Friday 12 April 2024

DIO BULDANA NEWS 12.04.2024

 ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांच्या घरून मतदानाला 21 एप्रिलपासून सुरूवात

* नोंदणी केलेल्यांनाच सुविधा मिळणार

*मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा

बुलडाणा, दि. १२ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि सर्व दिव्यांग व्यक्तींनी मागणी नोंदविल्यानुसार घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात 2 हजार 171 ज्येष्ठ नागरिक आणि 692 दिव्यांग असे एकूण 2 हजार 863 मतदार घरून मतदान करणार आहेत. हे मतदान मतपत्रिकेद्वारे होणार असून लोकसभा मतदारसंघात 101 पथक प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन मतदान करून घेणार आहे. जिल्ह्यात दि. 21 ते 23 एप्रिल 2024 दरम्यान सदर मतदान प्रक्रिया होणार आहे.

बुलडाणा विधानसभा मतदारसंघात 112 ज्येष्ठ नागरिक, 84 दिव्यांग असे 196, चिखली विधानसभा मतदारसंघात 318 ज्येष्ठ नागरिक, 96 दिव्यांग असे 414, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात 539 ज्येष्ठ नागरिक, 89 दिव्यांग असे 628, मेहकर विधानसभा मतदारसंघात 820 ज्येष्ठ नागरिक, 283 दिव्यांग असे 1 हजार 103, खामगाव विधानसभा मतदारसंघात 120 ज्येष्ठ नागरिक, 83 दिव्यांग असे 203, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात 262 ज्येष्ठ नागरिक, 57 दिव्यांग असे 319, असे 2 हजार 171 आणि दिव्यांग 692 असे एकूण 2 हजार 863 मतदार घरून मतदान करणार आहे.

85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदार असलेल्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघ येथे 196 मतदारांसाठी 10 पथक, चिखली येथे 414 मतदारांसाठी 20 पथक, सिंदखेड राजा येथे 628 मतदारांसाठी 19 पथक, मेहकर येथे 1103 मतदारांसाठी 32 पथक, खामगाव येथे 203 मतदारांसाठी 10 पथक, जळगाव जामोद येथे 319 मतदारांसाठी 10 पथक, असे एकूण 101 पथक दि. 21 एप्रिलपासून घरोघरी जाऊन मतदान प्रक्रिया राबवणार आहे.

यावेळी प्रथम 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पथकामध्ये नियुक्त मतदान अधिकारी, पोलिस आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतपत्रिकेद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहे. मतदान केंद्रावरील मतदानाच्या पद्धतीनेच मतदान करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेचे टिमकडून चित्रीकरण केले जाणार आहे.

अंध व्यक्तींसाठी मतदान करताना विशेष सोय करण्यात आली आहे. निवडणुकीत 21 उमेदवार आणि 1 नोटा असल्याने दोन मतदान यंत्र निवडणुकीत असणार आहे. एका मतदान यंत्रावर 16 उमेदवार आणि उर्वरीत उमेदवार दुसऱ्या मतदान यंत्रावर असणार आहे. अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीत सुविधा असणार आहे. तसेच डमी मतपत्रिका राहणार आहे. त्यावर उमेदवारांचे क्रमांक राहणार आहे. सदर क्रमांक मतदान यंत्राच्या बाजूला ब्रेल लिपीत असणार आहे. ज्या उमेदवाराला मतदान करावयाचे आहे, तो ब्रेल लिपीतील क्रमांक तपासून बाजूच्या निळे बटन दाबून मतदान करावे लागणार आहे. आवश्यकता भासल्यास अंध व्यक्तींना मदतनीस देण्यात येणार आहे.

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सक्षम ॲप विकसित करण्यात आले आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर येऊन मतदान करावयाचे आहे, परंतू त्यांच्याकडे वाहतुकीची सोय नाही, तसेच मतदान केंद्रावर व्हील चेअरची सोय हवी आहे, अशांनी या सक्षम ॲपद्वारे नोंदणी करावी लागणार आहे. त्यानुसार त्यांना मदतनीसासह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे या घटकाने पुढे येऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

000000






अंगणवाडीताईंचे आवाहन, चला करूया मतदान…

महिलांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे

- मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन

बुलडाणा, दि. १२ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांनी पुढे येऊन आपल्या मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, तसेच लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांनी केले आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ पेक्षा अधिक मतदान व्हावे आणि मतांचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुनियोजित मतदार शिक्षण व निवडणूक सहभाग कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक कुटुंबापर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्यासाठी आणि मतदार जाणीव जागृतीच्या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जाणीव जागृतीविषयक अंमलबजावणी करण्यात येत आहे.

येत्या दि. २६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील १ हजार ९६२ मतदान केंद्रावर बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने मतदारांनी विशेषत: नवमतदार, महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, यासाठी व्यापक जाणीव-जागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ९ लाख ८० हजार ८७० महिला मतदार आहेत. तर स्त्री-पुरूष मतदार गुणोत्तर हे ९१० आहे. सन २०१९च्या लोकसभा निवडणूकीत सरासरी ६३.५४ टक्के मतदारांनी आपले कर्तव्य पार पाडले होते.

आगामी लोकसभा निवडणुकीत सुद्धा महिलांनी मोठ्या प्रमाणावर मताधिकार बजवावा, यासाठी मतदार जाणीव-जागृतीविषयक उपक्रमांच्या माध्यमातून लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केद्रांवर मतदानकेंद्र जागृती समूह स्थापित करण्यात आले आहेत. तसेच सर्व शासकीय व निमशासकीय विभागांतर्गत मतदार जागृती मंचही स्थापित करण्यात आले आहेत.

दरम्यान याच उद्देशाने आज महिला व बाल विकास विभागातर्फे महिलांच्या मतदानाचा टक्का वाढविणे आणि महिला मतदारांना प्रेरीत करण्यासाठी अंगणवाडी ताईंच्या माध्यमातून सर्व तालुक्यात ‘गो वोट – चला जाऊया मतदानाला’चा जागर करण्यात आला आहे. जिल्हा मुख्यालयी जिल्हा परिषदेमध्ये आयोजित कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल पिंपळे, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी अशोक लोणे, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी संदिप गवळी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी ताईंनी आपल्या कार्यक्षेत्रातील महिलांना मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करावे, तसेच जिल्ह्यातील सर्व महिला मतदारांनी निर्भयपणे आपला मताधिकार बजावावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांनी केले.

00000

No comments:

Post a Comment