Thursday 18 April 2024

DIO BULDANA NEWS 18.04.2024

 निवडणूक विभाग मतदारराजाचे दारी…

जिल्ह्यात 21 एप्रिलपासून घरून मतदानाला सुरूवात

*मतदारांनी घरी थांबण्याचे आवाहन

बुलडाणादि. 18 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024मध्ये प्रथमच 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेले दिव्यांग मतदारांनी विहीत मुदतीत केलेल्या मागणीनुसार त्यांना घरपोच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात 2 हजार 171 ज्येष्ठ नागरिक आणि 692 दिव्यांग असे एकूण 2 हजार 863 मतदारांच्या घरी जाऊन मतदान पथकामार्फत मतदान करुन घेण्यात येणार आहे. हे मतदान टपाली मतपत्रिकेद्वारे होणार असून बुलढाणा लोकसभा मतदारसंघात या कामासाठी 101 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात दि. 21 ते 23 एप्रिल 2024 दरम्यान सदर मतदान प्रक्रिया होणार आहे.

बुलडाणा विधानसभा मतदारसंघात 112 ज्येष्ठ नागरिक, 84 दिव्यांग असे 196, चिखली विधानसभा मतदारसंघात 318 ज्येष्ठ नागरिक, 96 दिव्यांग असे 414, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात 539 ज्येष्ठ नागरिक, 89 दिव्यांग असे 628, मेहकर विधानसभा मतदारसंघात 820 ज्येष्ठ नागरिक, 283 दिव्यांग असे सर्वाधिक 1 हजार 103, खामगाव विधानसभा मतदारसंघात 120 ज्येष्ठ नागरिक, 83 दिव्यांग असे 203, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात 262 ज्येष्ठ नागरिक, 57 दिव्यांग असे 319, असे 2 हजार 171 आणि दिव्यांग 692 असे एकूण 2 हजार 863 मतदारांना घरपोच मतदान सुविधेचा लाभ देण्यात येणार आहे.

85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदार असलेल्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघ येथे 196 मतदारांसाठी 10 पथक, चिखली येथे 414 मतदारांसाठी 20 पथक, सिंदखेड राजा येथे 628 मतदारांसाठी 19 पथक, मेहकर येथे 1 हजार 103 मतदारांसाठी 32 पथक, खामगाव येथे 203 मतदारांसाठी 10 पथक, जळगाव जामोद येथे 319 मतदारांसाठी 10 पथक, असे एकूण 101 पथक दि. 21 एप्रिलपासून घरोघरी जाऊन मतदान प्रक्रिया राबवणार आहे. सदर मतदान पथकांमध्ये 2 मतदान अधिकारी हे सुक्ष्म निरीक्षक, 1 व्हिडीओग्राफर, 1 पोलिस कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे.

सदर मतदान प्रक्रिया पारदर्शीपणे, तसेच मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी उमेदवार स्वत: अथवा आपला प्रतिनिधी नियुक्त करुन मतदान प्रक्रियेचे निरीक्षण करु शकतात. याप्रक्रियेमध्ये मतदारांना टपाली मतपत्रिकेवर खुण करुन आपले मतदान नोंदविता येईल. तसेच मतदान नोंदविल्यानंतर मतदारांच्या बोटाला पक्की शाईची खुण करण्यात येणार आहे. तसेच या संपूर्ण प्रक्रियेचे टिमकडून चित्रीकरण केले जाणार आहे.

अंध व्यक्तींसाठी मतदान करताना विशेष सोय करण्यात आली आहे. निवडणुकीत 21 उमेदवार आणि 1 नोटा असल्याने मतपत्रिकेचे दोन भाग असणार आहे. एका मतपत्रिकेवर 16 उमेदवार आणि उर्वरीत उमेदवार दुसऱ्या मतपत्रिकेवर असणार आहे. अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका पुरविण्यात येणार आहे. तसेच अंध दिव्यांग व्यक्तींना सोबत्याची मदत घेऊन देखील मतदान करता येणार आहे. दररोज मतदान संपल्यानंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सर्व पथकातील टपाली मतपत्रिकेचे एकत्रिकरण करण्यात येवून सर्व टपाली मतपत्रिकेचे पाकिटे हे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील स्ट्राँगरुममध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार आहे.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान पथकांचा तारखेनिहाय नियोजन केलेले असून त्यास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देण्यात आली आहे. याबाबत मतदार, तसेच उमेदवार यांनादेखील कळविण्यात आले आहे. तरी या कालावधीत उपरोक्त मतदारांनी बाहेरगावी जाऊ नये, अथवा गैरहजर राहू नये, तसेच सदर मतदान प्रक्रियेचा लाभ घेऊन सर्व मतदारांनी मतदान करावे व लोकशाहीच्या या उत्सवामध्ये आपला सहभाग नोंदवून लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी या घटकाने पुढे येऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000








लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सक्रीय सहभाग नोंदवावा

-विभागीय आयुक्त निधी पाण्डेय

*दिव्यांग, तृतीयपंथी मतदारांशी संवाद

*लोकसभा निवडणुकीचा आढावा

बुलडाणादि. 18 : लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व घटकांनी सक्रीय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, युवक, तृतीयपंथी यांच्या सर्व मतदारांनी मतदानासाठी समोर येऊन मतदान करावे, तसेच मतदानासाठी इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घेऊन मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांनी केले.

