Friday 5 April 2024

DIO BULDANA NEWS 05.04.2024

 


छाननी अंती एकूण 25 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र पात्र

बुलडाणा, दि. 5 : बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 29 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. या अर्जांची छाननी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यात चार उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले असल्याने 25 उमेदवार अद्यापही कायम आहेत. दरम्यान सोमवार, दि. 8 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी 29 उमेदवारांनी 42 नामांकन अर्ज दाखल केले. आज या उमेदवारी अर्जाची छाननी केली. यात संजय रामभाऊ गायकवाड – शिवसेना, विजयराज हरिभाऊ शिंदे – भाजप, श्याम बन्सीलाल शर्मा – अपक्ष, ॲड. सैयद मुबीन सैय्यद नईम – अपक्ष, विलास शंकर तायडे – बहुजन समाज पार्टी या पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पात्र अपात्र ठरले. यापैकी विजय शिंदे यांचा अपक्ष म्हणून असलेला अर्ज पात्र ठरल्याने एकूण 25 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र पात्र ठरले आहेत.

छाननीअंती विजयराज हरिभाऊ शिंदे – अपक्ष, प्रतापराव गणपतराव जाधव – शिवसेना, रेखा कैलास पोफळकर – अपक्ष, प्रताप पंढरीनाथ पाटील – बहुजन मुक्ती पक्ष, रविकांत चंद्रदास तूपकर – अपक्ष, असलम शहा हसन शहा – महाराष्ट्र विकास आघाडी, महंमद हसन इनामदार – मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पार्टी, सूमन मधुकर तिरपुडे – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक, नंदू जगन्नाथ लवंगे – अपक्ष, उद्धव ओंकार आटोळे – अपक्ष, संदीप रामराव शेळके – अपक्ष, गजानन जर्नादन धांडे – अपक्ष, नरेंद्र दगडू खेडेकर – शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे, मच्छिंद्र शेषराव मघाडे – सोशालिस्ट पार्टी इंडिया, ज्ञानेश्वर पुरूषोत्तम गणेश पाटील – अपक्ष, दिपक भानुदास जाधव - पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक, अशोक वामन हिवाळे – अपक्ष, नामदेव दगडू राठोड – अपक्ष, वसंत राजाराम मगर – वंचित बहुजन आघाडी, संतोष भिमराव इंगळे - रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर, विकास प्रकाश नांदवे – भिमसेना, बाळासाहेब रामचंद्र इंगळे – अपक्ष, दिनकर तुकाराम संबारे – अपक्ष, माधवराव सखाराम बनसोडे - बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी, गौतम किसनराव मघाडे – बसपा या उमेदवारांचे नामांकन अर्ज पात्र ठरले आहेत.

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना दि. 28 मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे. दाखल करण्यात आलेल्या सर्व 29 नामनिर्देशन पत्रांची आज छाननी करण्यात आली. दरम्यान सोमवार, दि. 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

000000

बुलढाणा लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

बुलडाणा, दि. 5 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध केला आहे. त्यासाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये दि. 26 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाकडून बुलढाणा लोकसभा मतदारसंघ करिता निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण म्हणून पी. जे.भागदेव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा संपर्क क्रमांक 7385976149 हा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार मेतकर, संपर्क 9860823637 हे आहेत. निरीक्षक यांचे निवासस्थान सावित्री, शासकीय विश्राम गृह, बुलडाणा येथे आहे.

निवडणूक निरीक्षक कायदा व सुव्यवस्था म्हणून सेनथील क्रिष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 8421797614 हा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक श्रीधर घुट्टे 9850394342 हे आहेत. निरीक्षक यांचे निवासस्थान अजिंठा, शासकीय विश्राम गृह, बुलडाणा येथे आहे.

निवडणूक निरिक्षक खर्च म्हणून अमित शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 8625976378 असा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे 8668805727 हे आहेत. निरीक्षक यांचे निवासस्थान जिजाऊ, शासकीय विश्रामगृह, बुलडाणा येथे आहे.

            लोकसभा निवडणुकीसाठी तीनही निरीक्षक जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षांची, उमेदवारांची, नागरीकांची काही तक्रार असल्यास निरीक्षकांच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कळविले आहे.

00000

भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ

बुलडाणा, दि. 5 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परीक्षा फी योजनांचा लाभ देण्यात येतो. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahadbt.mahait.gov.in या पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली असून आता दि. 30 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येऊ शकणार आहे.

सदर प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा दि. 11 ऑक्टोबर 2023 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व संस्था, महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि अनुसूचित प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अनुसूचित प्रवर्गाकरिता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी, व्यावसायिक पाठ्यक्रम निर्वाह भत्ता, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्याकरीता दि. 30 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ करुन देण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी मुदतीत ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी.

मागील वर्षाच्या तुलनेत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कमी भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील अर्ज भरलेले नाही, अश्या विद्यार्थी, तसेच सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील अर्ज रिप्लाय करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज भरावे. अनुसूचित जाती प्रवर्गातील योजनेस पात्र सर्व विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरावेत. तसेच सर्व महाविद्यालयीन प्राचार्यांनी महाविद्यालयात प्रवेशित योजनेसाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर विहित मुदतीपूर्वी भरून घ्यावेत.

जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी त्यांच्याकडे प्रवेशित विद्यार्थ्यांना महा डीबीटी पोर्टलद्वारे योजनेची आवेदनपत्र भरण्याबाबत सूचित करावे. सदर मुदतीत मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000






भयमुक्त, शांततापूर्ण निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

            बुलडाणा, दि. 5 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नागरिकांनी निर्भय आणि शांततापूर्ण पद्धतीने आपला मतदानाचा अधिकार बजावावा, जिल्हा आणि पोलिस प्रशासन त्यासाठी कटिबद्ध आहे, असा संदेश आज जिल्हा पोलिस दलातर्फे देण्यात आला.

येत्या दि. २६ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून महिला, युवक, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक आणि सर्वसामान्य नागरिकांना मतदान करता यावे, तसेच मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी पोलिस दलातर्फे आज गो वोट-चला जाऊया मतदानाला हा सामाजिक संदेश देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पार पडलेल्या या मतदार जाणीव जागृती कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलिस उपअधीक्षक मसूद खान, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल पिंपळे, पोलिस निरीक्षक विकास तिडके उपस्थित होते.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे युवक, नवमतदार, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक व सर्वसाधारण मतदार यांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुनियोजित मतदार शिक्षण व निवडणूक सहभाग कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच सर्व नागरिकांनी मतदान करून मतदानाचे प्रमाण वृद्धिंगत करण्याचा संदेश प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी जाणीव-जागृतीच्या उद्देशाने पोलिस दलातर्फे आज गो वोट-चला जाऊया मतदानाला उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी, बलशाली भारताची लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचे राष्ट्रीय कार्य पार पाडावे, असे आवाहन केले. नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा अधिकार बजावावा, त्यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासन कटीबद्ध असून खंबीरपणे नागरीकांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन पोलिस अधिक्षक श्री. कडासने यांनी केले.

पोलीस दलाच्या महिला आणि पुरूष तुकडीने कवायत मैदानावर ‘गो वोट’चा संदेश देणारी मानवी रांगोळी साकारून अनोख्या पद्धतीने संदेश दिला. दरम्यान जिल्ह्यात व्यापक मतदार जाणीव जागृतीसाठी विविध माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नाच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल, असा विश्वास जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांनी व्यक्त केला.

00000

No comments:

Post a Comment