Wednesday 10 April 2024

DIO BULDANA NEWS 10.04.2024




 ‘गाळमुक्त धरण’ उपक्रमासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 10 : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार हा उपक्रम राज्य शासनातर्फे राबविण्यात येत आहे. यात धरणातील गाळ काढून शेतामध्ये टाकण्यात येणार आहे. यामुळे पाणी साठवण क्षमता वाढण्यासोबतच शेतीची सुपिकता वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील विविध संस्थांकडे सोपविण्यात आलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील ४७ तलावातील गाळ काढण्यात येणार आहे. या तलावातील गाळ काढण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करण्यात याव्यात. संबंधित संस्थांना कार्यारंभ आदेश तातडीने देण्यात यावे. तसेच संस्थांनी गाळ काढण्याची कामे विनाविलंब सुरू करावीत.

गाळ काढण्यामुळे तलावातील पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. तसेच हा गाळ शेतीमध्ये टाकण्यात आल्यामुळे सुपिकता वाढणार आहे. त्यामुळे या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे. तलावातील गाळ शेतामध्ये नेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. गाळ घेऊन जाऊन शेतकऱ्यांनी आपली शेती सुपिक करावी, यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सकाळी लवकर ही कामे सुरू करून सायंकाळपर्यंत गाळ काढण्यात यावा. परिसरातील नागरिकांना या गाळ काढण्याच्या उपक्रमाची माहिती घ्यावी. त्यांचा यामध्ये सहभाग घेण्यात यावा. येत्या काळात पावसाळ्याचे दिवस असल्याने ही कामे निश्चित केलेल्या मुदतीत पूर्ण करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.

000000






आरोग्य दूतांचे आवाहन, चला जाऊया मतदानाला

निर्विघ्न मतदान प्रक्रियेसाठी आरोग्य विभाग दक्ष

बुलडाणा, दि. 10 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक मतदान केंद्रावर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी कुठलीही आरोग्यविषयक काळजी न करता आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, त्यासाठी संपूर्ण मतदान प्रक्रियेच्या वेळेत आरोग्यदूत मतदान केंद्रावर आरोग्य सेवेसाठी उपलब्ध आहेत, असा संदेश आज आरोग्य प्रशासनाने दिला.

येत्या दि. २६ एप्रिल रोजी लोकसभा मतदारसंघातील १ हजार ९६२ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात उत्साहाने सहभागी होऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मतदारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य विभागही पुढे सरसावला असून उन्हाळ्याचे दिवस आणि वाढते तापमान लक्षात घेता मतदान केंद्रावर कोणतीही आकस्मिक बाब उद्भवल्यास त्यास सामोरे जाण्यासाठी आरोग्य विभाग पूर्वतयारी करीत आहे.

आज संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा सामान्य रूग्णालय, उप रूग्णालय आणि ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून मतदारांना ‘गो वोट–चला जाऊया मतदानाला’ या व्यापक मतदार जाणीव जागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्या पुढाकाराने आरोग्य प्रशासनातर्फे आज उपक्रम घेण्यात आला.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असून सर्व मतदारांनी चिंता न बाळगता आत्मविश्वासाने आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात आयोजित कार्यक्रमात केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. भागवत भुसारी, कार्यकारी अभियंता विशाल पिंपळे, डॉ. सुरेश घोलप, डॉ. जगदीश डुकरे, डॉ. भिलावेकर तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने सर्व मतदान केंद्रावरील किमान पायाभूत सुविधांमध्ये आरोग्य विभागातर्फे प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तसेच प्रथमोपचार पेटीसह आरोग्यविषयक संदर्भीय सेवा उपलब्ध असणार आहेत.

00000

14 एप्रिलचा आठवडी बाजार रद्द

बुलडाणा, दि. 10 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दि. 14 एप्रिल रोजी असल्याने या दिवशीचा बुलडाणा येथील आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133वी जयंती निमित्ताने सकाळी 8 वाजता बुलढाणा येथील जयस्तंभ चौक येथे भिम पाळणा आणि माजी सैनिक व समता दलाच्या वतीने मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच शहरातून महिलांची मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. तसेच रविवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने शहरमधील मुख्य मिरवणूक मार्गावरील रस्त्यावर आठवडी बाजार भरतो. या आठवडी बाजारातही गर्दी असते. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होते. त्यामुळे दि. 14 एप्रिल रोजीचा बुलडाणा शहरातील रविवारचा आठवडी बाजार रद्द होऊन इतर दिवशी आठवडी बाजार भरविण्यात यावा, अशी विनंती पोलीस अधीक्षकांनी केली आहे.

त्यानुसार बाजार आणि यात्रा कायदा 1862च्या कलम 5 नुसार जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अधिकारानुसार रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही, या दृष्टीकोनातून शहरामध्ये भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात येत आहे. सदर आठवडी बाजार त्या पुढील दिवशी भरविण्यात येणार आहे.

