Monday 22 April 2024

DIO BULDANA NEWS 21.04.2024

 लोकसभा निवडणुकीत रांगविरहित मतदान प्रक्रिया

*मतदानासाठी मतदारांना टोकन देणार

*दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअरची सुविधा

*प्रत्येक केंद्रावर आरोग्य पथक तैनात

बुलडाणा, दि. 21 येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सध्यास्थितीतील जिल्ह्यातील उष्ण तापमानाच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांच्या सुलभतेसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यात यावर्षी प्रामुख्याने टोकन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाला टोकन देण्यात येणार आहे. मतदानासाठी एकावेळी फक्त पाच मतदार रांगेत उभे राहतील. उर्वरीत टोकन असणाऱ्या मतदारांसाठी मतदान केंद्राच्या बाजूच्या खोलीत बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.

सध्या जिल्ह्यात तापमान उष्ण आहे. याचा परिणाम मतदानाचा हक्क बजावण्यावर होऊ नये, नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यात यावर्षी प्रथमच मतदारांना मतदान केंद्रावर टोकन देण्यात येणार आहे. या टोकन क्रमांकानुसार मतदान करण्यासाठी रांगेत सोडण्यात येणार आहे. महिला आणि पुरूषांसाठी वेगळे टोकन देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर आल्यानंतर मतदारांना टोकन देण्यात येतील. यातील पाच मतदारांना रांगेत ठेवण्यात येणार असून उर्वरीत मतदारांसाठी मतदान केंद्राच्या बाजूच्या खोलीत बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणी पंखे, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी खुर्च्या आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. या माध्यमातून रांगविरहित मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

दिव्यांग मतदारांसाठी मतदानाला येण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्ती सक्षम ॲपवरून मतदान केंद्रावर येणे-जाणे आणि व्हीलचेअरची मागणी नोंदवू शकतील. मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तींना सर्व मदत दिली जाणार आहे. अंध मतदारांना ब्रेल लिपीतील डमी मतपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तसेच मतदान यंत्रावर निळ्या बटनाशेजारी ब्रेल लिपीतील क्रमांक असणार आहे. यंत्रावरील क्रमांक तपासून अंध मतदार मतदान करू शकतील. दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना आवश्यकतेप्रमाणे मदतनीस पुरविण्यात येणार आहे.

उष्ण तापमानामुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्यास उपचार करण्यासाठी मतदान केंद्रावर वैद्यकीय पथक उपस्थित राहणार आहे. पथकाकडे आवश्यक औषध साठ्यासह मेडीकल किट उपलब्ध राहणार आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ओआरएस आणि इतर औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध राहणार आहे. तसेच चार किंवा त्यापेक्षा जास्त मतदान केंद्र एकाच इमारतीमध्ये असणाऱ्या ठिकाणी मतदान केंद्राबाहेर मंडप उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पंखे, खुर्च्या, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणी मतदार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधीची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क्‍ बजावावा, यासाठी प्रशासनातर्फे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मतदान केंद्रावरही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. मतदानाला येणाऱ्या नागरिकांची सर्वेतोपरी काळजी प्रशासन घेणार आहे. त्यामुळे मतदारांनी कोणतीही काळजी न बाळता मतदानाला येऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

000000



राज्य उत्पादन शुल्कची निवडणूक काळात कारवाई

*१९ दुचाकी़, १ इर्टीगासह ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

            बुलडाणादि. 21 : राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोकसभा निवडणूक काळात कारवाई सुरू केली आहे. आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत 19 दुचाकी आणि एका इर्टीगा वाहनासह 32 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

            लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम राबविण्यात आली­. या कालावधीत एकुण १९६ गुन्हे नोंदविण्यात आले असून १९२ वारस गुन्ह्यात १९९ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच २० बाहनासह एकूण ३१ लाख ९५ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये देशी मद्य ९७९.७७ लिटरविदेशी मद्य १३३.२ लिटर, बिअर ५१.९५ लिटरताडी १४८ लिटररसायन सडवा २६ हजार ४१० लिटरहातभट्टी १ हजार ६५७ लिटर जप्त करण्यात आले आहे.

            राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने शनिवार, दि. २० एप्रिल २०२४ रोजी किनगाव राजा, ता. सिंदखेडराजा येथे २ गुन्ह्यांमध्ये एक ईटींगा चारचाकी वाहन क्रमांक एमएच १४ जेएम ६१९७ आणि १ मोटर सायकल क्रमांक एमएच २८ एसी ७९६२ यामध्ये एकुण ४३.२ लिटर देशी मद्य पकडुन एकुण ६ लाख ९६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये रविकुमार रामदास चाटे, वय ३३, रा. निमगाव वायाळ आणि शरद दत्तात्रय जाधव, वय ४०, रा. किनगावराजा, ता. सिंदखेडराजा यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी निरीक्षक आर. एम. माकोडेदुय्यम निरीक्षक आर. आर. उरकुडेजवान नि वाहनचालक मोहन जाधव, जवान पी. एच. पिंपळे यांनी सहभाग घेतला होता.

            राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक यांनी येळगाव शिवारात १ मोटर सायकल वाहनासह ८.६४ लिटर देशी मद्य पकडुन एकुण २३ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात विपुल प्रकाश साळवे, रा. बुलडाणा याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दुय्यम निरीक्षक आर. के. विठोरेव जवान एस. बी. निकाळजे यांनी सहभाग घेतला.

            परिसरात अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास या विभागास टोल फी नंबर १८००२३३९९९९ वर किंवा व्हॉटअॅप नंबर ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

00000

No comments:

Post a Comment