 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीमती पाण्डेय यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग आणि तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिव्यांग आणि तृतीयपंथी यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना मतदान करण्यासाठी शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील विंचरकर, निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले, समाज कल्याण सहायक आयुक्त अनिता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या तयारी आढावा घेताना श्रीमती पाण्डेय यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षास भेट दिली. त्यांनी मतदार हेल्पलाईन, सी-व्हिजील, सीसीटीव्ही यंत्रणा आदींची माहिती घेतली. मतदार हेल्‍पलाईनवर येणाऱ्या दूरध्वनीबाबत कॉलसेंटरप्रमाणे उपस्थित कर्मचारी यांनी आपली ओळख द्यावी. त्यानंतर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, ही माहिती देताना नम्रपणे ही माहिती देण्यात यावी. निवडणुकीच्या कालावधीत नियंत्रण कक्ष महत्वाची भूमिका बजावित असते. या कक्षाने इतर नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे. जिल्ह्याला इतर राज्याची सिमा आहे. याठिकाणी असलेल्या चेकपोस्टवरील यंत्रणा सक्षमपणे सुरू ठेवावी. निवडणुकीसाठी उभारण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फिरत्या पथकांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. यावेळी त्यांनी थांबलेल्या पथकांशी संपर्क साधून माहिती घेतली.

            लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. महिला मतदारांची टक्केवारी अधिक आहे. त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घ्यावे. ही‍ निवडणूक मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्रीमती पाण्डेय यांनी यावेळी केले. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक घटकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध घटकांशी संवाद साधून त्यांचा सहभाग नोंदवून घेण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज श्रीमती पाण्डेय यांनी दिव्यांग आणि तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली. तसेच तृतीयपंथी आणि दिव्यांग मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना व्हील चेअर आणि मतदान केंद्रावर जाण्या-येण्याची व्यवस्था करण्याबाबत माहिती घेतली.

000000



विभागीय आयुक्तांनी घेतला लोणार विकास आराखड्याचा आढावा

विकासकामे निश्चित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश

बुलडाणादि. 18 : लोणार विकास आराखड्यातील कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहे. न्यायायलयाच्या निर्देशानुसार ही कामे करण्यात येत आहे. लोणार सरोवराला वैज्ञानिक महत्व असून जागतिक स्तरावरील पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे यंत्रणांना सोपविण्यात आलेली विकास कामे निश्चित कालावधीत पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोणार विकास आराखड्यातील कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती पाण्डेय यांनी, न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे गोमुख परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा पर्यटकांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने बसविण्याची कार्यवाही पुरातत्व विभागाने करावी. याबाबत तातडीने कार्यवाही करून कामे पूर्ण करण्यात यावीत. तसेच गोमुख परिसरात येणाऱ्या पर्यटकांना वाहने ठेवण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे प्रवेशद्वाराजवळील अतिक्रमण काढून याठिकाणी वाहनतळ करण्यात यावा.

लोणार सरोवराला वैज्ञानिक महत्व आहे. त्यामुळे सरोवरातील पाण्याचे नमुने नियमित पद्धतीने घेण्यात यावेत, याची तपासणी करण्यात यावी. नमुन्यांचे विश्लेषण करण्यात यावे. वैज्ञानिकांच्या बैठक नियमित स्वरूपात घेण्यात याव्यात. दुर्गा टेकडीवरील प्रयोगशाळा हस्तांतरणाची प्रक्रिया गतीने होण्यासाठी प्रयत्न करावेत. सांडपाणी सरोवरामध्ये जाऊ नये यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करावेत. पावसाळ्यात हे पाणी सरोवरामध्ये जाणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

लोणार बायपास, लोणार-मंठा आणि लोणार किन्ही या रस्त्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी. याबाबत भूसंपादनाची कामे नियमानुसार करण्यात यावीत. तसेच लोणार येथे पर्यटकांना राहण्यासाठी अपुरी सुविधा असल्यामुळे पर्यटन विकास महामंडळाने याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देशही श्रीमती पाण्डेय यांनी दिले.

000000

पाणीटंचाई निवारणासाठी काळेगाव, मुर्ती येथे टँकर मंजूर

बुलडाणा, दि‍. 18 : जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थि‍तीत पिण्याच्या स्त्रोतापासून आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

दरडोई दरदिवशी 20 लिटर्स उपलब्ध होण्यासाठी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मौजे काळेगाव, मौजे मुर्ती, ता. मोताळा येथे प्रत्येकी एक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. काळेगाव व मुर्ती गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सदर गावामधील पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे, असे उपविभागीय अधिकारी, मलकापूर यांनी कळविले आहे.

000000 

आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

बुलडाणा, दि‍. 18 : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम सन 2009 नुसार खाजगी विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वयंअर्थ सहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित आणि दुर्बल घटाकातील मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार या प्रवेश प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे

यावर्षी 2024-25 या वर्षातील आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे. त्यानुसार पालकांना आपल्या पाल्याचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे कळविण्यात आले आहे. सन 2024-25 या वर्षातील आरटीई 25 टक्के प्रक्रियेचे अर्ज पालकांना दि. 30 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येईल. तसेच शासनाच्या rte25admission.maharashtra.gov.in या वेबसाईटपी अधिक माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्ह्यातील पालकांनी प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.

000000

No comments:

Post a Comment