00000

हमीदराने मका खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

*30 एप्रिलपर्यंत नोंदणी करावी लागणार

बुलडाणा, दि. 10 : रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरडधान्य मका हमीदराने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी दि. ३० एप्रिल २०२४ पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे.

जिल्ह्यामध्ये मका खरेदीसाठी नोंदणी सुरु करणेसाठी १६ खरेदी केंद्राना मान्यता दिलेली आहे. यात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, बुलढाणा, लोणार, मेहकर, शेगाव, संग्रामपूर, मलकापूर, जळगाव जामोद व खामगाव, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, सोनपाऊल अॅग्रो प्रोड्युसर कंपनी, अंजनी बु. केंद्र - साखरखेर्डा, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी, देऊळगावराजा केंद्र सिंदखेडराजा, नांदुरा अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, नांदुरा, स्वराज्य शेतीपूरक सहकारी संस्था, चिखली, ऑर्गसत्व ऑर्गनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी, देऊळगावराजा, कृषी उत्पन्न बाजार समिती, संग्रामपूर केंद्र वरवंड बकाल, बिबी फार्मर प्रोड्युसर कंपनी बिबी केंद्र बिबी या केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा पणन अधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये सदर ठिकाणी मका खरेदीसाठी नोंदणी सुरु करण्याचे आदेश दिले आहे.

त्यानुसार शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करणेसाठी, आधारकार्ड, खरीप २०२३-२४ चा सातबाऱ्याचा ऑनलाईन पिकपेरा, बँक पासबुकची आधारलिंक केलेली झेरॉक्स, मोबाईल नंबर घेऊन कागदपत्रे स्कॅन करुन शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात यावी. तसेच हाताने लिहिलेले सातबारा आणि खाडाखोड केलेले कागदपत्र कोणत्याही परिस्थितीत स्विकारण्यात येणार नाहीत. शासनाने दिलेल्या कालावधीमध्ये शेतकरी नोंदणी होणार असल्यामुळे रोजच्या रोज नोंदणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज त्याच दिवशी पोर्टलवर नोंदणी करुन घ्यावयाचे आदेश देण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन अर्ज स्विकारल्या जाणार नाहीत. तसेच कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन सातबारावरील मका पिकपेऱ्यापेक्षा जास्त क्षेत्रावर नोंदणी करण्यात येणार नाही. तसे झाल्यास यास खरेदी केंद्र जबाबदार राहणार आहे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी केले आहे.

000000



आरसेटी तर्फे शेळीपालन प्रशिक्षण

बुलडाणा, दि. 10 : सेंट्रल बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे देऊळगाव माळी येथे दहा  मोफत शेळीपालन प्रशिक्षण पार पडले.

संस्थेचे संचालक संदीप पोटे यांनी सर्व प्रशिक्षणार्थी महिलांना प्रेरित करून संस्थेची माहिती दिली. त्याचबरोबर ध्येयनिश्चिती आणि शासकीय योजनांबद्दल अधिक माहिती देऊन बँकिंग आणि ईडीपीविषयी माहिती दिली. प्रशिक्षणादरम्यान सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेहकर शाखेचे व्यवस्थापक आशिष मोरे यांनी प्रशिक्षणाला भेट दिली. शेळीपालन प्रशिक्षक ऋषीकुमार फुले यांनी शेळीपालना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षक स्वप्नील गवई, श्रीकृष्ण राजगुरे, सहाय्यक प्रशांत उबरहंडे, मनीषा देव आणि कल्पना पोपळघट यांनी मार्गदर्शन केले.

आरसेटी तर्फे बेरोजगार सुशिक्षित तरुण-तरुणींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास इच्छुकांनी सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, बुलढाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

मंदिराजवळ प्राण्यांचा बळी देण्यास प्रतिबंध

बुलडाणा, दि. 10 : जिल्ह्यातील विविध यात्रा, तसेच उरुस दरम्यान प्राण्याचा बळी देण्याची प्रथा आहे. त्यावेळेस अंधश्रद्धेपोटी कोणत्याही प्राण्याचा मंदिर किंवा श्रद्धास्थळाजवळ बळी दिला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आल आहे.

उत्सव साजरा करताना स्थानिक प्रशासन आणि पोलिस पाटील यांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. याबाबत स्थानिक भागात जनजागृती करावी. तसेच उत्सव साजरा करताना प्राण्याचा बळी द्यावयाचा असल्यास मंदिर किंवा श्रद्धास्थळाजवळ देण्यात येऊ नये. त्याची इतरत्र स्वतंत्र व्यवस्था करुन उत्सव साजरा करावा. त्यानंतर सदर जागेची स्वच्छता करण्याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी  केले आहे.

000000


No comments:

Post a Comment