणार नाही, यासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन मतदार जाणीव जागृतीसाठी प्रयत्न आणि उपक्रमाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन केले. तसेच मतदान केंद्रस्तरावरील सुविधा, अपरिहार्यता व वैयक्तिक विकल्प असल्यास मतपत्रिका आदी बाबतीत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांबद्दल स्थानिक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या माध्यमातून आवश्यक ते मार्गदर्शन आणि सहकार्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील शंभर टक्के दिव्यांग, ज्येष्ठ मतदार लोकशाहीच्या या उत्सवात उत्साहाने सहभागी होतील, यासाठी संघटीत प्रयत्न आणि उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या ॲपचाही लाभ घ्‍यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment